Home > मॅक्स रिपोर्ट > Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातूनच का? काय आहे राजकीय अर्थ

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातूनच का? काय आहे राजकीय अर्थ

राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील फक्त पाचच जिल्ह्यांचा समावेश आहे? ही यात्रा महाराष्ट्रातील मराठवाडा आणि पुर्व विदर्भातून जाते. मात्र या मार्गामागचं नेमकं राजकीय कारण काय? जाणून घेण्यासाठी वाचा...

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यातूनच का? काय आहे राजकीय अर्थ
X

राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा कर्नाटकमधील कामारेड्डी येथून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दाखल झाली. ही यात्रा नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. यात्रेचा महाराष्ट्रात 16 दिवस मुक्काम होता. मात्र, भारत जोडो यात्रेसाठी मराठवाड्यातील दोन आणि विदर्भातील तीन जिल्ह्यांचाच मार्ग का निवडला? यामागे कुठली राजकीय गणितं आहेत याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.

मराठवाड्य़ातूनच काँग्रेसच्या यात्रेला सुरूवात का ?

दक्षिणेतल्या तामिळनाडूतुन सुरु झालेली भारत जोडो यात्रा केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात दाखल झाली. पण ही यात्रा कर्नाटकमधून सोलापूरमार्गेही महाराष्ट्रात येऊ शकली असती. पण तसं न करता भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे प्राबल्य राहिले आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसनं या जिल्ह्याला दोनवेळा मुख्यमंत्रीपद, देशाचं गृहमंत्रीपद दिलेले आहे. यातच नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी चार विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्याबरोबरच 2014 च्या लोकसभा निवडणुंकामध्ये मोदी लाटेत राज्यात काँग्रेसचा सुफडा साफ झाला असताना नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव या दोघांचाच विजय झाला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांना पुन्हा ताकद देण्यासाठी यात्रेची सुरूवातच नांदेड जिल्ह्यातून करण्यात आल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळेच नांदेड जिल्हा हा लातूर जिल्ह्याला लागून असल्याने यात्रा नांदेड जिल्ह्यातून जात आहे. दिवंगत शंकरराव चव्हाण, डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर, विलासराव देशमुख, शिवराज पाटील-चाकुरकर असे मोठे महाराष्ट्र आणि देशाला याच मराठवाड्याने दिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसने आपल्या जुन्या बालेकिल्ल्यांना ताकद द्यायला सुरूवात केल्याचे यात्रेचा रोडमॅप बघितल्यावर स्पष्ट होते.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर हे आहेत. त्याबरोबरच यात्रेच्या मार्गातील नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार रिपाईचे राजेश पवार आहेत. मात्र 2014 मध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण या मतदारसंघाचे आमदार होते. लोहा मतदारसंघातही काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्याबरोबरच भोकर विधानसभा मतदारसंघाचे अशोक चव्हाण हे आमदार आहेत. नांदेडमध्ये मोहन हंबर्डे हे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसची मोठी ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेली. त्यामुळे या भागात काँग्रेसला मोठं शक्तीप्रदर्शन करणे शक्य झाले. त्याबरोबरच 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही या यात्रेचा फायदा व्हावा, या उद्देशाने ही यात्रा नांदेड जिल्ह्यातून गेल्याचे म्हटले जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथून भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातील दत्ती या ठिकाणी दाखल झाली. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे हिंगोली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यातून 2014 साली मोदी लाट असतानाही काँग्रेसचे राजीव सातव हे निवडून आले होते. मात्र, 2019 च्या निवडणूकीत काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा पराभव झाला. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात पुन्हा काँग्रेसला उभारी देण्यासाठी भारत जोडो यात्रेचा मार्ग हिंगोली जिल्ह्यातून वळवण्यात आला.

भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघात दाखल झाली. कळमनुरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र 2019 च्या निवडणूकीत काँग्रेसचे संतोष टरफे यांचा संतोष बांगर यांनी पराभव केला. मात्र तरीही या मतदारसंघात काँग्रेसचे प्राबल्य आहे. यानंतर वास पांगरा हा यात्रेचा मार्गही कळमनुरी मतदारसंघात येतो. त्याबरोबरच फाळेगावमध्ये भाजप आमदार निवडून आले असले तरी या मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे हिंगोली बरोबरच परभणी जिल्ह्यावरही प्रभाव टाकण्यासाठी या यात्रेच्या मार्गात हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.

हिंगोली जिल्ह्यानंतर भारत जोडो यात्रा विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. या जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी रिसोड हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे रिसोडमध्ये भारत जोडो यात्रेसाठी मोठं शक्तीप्रदर्शन करणे शक्य होईल, म्हणून वाशिम जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यातून भारत जोडो यात्रेचा मार्ग नेण्यात आला आहे.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, 2014 मध्ये माणिकराव ठाकरे यांचा पराभव झाला. त्यामुळे पुन्हा हा बालेकिल्ला मिळवण्यासाठी काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून रणनिती आखली आहे.

वाशिमनंतर ही यात्रा अकोला जिल्ह्यात प्रवेश करते. यामध्ये पातूर, बाळापूरमार्गे ही यात्रा जाते. मात्र, या भागात काँग्रेसचे आमदार नसले तरी काँग्रेसला मानणारा आदिवासी समाज आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून या यात्रेचा मार्ग जातो. पुढे ही यात्रा अकोला जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करते.

बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर हा एकच मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. मात्र 2014 च्या निवडणूकीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन जागांवर काँग्रेसने मिळवला होता. मात्र, आता काँग्रेसच्या ताब्यात एकच जागा आहे. त्यामुळे पुन्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी या यात्रेचा फायदा होईल असे बोलले जात आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ते जळगाव जामोद हा मार्ग या यात्रेसाठी निवडण्यात आला आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांची सर्वात मोठी सभा शेगावमध्ये घेण्यात आली.

विदर्भात काँग्रेसचा दबदबा

स्वातंत्र्यानंतर विदर्भात कायम काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. विदर्भातील वाशिम, अकोला आणि बुलढाणा हे जिल्हे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिले आहेत. एवढंच नाही तर 2014 मध्ये विदर्भातून एकही खासदार निवडून आला नसताना 2019 च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने कम बॅक करीत बाळू धानोरकर यांना लोकसभेत पाठवले. विदर्भात एकूण 62 आमदार आहेत. त्यापैकी सध्या काँग्रेसचे 12 आमदार आहेत. त्यामुळे या भागातून काँग्रेसला थोडे जरी बळ मिळाले तरी राज्यात काँग्रेस प्रबळ होण्यासाठी वेळ लागणार नाही.

विदर्भातून नाना पटोले, यशोमती ठाकूर, बाळू धानोरकर, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, सुनिल केदार या दिग्गज नेत्यांची फौज आहे. मात्र तरीही विदर्भात काँग्रेसची ताकद कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांचा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोलीनंतर यात्रेचा मार्ग विदर्भातून जातो.

2009 मध्ये मराठवाड्यातील दोन आणि विदर्भातील तीन जिल्ह्यातून 42 आमदार निवडून आले होते. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या मार्गात एकूण 23 आमदार आहेत. त्यापैकी मराठवाड्यात 8 आणि विदर्भात 15 आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या हातून सुटलेले मतदारसंघ आपल्या ताब्यात पुन्हा मिळवण्यासाठी आणि आपला बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मराठवाडा विदर्भातून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आगामी काळातील निवडणूकांमध्ये फायदा होईल की नाही? ते पहावे लागणार आहे.


Updated : 2022-11-20T19:28:06+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top