News Update
Home > Election 2020 > मागासांवर अन्याय झाल्यावर आंबेडकरी जनता एकटीच का रस्त्यावर येते ? 

मागासांवर अन्याय झाल्यावर आंबेडकरी जनता एकटीच का रस्त्यावर येते ? 

मागासांवर अन्याय झाल्यावर आंबेडकरी जनता एकटीच का रस्त्यावर येते ? 
X

पायल तडवी प्रकरणी तिच्या आईचा आक्रोश बघून तरी निदान इतर समाजाच्या काळजाला पाझर फुटवा, असे जातीव्यवस्थेच्या बळींना वाटते. पण या देशातील सवर्ण मानसिकतेची शिकार झालेल्या लोकांचे काळीज माणसाचे राहिलेलं नाही, हे सत्य आपण का स्विकारत नाही ? ही मानसिकता सर्वव्यापी झाली आहे.

या प्रकरणातील बळी डॉ. पायल आदिवासी आहे म्हणून तिला न्याय देण्याचासाठी करावयाचा लढा ती ज्या छोट्या जमातीत जन्माला आली आहे त्याच जमातीने लढावा, असे जातिव्यवस्थेचे बळी असणाऱ्या इतरांना वाटते. खैरलांजी, खर्डा, सोनई, आणि इतर ठिकाणी आंबेडकरी समाजावर झालेल्या अत्याचाराच्या वेळी जे झाले तेच आज होताना दिसत आहे हे असे का होत आहे ? कारण फारच स्पष्ट आहे, आपण आतूनच खूप खूप खूप तुटलेले आहोत.

सवर्ण स्त्रियांवरील अत्याचारा वेळी उभा देश मेणबत्त्या घेऊन उभा राहतो, मग आत्ता का नाही ? असले भाबडे सवाल लोक करत आहेत. त्यांना हे कळत नाही की एका मजबूत श्रेणीबद्ध विषमतेच्या पोलादी तुरुंगातील आपण युद्ध कैदी आहोत, त्या तुरुंगाची साधी वीट जरी हलली तरी ते अभूतपूर्व एकीने जातिव्यवस्थेच्या रक्षणासाठी धावून येतात.

आपल्या आतल्या विभाजनावर आपण उपाय शोधत आपण नाही, परिणामी जातिव्यवस्थेच्या तळाशी असलेल्या दलित-आदिवासी स्त्रिया रोजच्या रोज अत्याचाराची शिकार होतात. हा समाज आज नव्हे तर पूर्वीपासूनच जातींनी दुभंगलेला समाज आहे, आणि आज त्याचा दुभंग शिगेला पोहचला आहे. अशा दुभंगलेल्या काळात किशोर मांदळे यांच्या सारख्या जन्माने तथाकथित वरच्या जातीत जन्मलेल्या एक मानवाने एक पत्र अत्याचार करणाऱ्या मुलींना लिहिले आहे, ते मुळातून वाचण्यासारखे आहे. अपवादानेच अशी माणसे आज जिवंत आहेत. या लोकांनी आपले माणुसकीने भरलेले काळीज कसे सांभाळले आहे ? असा प्रश मला पडतो. परंतु त्यांच्या सारख्या लोकांवरही अटीतटीच्या प्रसंगी विश्वास उरत नाही, शेवटी जन्माने सवर्ण असणाऱ्या मानवतावाद्यांनाही हे हलाल पचवावे लागते. अविश्वासाचा व्याकरण जातिव्यवस्थेच्या समर्थकांनी खूप आधी पासूनच प्रत्येक जातीच्या रक्तात मिसळून ठेवले आहे.

माणसाचा माणसावर विश्वास उरू नये अशा अविश्वासाच्या भयंकाराच्या टोकावर त्यांनी आम्हाला आणून ठेवले आह. जितक्या सूक्ष्म पातळीवर तुम्हाला विभाजित करता येईल तेवढे विभाजित करण्याची योजना मनुवादाने अविरत राबविल्या आहेत.

