Home > मॅक्स रिपोर्ट > खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त कधी ? दहा वर्षांची प्रदीर्घ प्रतिक्षा

खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त कधी ? दहा वर्षांची प्रदीर्घ प्रतिक्षा

पालघर जिल्ह्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर नवे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे ही मागणी दहा वर्षापासून होत आहे. उपचारांच्या आधुनिक सुविधा नसल्याने येथे आलेल्या रुग्णांना मोखाडा येथे रेफर केले जाते. खोडाळा ते मोखाडा या प्रवासातच अनेक रुग्णांचे उपचाराविना मृत्यू होत आहेत. वाचा आदिवासींच्या आरोग्याचा रवींद्र साळवे यांनी मांडलेला लेखा जोखा…

खोडाळा ग्रामीण रुग्णालयाला मुहूर्त कधी ?  दहा वर्षांची प्रदीर्घ प्रतिक्षा
X

“दोन महिन्यापूर्वी माझ्या सात वर्षाच्या छायाला सर्पदंश झाला. आम्ही उपचारासाठी तात्काळ खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले .परंतु तिथल्या डॉक्टरांनी तिच्यावर वेळेत उपचार केला नाही. बराच कालावधी उलटल्यानंतर माझ्या मुलीची तब्येत आणखी बिघडली. परंतु तिथे सुविधा नसल्याने आम्हाला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले . अर्ध्या रस्त्यातच माझ्या मुलीचा मृत्यू झाला .हि घटना आमच्या आयुष्याला अतिशय चटका लावणारी आहे. यामुळे येथील आरोग्य विभागाचा कारभारात सुधारणा व्हावी .अशी घटना पुन्हा कुणाच्याही बाबतीत घडू नये .यासाठी खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे”.






ही प्रतिक्रिया आहे सर्पदंशाने मृत झालेल्या छायाची आई जनी सखाराम भोई यांची. केवळ छायाच नाही तर अनेकांचा मृत्यू खोडाळा ते मोखाडा या रस्त्यात उपचाराविना झाला आहे.

काशिनाथ भोई यांच्या आयुष्यात असाच संतापजनक प्रकार घडला आहे. मॅक्स महाराष्ट्रसोबत बोलताना ते सांगतात “माझ्या मुलीला फेब्रुवारीमध्ये प्रसूतीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते .परंतु तिथे सोयीसुविधा नसल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे पाठवण्यात आले. खोडाळा ते मोखाडा एक तासाच्या प्रवासात वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच तिच्या बाळाने जीव सोडला. आमच्या आयुष्यात जे घडले आहे ते दुसऱ्या कुणाच्या बाबतीत घडू नये यासाठी खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करावे”. .

मुंबई या राजधानीपासून अवघ्या 100 कि.मी. अंतरावर पालघर जिल्हाचे शेवटचे टोक म्हणजे मोखाडा तालुका. दादरी डोंगरात वसलेला व भौगोलिक दृष्ट्या विखुरलेला आदिवासी बहुल मोखाडा तालुका. तालुक्यात खोडाळा ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. परिसरातील खेड्यापाड्यातील लोकांची येथे मोठी वर्दळ असते. मात्र येथील आरोग्य सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे मागील 8 ते 10 वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली जात आहे.परंतू ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आजही दफ्तरदिरंगाई मुळे लालफितीत अडकला आहे.





मोखाडा तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णलयाचा दर्जा देऊन ग्रामीण रुग्णालय उभारावे .तर मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन उपजिल्हा रुग्णालय उभारावे अशी मागणी आम्ही सातत्याने सरकारी दरबारी करतो आहोत. खोडाळा मोखाडा हे अंतर २० ते २५ कि.मी.चे आहे .यामुळे वेळेवर उपचार सेवा न मिळाल्याने पुढील उपचारासाठी आटापिटा करत असताना अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कधी कधी खोडाळा येथील पुढील उपचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालय पाठवले जाते तेथून नाशिक किंवा ठाणे पाठवले जाते आणि या हेलपाट्यातच अनेक बळी गेले आहेत. याचा सरकारने गांभीर्य पूर्वक विचार करून खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्यात यावे. अशी मागणी मोखाडा पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप वाघ यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना केली आहे .

खोडाळा गांव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि नाशिक जिल्ह्यातील श्रीघाट,देवगाव, वैतरणा, आस्वली, कोजूली, सामूंडी ते थेट पहिणा येथूनही खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वाढणारा रुग्णांचा प्रभाव लक्षात घेऊन खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय करण्याचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडून आहे.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला परिसरातील २४ महसुली गावे आणि जवळपास ६० हून अधिक गावपाडे संलग्न आहेत. त्यातच इगतपुरी व त्र्यंबक तालुक्यातील रुग्णांचा ओघही मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामानाने कमी पडणारी आरोग्य सेवा आणि संदर्भ सेवा मिळवताना आदिवासी निष्कांचन रुग्णांची होणारी दमछाक लक्षात घेऊन शासनाने येथील ग्रामीण रुग्णालयाला तातडीने मंजुरी देणे क्रमप्राप्त होते. परंतू हाकेच्या अंतरावर वाडा येथे अद्ययावत सुविधा प्राप्त होतील अशा परळी आरोग्य केंद्राचा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव लगबगीने मंजूर करुन शासनाने ख-या गरजवंताना सापत्नभावाची वागणूक दिली असल्याची लोकभावना ऐकायला मिळत आहे.





