Home > Election 2020 > चौकीदार मोदींना कशाची भीती वाटतेय ?

चौकीदार मोदींना कशाची भीती वाटतेय ?

चौकीदार मोदींना कशाची भीती वाटतेय ?
X

मी या देशाचा चौकीदार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं सांगत आहेत. मोदींच्या चौकीदारीचा कित्ता त्यांच्या समर्थकांनीही गिरवला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीनं मोदींच्या सभांमध्ये सुरक्षेचं कारण पुढं करून येणाऱ्या लोकांवर निर्बंध टाकली जात आहेत, त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मोदी स्वतःला चौकीदार म्हणवून घेत आहेत त्यामुळं त्यांना कशाची भीती वाटतेय ज्यामुळं मोदींच्या सभांना येणाऱ्या लोकांवर निर्बंध घातले जात आहेत.

पंतप्रधान पदावरील व्यक्तीची सुरक्षा महत्त्वाचीच पण...

पंतप्रधानपदावरील व्यक्ती हे देशाशी संबंधित निर्णय घेत असल्यानं त्या व्यक्तिच्या जिवीताला धोका अपेक्षित आहे. देशानं इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोन पंतप्रधानाना गमावलेलं आहे. ते सुरक्षेतील हलगर्जीपणामुळेच. मात्र, एरव्ही मोदींच्या सभांमध्ये त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेव्यतिरिक्त सभांना येणाऱ्या लोकांवर फारसे निर्बंध लादले जात नव्हते.

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात केल्यानंतर मिळत असलेला प्रतिसाद पाहून त्यांच्या सभांच्या सुरक्षेवर निर्बंध घातले जाऊ लागले आहेत. या पदावरील व्यक्तीची सुरक्षा महत्त्वाची आहेच पण स्वतःचा चौकीदार, प्रधानसेवक म्हणून उल्लेख करून घेणाऱ्या मोदींच्या सभांना येणाऱ्या लोकांवर निर्बंध घातले जाऊ लागल्यानं मोदींना नेमकी कशाची भीती वाटते, असा प्रश्न उपस्थित होतोय.

लोकसभा निवडणुकीच्या काळातच मोदींच्या सभांवर निर्बंध ?

१७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मोदींनी देशभरात प्रचार सभांना सुरूवात केली. मात्र, मोदींच्या सभा ज्या ठिकाणी होत आहेत, तिथल्या सभांवर निर्बंध घालण्याचं प्रमाण वाढत चाललंय. १२ एप्रिलला मोदींची अहमदनगरमध्ये सभा झाली. त्यावेळी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली होती.

मोदींच्या या सभेमध्ये काळे कपडे दाखवून त्यांचा निषेध केला जाण्याची भीती सुरक्षा यंत्रणांपेक्षा भाजप सरकारला अधिक वाटत होती, अशी टीका सुरू झाली होती. राजस्थानमधल्या चित्तोडगड येथेही मोदींच्या सभेमध्ये सामान्य नागरिकांना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतलं. PACL या चिटफंड घोटाळ्यातील पीडित लोकांनी मोदींचे मुखवटे, भाजपचे पट्टे गळ्यात घालून सभेत प्रवेश मिळवला होता, आणि सभा सुरू होताच त्यांनी ‘पहले पीएसीएल का भुगतान, फिर करेंगे मतदान’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली.

या निदर्शकांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं. कारण सर्वोच्च न्यायालयानं या पीडित खातेदारांना पीएसीएल कडून त्यांचे थकीत पैसे सहा महिन्यात मिळवून देण्याचे आदेशच सेबीला दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यानं संतप्त लोकांनी आपल्या भावना मोदींपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रकार केला असल्याचं पोलिसांना सांगितलं.

मोदीजी तपासणीला का घाबरले ?

कर्नाटक केडरचे आयएएस अधिकारी महमद मोहसीन हे सध्या निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी म्हणून ओदिशा इथं कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांनी मोदींच्या विमानाची तपासणी केली म्हणून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई करतांना एसपीजी किंवा पंतप्रधान पदावरील व्यक्तीशी संबंधित प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. मात्र, मोदी हे मि. क्लिन असतील तर त्यांनी संबंधित आयएएस अधिकाऱ्याला विमानाची तपासणी का करू दिली नाही, असा प्रश्न विरोधकांनी विचारलाय.

मोदींच्या सुरक्षेचा निर्णय पोलिसांचा – विनोद तावडे, शिक्षणमंत्री

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसंदर्भात काय पावलं उचलली पाहिजेत, याचा निर्णय स्थानिक पोलिस घेत असतात.

मोदींना भीती कशाची वाटतेय ? – नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

मोदींच्या सभांना आता प्रतिसाद मिळत नाहीये. उलट अशा सभांमधून रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून मोदींच्या सभांना येणाऱ्या लोकांवर निर्बंध लादले जात आहेत.

अशी असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था

पंतप्रधानांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही एसपीजी (स्पेशल प्रोटक्शन ग्रुप) वर असते. देशात फक्त ३ हजार एसपीजी कमांडोज् आहेत. या कमांडोजकडे आजी-माजी पंतप्रधान, त्यांचे कुटुंबिय यांच्याही सुरक्षेची जबाबदारी असते. याशिवाय पंतप्रधान देश-विदेशात जातील तिथं चोवीस तास त्यांना एसपीजीची सुरक्षा असते. याशिवाय एनएसजीची झेड प्लस सुरक्षा पंतप्रधानांना दिलेली असते.

Updated : 23 April 2019 12:40 PM GMT
Next Story
Share it
Top