अत्याचारग्रस्त स्त्री कोणत्या जातीची स्त्री आहे, हे पाहून त्या त्या जाती आवाज करतात याचा अर्थ स्त्रिया जातीच्या मालकीच्या आहेत. त्यांचे स्वामित्व त्या जातीच्या पुरुषाकडे आहे. तथाकथित वरच्या जातीच्या स्त्री वर अन्याय झाला तर त्या जातीचे पुरुष विविध सत्तांच्या शिर्षस्थानी असल्याने ते सर्व सत्तांच्या माध्यमातून आवाज करणारच या उलट दलित, आदिवासी पुरुष या व्यवस्थेचे बळी असल्याने ते विभाजित असतात, जातीच्या सीमा त्यांच्या मनात स्पष्ट असतात, त्यांना इतर जातीच्या स्त्रीबद्दलचा आदर फक्त दाखवण्या पुरताच असतो. त्यामुळे बळी असलेले विभाजित पुरुष गप्प बसतात.

सवर्ण स्त्रिया सवर्ण पुरुषाच्या मालकीच्या असतात. त्यामुळं त्यांच्यावर ब्राह्मणी वर्चस्व काम करत असते सवर्ण स्त्रियांनी त्यांच्या गुलामीविरुद्ध चळवळ उभी केली तरी ब्राह्मणी नेणिवेच्या पाशातून त्यांना सहजासहजी मुक्त होता येत नाही. त्या सुद्धा जातिव्यवस्थेच्या संरक्षणाची बिनपगारी चाकरी करतात त्यामूळे त्यांनी मेणबत्त्या घेऊन बाहेर यावं, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

आज आदिवासी मुलीच्या अत्याचाराविरुद्ध बोलतायत फक्त आंबेडकरी प्रेरणा असलेले लोक. आणि उद्या रस्त्यावर आले तरी तेच लोक असतील. परंतु त्या छावणीतही अपवाद म्हणून काही संकुचित जातीयवाद अलीकडे वाढू लागले आहेत. आमच्यावर अत्याचार होतात तेव्हा तुम्ही बाहेर येत नाही तर आम्ही तरी कशाला तुमच्यासाठी रस्त्यावर यावे, असा वरवर खरा वाटणारा पण आतून आंबेडकरी परंपरेला आणि प्रेरणेला पोखरणारा युक्तिवाद ते करतात. ज्याचे लढे त्यांनीच लढावेत, असा ठेका ते धरतात. परंतु व्यापक आंबेडकरी जनता त्यांना अजूनतरी जुमानत नाही. काल आणि आज हीच आंबेडकरी प्रेरणेची मंडळी रस्त्यावर आली, एक मोठ्या पराभवाचे दुःख जिव्हारी लागले असताना हे रस्त्यावर आले म्हणून त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

खैरलांजी, रोहित वेमूला आणि इतर प्रकरणांसारखेच हे प्रकरण लवकरच विस्मृतीत जाईल कारण अशा अत्याचारा विरुद्ध लढण्यासाठी सातत्यपूर्ण काम करेल अशी चळवळ आपल्याकडे उरली नाही. आपण त्या बाबतीत चिंतन आणि कृतीचा विचार केले पाहिजेत. सवर्ण स्त्रियांच्या स्त्रीमुक्ती संघटनांच्या काही मर्यादा असू शकतात पण याच स्त्रिया उद्या या ब्राह्मणी छावणीला खिंडार पाडून आपल्या सोबत येण्याची शक्यता ज्यास्त आहे, येणारे संकट खूप मोठे आहे. त्या संकटातून पार होण्यासाठी आपल्याला व्यापक व्हावे लागेल. बेरीज करावी लागेल. मित्र वाढवावे लागतील. कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले आहे की, जातीपातीच्या पल्याड जाऊन माणुसकीच्या रक्षणार्थ आपल्यालाच लढावे लागेल, आणि मनुवादाच्या तुरुंगातून बाकीच्या बळींची सुटका करावी लागेल.

शाहीर संभाजी भगत

Updated : 28 May 2019 8:06 AM GMT
Next Story
Share it
Top