मोखाडा तालुक्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रे ४, आरोग्य पथके, दक्षता पथके ३ रेस्क्यू कॅंप ७ , आयूर्वेदिक दवाखाना १ आणि तब्बल २१ उपकेंद्राची उपाययोजना करुन लाखो रुपयांचा खर्च केला व करीत आहे.त्यापैकी खोडाळा विभागात १ प्राथमिक आरोग्य केंद्र , ३ आरोग्य पथकं , ६ उपकेंद्र आणि २ रेस्क्यू कॅंप च्या माध्यमातून आरोग्य सेवा कार्यरत आहे. मात्र असे असतानाही येथील सामान्य जनतेला अधिकची आरोग्य सेवा मिळविण्यासाठी जव्हार, मोखाडा नासिक येथे जिल्हा रुग्णालयावर अवलंबून रहावे लागत आहे.त्यामूळे परिसरातील नागरिकांना स्थानिक ठिकाणीच उत्तम आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथील जनता खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे म्हणून शासनाच्या कानी कपाळी ओरडून दाद मागत आहे.परंतू शासनाकडून ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तव मागणीकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे नाराजीचा सूर निघत आहे.

तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व निकषांत बसत असल्याचा प्रस्ताव आरोग्य संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक पालघर यांचेकडे सादर केला आहे. परंतू त्यावर कार्यवाही मात्र शुन्य आहे.त्यामूळे मागील ८-१० वर्षांची न्याय्य मागणी येथील तमाम आदिवासी बांधवांसाठी केवळ अरण्यरुदन ठरलेली आहे.

खोडाळा ग्रामीण रुग्णालयासाठी शिवसेना आग्रही मागणी करत आलेली आहे. तसेच खोडाळा ग्रामपंचायतीने प्रत्येक वेळी ग्रामसभेचे ठराव पास करून सादर केले आहेत. तसेच ५९८ मधील १.६३.८० हेक्टर जागाही उपलब्ध करून देण्याची तरतूद केली आहे. परंतू शासन त्याबाबत कमालीचे उदासीनता दाखवत आहे.

खोडाळा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव

आरोग्य विभागाकडे प्रलंबित असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांनी सांगितले.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात २० पदे मंजूर असून त्यातील १६ पदे रिक्त आहेत त्याचा तपशील खालील प्रमाणे

आरोग्य सहाय्यक १ पद रिक्त

पारिचारिका १ पद रिक्त

आरोग्य सहाय्यिका १ पद रिक्त

आरोग्य सेविका २ पदे रिक्त

औषध निर्माण अधिकारी १ पद रिक्त

प्र वैज्ञानिक अधिकारी १ पद रिक्त

परिचर ( शिपाई ) ३ पदे रिक्त

सफाई कामगार २ पदे रिक्त

लिपिक १ पद रिक्त

डाटा ऑपरेटर १ पद रिक्त

एकूण २० मंजूर पदांपैकी केवळ ६ पदे भरलेली

सुमारे १४ पदे रिक्त

मागील चार वर्षात २ हजार ६५ मातांना प्रसूतीसाठी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तर सोयीसुविधा अभावी ७३६ मातांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर २४ महसूल गावे तसेच ६० गावपाड्यांतील आदिवासी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणारे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे .येथे सन २०१९ मध्ये ३६० मातांची प्रसूती खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली .तर १९६ मातांना सोयीसुविधा अभावी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले .मोखाडा ग्रामीण रुग्णालय व इतर ठिकाणी पाठवण्यात आले

सन २०-२१ मध्ये खोडाळा पीएसीला प्रसूतीसाठी ३९७ मातांना दाखल करण्यात आले .यामधील फक्त ७५ मातांचीच प्राथमिक खोडाळा प्राथमिक केंद्रात प्रसूती झाली. यामधील तब्बल ३२५ मातांना सोयीसुविधा अभावी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले .

सन २१-२२ मध्ये मध्ये ४१३ मातांना प्रसूतीसाठी दाखल केले .यामधील २२१ मातांची प्रसूती येथेच झाली .तर १९२ मातांना पुढील उपचारासारासाठी पाठवण्यात आले .

सन २२-२३ मध्ये ५८४ मातांना प्रसूतीसाठी दाखल केले .यामधील एप्रिल ते जुलै १९ मातांना प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले .

मागील चार वर्षात सर्पदंशाच्या ४९२ घटना घडल्या यामधील सोयीसुविधा अभावी ६१ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले .

सन १९-२० मध्ये १०९ सर्पदंशाच्या घटना घडल्या .

सन सन २०-२१मध्ये १३५ सर्पदंशाच्या घटना घडल्या .यामध्ये २२ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले .

सन २१-२२ मध्ये १८९ सर्पदंशाच्या घटना घडल्या यामधील २६ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले

सन २३मध्ये ५९ सर्पदंश्याच्या घटना घडल्या. यामधील १३ रुग्णांना पुढील उपचारासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यामध्ये वेळेत उपचार न मिळाल्याने एकाच मृत्यू झाला आहे.

अशा प्रकारे आदिवासी जनतेचा जीवन मरणाचा असलेला हा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन सोडवावा अशी आदिवासी जनतेची मागणी आहे.


Updated : 17 July 2023 1:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top