Home > मॅक्स रिपोर्ट > पितृपक्षात राजकारणी लोकं कामं का टाळतात?

पितृपक्षात राजकारणी लोकं कामं का टाळतात?

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्र्यांवर पितृपक्षामुळे पदभार न स्विकारल्याची टीका केली. पण मग प्रश्न हा उरतो की खरंच पितृपक्ष वाईट असतो का? राजकारणी त्यांची चांगली कामं करणं पितृपक्षात करणं का टाळतात? जाणून घेण्यासाठी वाचा हा स्पेशल रिपोर्ट...

पितृपक्षात राजकारणी लोकं कामं का टाळतात?
X

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकाकर परिषद घेउन पितृपक्ष असल्याने काही मंत्र्यांनी अद्यापही कार्यभार स्विकारला नसल्याची टीका केली. "आता तर नविनच काढलंय पितृपक्ष असल्यामुळे बऱ्याच मंत्र्यांनी कार्यभारच स्विकारलेला नाही. बरेच मंत्री अद्याप मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातच गेलेले नाहीत. मंत्र्याच्या कामकाजाला पितृपक्षाची बाधा अशी बातमीच त्यांनी दाखवली कुणाकुणाची बाधा येणार आहे मला तर काही समजतच नाही. जग कुठे चाललंय. काय कुठं चाललंय. २५ सप्टेंबरपर्यंत १४ मंत्री पदभार स्विकारण्यापासून राहणार दुर... १८ मंत्र्यांपैकी फक्त ४ मंत्र्यांनी पदभार स्विकारलेला आहे. अतिशयोक्ती नाही पण हजारो फाईल्स अडकुन पडलेल्या आहेत." असं वक्तव्य अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं. पण मग खरंच या मंत्र्यांनी पितृपक्ष असल्याने पदभार स्विकारला नसेल तर मग पितृपक्ष इतका वाईट असतो का? पितृपक्ष म्हणजे नेमकं काय? या प्रश्नांची उत्तरं शोधुयात.

पितृपक्ष म्हणजे काय?

आजोबांचा जन्म त्यांच्या वडीलांमुळे होतो. त्यामुळे इतर जे मृतात्मे होतात ते पितर बनतात. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा काळ हा पंधरा दिवसांचा असतो त्याला पितृपक्ष म्हणतात असं म्हटलं जातं.

पितृपक्ष वाईट असतो का? आता हा पितृपक्ष वाईट असतो का हे जाणून घेण्यासाठी आम्ही ज्योतिषशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्याशी संपर्क साधला. "पितृपक्ष वाईट नाही. उलट यावेळी पित्र पृथ्वीवर येतात आणि आपल्याला आशिर्वादच देतात. ते आपलं वाईट चिंतीत नाहीत. आपला देश हा शेती प्रधान देश आहे त्यामुळे आपण गणेशोत्सवात मातीची मुर्ती बसवतो. मग पंधरा दिवस ज्यांनी आपल्याला माती दिली, संपत्ती दिली त्यांचं स्मरण करतो. आणि मग नवरात्रौत्सव साजरा करतो. पण पितृपक्ष वाईट कोणत्याही अंगाने नसतो. पितृपक्षात विवाह लावले तर आपण पित्रांना विसरून लग्नच लावत बसू आणि त्यामुळे पितृपक्षात विवाह केले जात नाहीत. शिवाय इतरही कामं करण्यासाठी पितृपक्ष शुभ आहे. आपण जे काम करू त्याला पितर हे आशिर्वादच देणार आहेत." असं ते म्हणाले.

आता खरंच मंत्र्यांनी पितृपक्षामुळे पदभार स्विकारला नाही का?

गणेशोत्सवानंतर मंत्री आपापल्या खात्याचा पदभार स्विकारतील असं सगळ्यांनाच वाटलं होतं परंतू अजुनही त्यांनी तसं केलं का नाही. खरंच पितृपक्षामुळे या मंत्र्यांनी आपला पदभार स्विकारला नाहीये का? तर तसं नाहीये. या मंत्र्यांना आपापली दालनं मिळाली आहेत परंतू त्या दालनांचं नुतनीकरण सुरू आहे. दालनाच्या प्रवेशद्वारांच्या दिशा ठरायच्या आहेत. त्यामुळे दालन स्विकारण्यासाठी वेळ लागत असल्याचं मंत्रालयातील सुत्रांकडून कळत आहे.

याआधी इतिहासात कधी इतका उशीर पदभार स्विकारण्यासाठी लागला होता का याबाबत आम्ही याबाबत आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी इतिहासात असं काही झालं असं वाटत नाही. पण कोणत्याच पक्षाचे नेते धुतल्या तांदळासारखे नाहीत. एक शरद पवार सोडले तर इतर सर्व नेते या अंधश्रध्दा पाळत असतात. बऱ्याच नेत्यांनी पितृपक्षाच्या काळाच महत्वाचे दौरे रद्द केलेले आहेत. काही शुभ कामांचं उद्घाटन या पितृपक्षाच्या काळात पुढे ढकललेलं आहे, असं सांगितलं.

या व्यतिरीक्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक नागेश केसरी यांच्याशी आम्ही या बाबत बातचित केली असता त्यांनी अजित पवारांनी केलेली टीका तंतोतंत खरी आहे, अशी प्रतिक्रीया दिली. "हे सगळे मंत्रीपदासाठी उत्सुक होते. मग त्यांनी आतापर्यंत पदभार का स्विकारला नाही. खातेवाटप हे मागच्या महिन्यात झालं त्यानंतर अधिवेशन झालं. गणेशोत्सव झाला. अनंत चतुर्दशी पर्यंत यांच्याकडे वेळ होता पण तरीही त्यांनी पदभार का स्विकारलेला नाही. कारण हे सगळे धर्मात बुडालेले लोक आहेत. यापुर्वी असं कधी व्हायचा प्रश्नच येत नाही शपथविधी झाला, खातेवाटप झालं की लगेच मंत्री आपापल्या दालनात जाऊन पदभार स्विकारायचे.

एकंदरीत काय तर पितृपक्षात शुभकार्य टाळणं ही निव्वळ अंधश्रध्दा आहे असं आपल्याला दा कृ सोमण यांच्या प्रतिक्रीयेवरून कळतं. तर हेमंत देसाई आणि नागेश केसरी यांच्या प्रतिक्रीयेतून आपल्याला मंत्री महोदयसुध्दा अंधश्रध्देला बळी पडतात हे दिसुन येतं. दा. कृ. सोमण यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षात कोणतीही चिंता न करता हवं ते काम करू शकतं जर पितर असतील तर ते आपल्याला आशिर्वाद देण्यासाठीच येत असतील. जे काही काम करायचं आहे ते आपल्या पुर्वजांच्या आशिर्वादाने करूयात.

Updated : 14 Sep 2022 7:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top