बांदिवडेकरांच्या उमेदवारीचे निकष काय – अकबर खलफे, ज्येष्ठ कार्यकर्ते, काँग्रेस
X
काँग्रेसनं रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडतांना चाचपणी बरोबर केली नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते अकबर खलफे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना केलाय. पक्षानं सांगितलं आणि कुणी बोलावलं तर काँग्रेसचा प्रचार करू, असंही खलफे यांनी स्पष्ट केलंय.
काँग्रेसचे या मतदारसंघातील उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी घोषित झाल्यापासूनच वादाला सुरूवात झालीय. सनातन सारख्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबधित असलेल्या वैभव राऊतच्या घरातून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्यानंतर राऊतच्या समर्थनार्थ उघडपणे मोर्चा, आंदोलनात सहभागी झालेल्या बांदिवडेकर यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बांदिवडेकरांच्या उमेदवारीचे निकष काय ?
मुळात बांदिवडेकर हे मुंबईत स्थायिक झालेले आहेत. वर्षांतून दोन-तीन वेळा ते भंडारी समाजाच्या कार्यक्रमांसाठी रत्नागिरीमध्ये येतात. बांदिवडेकर हे आधी भाजपमध्ये होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर ते काँग्रेसमधून बाहेरही पडले होते. तेव्हापासून बांदिवडेकर हे अ.भा.भंडारी समाज महासंघ या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे. काँग्रेसच्या मेरिटमध्ये बांदिवडेकरांची उमेदवारी बसत नाही. त्यामुळं याविरोधात दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर मी बाजू मांडली, त्यांनी ती ऐकूनही घेतलेली आहे, त्यामुळं आता पक्षश्रेष्ठींनी सांगितलं आणि कुणी बोलावलं तरच प्रचार करू, अशी स्पष्ट भूमिकाच बांदिवडेकरांविरोधात सर्वात पहिल्यांदा काँग्रेसमधून बोलणाऱ्या अकबर खलफे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना स्पष्ट केली.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतांची गणितं
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात मराठा समाजा नंतर दुसऱ्या क्रमांकाची एकगठ्ठा मतं आहेत ती भंडारी समाजाची. त्यानंतर गाभित (मच्छिमार) आणि वाणी समाजाची मतं आहेत. तर १० टक्क्यांच्या आसपास मुस्लिम समाजाची मतं आहेत. त्यामुळं बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र, सनातनशी असलेल्या तथाकथित संबंधांनंतर मतांच्या गणितांमध्ये बदल होईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळं केवळ भंडारी समाजाच्या मतांचा विचार करून कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्याचं समर्थन करणाऱ्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून बांदिवडेकर यांचा प्रचार करतील काय, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानीचे निलेश राणे यांच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात होती, ती आता वेगळ्याच वळणावर जातांना दिसतेय. त्यामुळं बांदिवडेकरांच्या उमेदवारीवरच नाराज असणारे काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते यांनीच बांदिवडेकरांसमोर आव्हान उभं केल्याचं चित्र सध्यातरी दिसतंय. विशेष म्हणजे, खासदार हुसेन दलवाई, आमदार हुस्नबानो खलिफे हे देखील प्रचारात फारसे सक्रीय दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीचा धर्म म्हणून व्यासपीठांवर दिसत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याप्रचारात मनापासून कामाला सुरूवात केल्याचं चित्र दिसत नाहीये.