Home > मॅक्स ब्लॉग्ज > संघ हिंदूना एवढं बावळट का समजतो? - विश्वंभर चौधरी

संघ हिंदूना एवढं बावळट का समजतो? - विश्वंभर चौधरी

संघ हिंदूना एवढं बावळट का समजतो? - विश्वंभर चौधरी
X

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. त्यातच सत्ताधारी पक्षाचा नेहमीच अजेंडा राहीलेल्या राम मंदीराच्या मुद्द्यावर संघाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेले सरचिटणीस भय्याजी जोशी यांनी कुंभमेळ्यात बोलताना केंद्रातील भाजप आघाडी सरकारला राममंदिरासाठी आता सन २०२५ची मुदत दिली आहे. तसंच 'गुजरातच्या सोमनाथ मंदिराची उभारणी सन १९५२मध्ये झाल्यानंतर देशाच्या विकासाने वेग घेतला होता. अयोध्येतील राममंदिर उभारणीनंतरही तसेच होईल. हे मंदिर पुढील दीडशे वर्षांसाठी भारतासाठी अमूल्य ठेवा असेल’ असं देखी जोशी यांनी या विधान केलं आहे. भय्याजी जोशी यांच्या या विधानाचा सामाजीक कर्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आपल्या फेसबूक पोस्ट मधुन चांगलाच समाचार घेतला आहे.

काय आहे ही फेसबूक पोस्ट ?

मिळाली, मिळाली. हिंदूंना राममंदीरासाठी संघाकडून पुढची तारीख मिळाली! तारीखही नाही, वर्ष मिळाले. 2025! आता 2025चा मुहूर्त फार हुशारीनं काढलेला आहे. 2019 आणि 2024 अशा दोन सार्वत्रिक निवडणुकांची सोय झाली. भाजपाचा विजय हेच संघाचं अंतिम उद्दीष्ट आहे. त्यामुळे हे वर्ष. संघ राजकारणात नाही वगैरे मखलाशी होईलच पण ते ढोंग अनेकदा उघडं पडलेलं आहे.

पण प्रश्न तो नाही. प्रश्न हिंदूंना बुद्दू समजण्याचा आहे. मोदी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले असल्यानं मंदीराशिवाय त्यांना पर्याय नाही हेही मान्य पण त्यासाठी हिंदूना मुर्खात काढण्याची खोडी संघानं का करावी हा खरा प्रश्न आहे.

कोणता हिंदू यांना दररोज जाऊन म्हणतो की आम्हाला मंदीर पाहिजे? कोणत्या हिंदूला हा जीवनमरणाचा प्रश्न वाटला?

काही लाख हिंदू शेतकर्यांनी देशात आत्महत्त्या केलेल्या आहेत. करोडो हिंदू शेतकरी शेती व्यवसायात अडचणीत आलेले आहेत. करोडो हिंदू बेरोजगार हलाखीच्या परिस्थितीशी झुंजत आहेत. देशात चांगली आरोग्यसेवा नाही याचा फटका, शिक्षणाच्या दारिद्र्याचा फटका करोडो हिंदूंना बसत आहे. पाण्यासाठी एक सामान्य खेडूत हिंदू स्त्री सरासरी अडीच किलोमीटर दररोज चालते. हिंदूच रहात असलेल्या साडे सहा लाख खेड्यांमधल्या तब्बल तीन लाख खेड्यांना शाश्वत पाणी पुरवठा मिळू शकत नाही. तब्बल दोन लाख खेड्यांना शाश्वत वीज पुरवठा नाही. खेड्यातले रस्ते, जिथं हिंदूच बहुसंख्येनं राहतात, ते रस्ते वाहतुकीयोग्यच नाहीत.

अशा दयनीय अवस्थेतील हिंदू जर सगळं सोडून फक्त दररोज सकाळी भैय्याजी जोशींना मंदीर मागत असतील तर हिंदूची बौद्धिक अवस्था दयनीय आहे असंच म्हणावं लागेल! इथला हिंदू एवढा बावळट नाही. सहनशील आहे पण वेडा नक्कीच नाही.

प्रश्न असा आहे की संघ हिंदूना एवढं बावळट का समजतो? मंदीराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. संघानं काहीही केलं तरी न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत काहीच घडू शकत नाही. भैय्याजी जोशींना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे की तुम्ही 2025 ची तारीख देताय पण सुप्रीम कोर्टानं पुढच्या महिन्यात निर्णय दिला तर काय?

सारांश, राममंदीर ही संघासाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि 2019 मध्ये मोदी प्रचंड अडचणीत असतांना कोंबडी कापून खाणे संघाला परवडत नाही. 2019 आणि 2024 ची दोन अंडी मिळवल्या नंतरच 2025 साली कोंबडी कापण्याचा संघ विचार करील आणि हिंदू जर उल्लू बनत राहिले तर कायम फक्त सोन्याची अंडी घेण्याचा प्रयत्न करील. जोशींच्या आजच्या 'तारीख पे तारीख'चा एवढाच अर्थ आहे.

Updated : 19 Jan 2019 5:33 AM GMT
Next Story
Share it
Top