Home > मॅक्स रिपोर्ट > अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा परिणाम आहे का ?

अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा परिणाम आहे का ?

अवकाळी पाऊस, वातावरण बदलाचा परिणाम आहे का ?
X

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि मुंबईसह काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. महाराष्ट्राबरोबर देशातील काही भागात हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याची सुरुवात होत असताना अवकाळी पाऊस पडतो. मात्र यावेळचा अवकाळी पाऊस हिवाळ्यातच सुरू झाला आहे. त्याचबरोबर पुढचे पुढील चार दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याआधी 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. सोमवारी सकाळपासूनच मुंबई ठाणे , नवी मुंबई , पालघर , वसई-विरार, नाशिक या हरांमध्ये पावसाने हजेरी लावली.

दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जागतिक "पर्यावरण विषयक आणीबाणी" जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर जागतिक कोरोना महामारीनंतर पर्यावरण रक्षणाचा आराखडा तयार करण्याचं आवाहन देखील अँटोनियो गुटेरेस यांनी केलंय. त्यांनी पुढे म्हटलं आहे की "भविष्यातील सुरक्षा, समृद्धी कायम ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनासाठी आपण ठोस पावलं उचलण्याची गरज आहे"

अवकाळी पाऊस म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैर्ऋत्य मोसमी वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकतात. तसंच अवकाळी पावसाचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात कुठेही तयार होऊ शकतो.

अवकाळी पावसाची कारणं :

ज्याप्रमाणे जागतिक वातावरणात बदल होतात तसेच स्थानिक वातावरणामध्येही बदल होत असतात. जगभरातील विविध देशात पडणारा पाऊस हा तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. भारतातला मान्सून दोन भागांमधून येतो एक बंगालच्या उपसागरातून आणि दुसरं अरबी समुद्रातून, हे दोन्ही वारे संपूर्ण भारतात पसरतात. अवकाळी पाऊस हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होतो, ज्याची तीव्रता भौगोलिक परिस्थितीनुसार कमी -जास्त होत असते.

अवकाळी पावसाची नेमकी कारणं काय आहेत याबाबत पर्यावरण तज्ज्ञ गिरीश राऊत सांगतात,

" हवामान बदलांसंदर्भातला पॅरिसमधील जागतिक हवामान करार लेखी आहे. १९५ देशांच्या प्रतिनिधींनी त्यावर सह्या केल्या. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढ २ डिग्रीच्यावर ओलांडायला नको. ही वाढ यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झाली. मानवजात वाचवायची असेल तर २ डिग्रीच्या वर वाढ होऊ द्यायची नाही हे पॅरिस करार सांगतो. मात्र ती वाढ यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झाली, असा अहवाल नासाने दिला. कोळसा, तेल, गॅस, सिमेंट यांसारख्या जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून उत्सर्जन होते. तापमान वाढीत कार्बन डाय-ऑक्साइडचा वाटा ९० % आहे. अवकाळी पाऊस कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन नायट्रोजन डायऑक्साइड यांच्या उत्सर्जनामुळे येतो. अंटार्क्टिक, ग्रीनलँडमधील बर्फ प्रतिवर्षी प्रचंड प्रमाणात वितळतो, याची वाफ आणि महासागराची वाफ पृथ्वीच्या वातावरणात अतिरिक्त प्रमाणात साठत जाते. या वाफेला थंड हवेचा संपर्क आल्यास ती पावसाच्या, बर्फवृष्टी गारांच्या रूपात पृथ्वीवरती कोसळतात. जर तुम्ही याचा शेतीशी संबंध जोडला तर यापुढे रब्बी पिकं येणार नाहीत. दरवर्षी याचं प्रमाण वाढत जाणार आहे."

असं मत गिरीश राऊत यांनी सांगितलं. हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे सांगतात,


"दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील पाण्याचं तापमान कमी होतं तेव्हा हवेचा दाब वाढत जातो. तेथील हवेचे बाष्प दक्षिण आशियाकडे सरकते. दक्षिण आशियातील भारत, श्रीलंका,बांग्लादेश आणि इंडोनेशियात अवकाळी पाऊस राहण्याची शक्यता जास्त आहे, असे मतं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशांत महासागराचे तापमान ऑगस्ट महिन्यापासून २-३ अंश सेल्सियसने कमी झालं आहे. हे तापमान २१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत थंड राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता डिसेंबर, (२०२१)जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वर्तवली आहे. जिथे हवेचा दाब कमी होतो तिथे मोठ्या प्रमाणात वारा बाष्प घेऊन वाहू लागतो. अवकाळी पावसला समुद्राच्या पाण्याचे तापमान देखील कारणीभूत ठरते. पाण्याचे अंतर्गत प्रवाह असतात पाण्याचे तापमान किती आहे यावर ते अवलंबून असतात. पाण्याच्या तापमानामुळे हवेमध्ये बदल दिसून येतात. हवामानाचा परिणाम पिकांवर दिसून येतो. रब्बी पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम दिसतो. या दशकातील २०१२ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला २०१५, २०१८ मध्ये गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. २०१९ चा विचार केला तर ऑगस्ट,सप्टेंबरमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याचवेळी मराठवाड्यात दुष्काळ होता या दोन भिन्नं परिस्थितीला हवामान बदल म्हणतात. "

"पर्यावरण विषयक आणीबाणी" विषयी विचारलं असता "

पर्यावरण विषयक आणीबाणी केव्हाच निर्माण झालीय" असं डॉ. रामचंद्र साबळे सांगतात.

औद्योगिकरणाला साधारणतः १७५०ला सुरवात झाली. यासाठी जगात इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. अर्थातच कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन वाढत गेले. विकसित देशात कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित तंत्रज्ञान विकसित केले गेले. मात्र त्याचा परिणाम या आकड्यांवरून दिसून येत नाही. union of concerned scientists चा डाटा पाहिलं तर सर्वाधिक कार्बन डाय-ऑक्साइडचे उत्सर्जन आशियाई देशांमध्ये होते. 2018 मध्ये सर्वाधिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित करणाऱ्या २० देशांमध्ये चीन १ नंबरतर भारत तिसऱ्या नंबर वर आहे. याचाच अर्थ भारत आणि चीन या वेगाने विकसित होणाऱ्या देशांद्वारे उत्सर्जन वाढत आहे. गेल्या दीडशे वर्षांत कार्बन डाय ऑक्साइड आणि मिथेन यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं डाटा दर्शवत आहे.

औद्योगिक-पूर्व काळापासून जागतिक सरासरी तापमानात 1% पेक्षा जास्त वाढ झाली आहे : स्रोत - ourworldindata.org



ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन डाटा : स्रोत - United States Environmental Protection Agency




सीओ 2 उत्सर्जनाचा प्रत्येक देशाचा वाटा : स्रोत - union of concerned स्कीइंटिस्ट्स




2018 मध्ये सर्वाधिक कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जित करणारे 20 देश - स्रोत - union of concerned स्कीइंटिस्ट्स





Updated : 14 Dec 2020 12:21 PM GMT
Next Story
Share it
Top