Home > मॅक्स रिपोर्ट > हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनांचे सत्र कधी थांबणार?

हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनांचे सत्र कधी थांबणार?

हॉस्पिटलमधील आगीच्या दुर्घटनांचे सत्र कधी थांबणार?
X

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमधील आयसीयूमध्ये लागलेल्या आगीने ११ जणांचा बळी घेतला आहे. राज्यात पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. पण यंत्रणांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे नगरच्या दुर्घटनेवरुन सिद्ध झाले आहे. राज्यात याआधी हॉस्पिटलमध्ये अशा किती घटना घडल्या आहेत आणि त्यात किती बळी गेले आहेत, त्यावर एक नजर टाकूया...

वर्षाच्या सुरूवातीला म्हणजेच ९ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांच्या आयसीयूमध्ये आग लागली होती. या आगीमध्ये 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. ७ बाळांना वाचवण्यात यश आले होते. यानंतर राज्यातील सर्व हॉस्पिटलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण यानंतर राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

भंडाऱ्याच्या घटनेनंतर दोनच महिन्यात २६ मार्च रोजी मुंबईतील भांडूपमध्ये एका मॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोवीड रुग्णालयात आग लागली होती. या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही राज्यभरात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या.

9 एप्रिलला वाडी नागपूरमधील वेल्ट्रीट कोविड केअर सेंटरला आग लागली. या आगीत 4 रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू झाला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 21 एप्रिल रोजी नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली होता, या घटनेत 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गळतीमुळे ऑक्सिजन पुरवठा थांबला आणि त्याअभावी २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांची २३ एप्रिल रोजी विरारमध्ये विजय वल्लभ रुग्णालयात आग लागून १३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. इथेही ICU मध्ये आग लागली होती.

एवढ्या घटना घडूनही यातील दोषींवर कारवाई होत नाहीये, बहुतांश आगीच्या दुर्घटना ह्या आयसीयूमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे ICU यंत्रणा एखाद्या हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करता आवश्यक ती खबरदारी आणि प्रक्रिया पार पाडली जात नाहीये का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

Updated : 6 Nov 2021 3:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top