Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा जगण्यासाठी संघर्ष

Ground Report : किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा जगण्यासाठी संघर्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले नाही. पण स्वराज्याची राजधानी असल्याचा मान मिळवलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये आजही मुलभूत सुविधा नाहीत. छत्रपतींच्या मावळ्यांच्या वंशजांना आजही या सुविधांसाठी संघर्ष करावा लागतो आहे. आमचे करस्पाँडन्ट धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट

Ground Report :  किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा जगण्यासाठी संघर्ष
X

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ले रायगडची निवड केली. इथूनच स्वराज्याचे तोरण बांधून आदर्श राज्यकारभाराचे धडे सबंध जगाला दिले. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करतोय. तर डिजिटल इंडियाचे स्वप्नही पाहतोय. मात्र आजही देशातील शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्याची किरणे व विकासाची गंगा पोहोचली नाही, हेच सातत्याने दिसून येतंय. स्‍वराज्‍याचा सूर्य ज्‍या डोंगर दऱ्या आणि कडेकपारीतून उगवला त्‍या किल्‍ले रायगडच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या गावांमध्‍ये आजही स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नाही.



इथे आजवर विकासाच्या किरणांनी स्पर्शच केला नाहीय. इथल्‍या अनेक वाडयावस्‍त्‍या वीज ,पाणी, रस्‍ते यासारख्‍या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. राजांसारखा कुणी मसीहा येईल व आमचे दुःख समस्या जाणेल, रयत पुन्हा सुखी होईल अशी आशाही आता येथील बांधवांपुढे मावळली आहे. मूलभूत गरजांसाठी पराकोटीचा संघर्ष, कोव्हिड सारख्या महामारीत एकवेळच्या जेवणासाठी कसरत, अनेक समस्यांचा विळखा यातूनही सरकारकडे मदतीची अपेक्षा, अशी परिस्थिती येथील धनगर बांधवांची आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगर वाडीतील व्यथा व वास्तव दाखविणारा हा ग्राऊंड रिपोर्ट धम्मशील सावंत मांडला आहे.



किल्‍ले रायगडच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या अनेक दुर्गम वाडया वस्‍त्‍यांपैकी एक आहे सांदोशी मलई धनगरवाडी. साधारण 40 ते 50 घरांची वस्‍ती. जवळपास 200 लोकवस्‍तीच्‍या गावातील लोक एकत्र येवून गावाकडे जाणाऱ्या रस्‍त्‍याची सध्या डागडुजी करताहेत. दरवर्षी त्‍यांना ही डागडुजी करावी लागते कारण गावात जाण्‍यासाठी कधी पक्‍का रस्‍ता तयार झालेलाच नाही. गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ओढे आहेत. परंतु त्‍यावर पूलच नाहीत. मग गावात गाडी पोहोचणे तर केवळ स्‍वप्‍नच. यंदा तर नेहमीची पायवाटदेखील अतिवृष्‍टीत वाहून गेली आहे.



येथील ग्रामस्थ सीताबाई ढेबे यांनी सांगितले की, "आमचे वाडवडील इथे राहायचे , आताच्या 50 वर्षाच्या कालावधीत बघितलं तर आजपर्यंतची आमची वाट खडतंरच आहे, रस्ता नाही, पाणी नाही आमचे हाल संपता संपत नाहीत."

येथील दत्ता ढेबे या तरुणाने सांगितले की, "महापुरात आमचा रस्ता वाहून गेलाय, त्यामुळे दळणवळण व वाहतूक कशी करावा हा प्रश्न पडला आहे. एखादा रुग्ण अथवा गर्भवती महिला यांना महाडमध्ये दवाखान्यात न्यायचे असेल तर खूप अडचणी येतात. रुग्णाला झोळीतून नेताना मोठे आव्हान असते, खड्ड्यातूंन व खडतर मार्ग तुडवत जाताना अनेक तास जातात. यात रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. येथील नदीतील विहीर वाहून गेली आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न देखील आम्हाला सतावतो आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन आमच्या समस्या कधी सोडवणार ?आम्हाला न्याय कधी मिळणार? हाच प्रश्न आम्हाला सतावतोय." अशा वेदना त्यांनी मांडल्या.



इथले ग्रामस्‍थ केवळ रस्‍ताच नाही तर आजही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. गावात वीज पोहोचली हे जरी खरं असलं तरी ती असून नसल्‍यासारखीच आहे. साधी टयुबलाईटही पेटत नाही. पाणीपुरवठा योजनेचे पाइपदेखील अतिवृष्‍टीत वाहून गेले, एवढंच काय गावातील एकमेव विहीरदेखील पावसाने हिरावून नेली. त्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍याची गंभीर समस्‍या गावात निर्माण झाल्याचे इथले गावकरी सांगतात.

गावकरी रंजन खांबे म्हणाले की, "रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावे वाड्या वस्त्या सुविधांपासून वंचित आहेत. येथील गावांना जोडणारे रस्ते खस्ते खातायेत, महत्वाचा पूल अतिवृष्टीत कोसळला आहे. त्यामुळे जाण्यायेण्याचा मार्ग बंद झाला आहे. गावांचा संपर्क तुटला आहे, पाईपलाईन वाहून गेलीय, त्यामुळे पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय."

एकीकडे किल्‍ले रायगडच्‍या संवर्धनासाठी कोटयवधींचा आराखडा तयार करण्‍यात आलाय. त्‍यातील काही कोटी खर्चदेखील झाले आहेत. परंतु त्‍याच्‍या पायथ्‍याशी असलेल्‍या मलई धनगरवाडी सारख्‍या वाडया मुलभूत सुविधांपासून कोसो दूर आहेत. छत्रपतींच्‍या मावळयांचे वंशज आजही घोटभर पाण्‍यासाठी वणवण भटकताहेत आणि चांगल्‍या रस्‍त्‍यासाठी सरकार दरबारी खेटरं झिजवताहेत. गावातील वयोवृदध नागरीक , शाळकरी विद्यार्थी यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. गर्भवती महिला आजही रुग्णालयात पोहचताना असह्य यातना भोगत आहेत.



आणखी एक गावकरी प्रकाश डोळस यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, "रायगडच्या पायथ्याशी वारंगी हे ऐतिहासिक गाव आहे. पण हे गाव नावाला ऐतिहासिक आहे, मात्र इथं प्रत्यक्ष सुविधा नाहीत. कच्चे रस्ते दरवर्षी वाहून जातात. दहा ते बारा हजार रुपये सातत्याने खर्च येतो. शहरांमध्ये नागरिकांना प्राथमिक सेवा सुविधा बऱ्यापैकी मिळतात, तर दुर्गम भागात देखील माणसे राहतात यांच्याकडे शासन प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ हालअपेष्टा भोगत आहेत. सरकारने या ग्रामस्तांना मूलभूत सेवा सुविधा पुरवाव्यात अशी अपेक्षा आहे.

प्रांताधिकाऱ्यांचे म्हणणे काय?

यासंदर्भात आम्ही प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, "संबंधित तलाठी यांना पाठवून मलई धनगरवाडी येथील नागरिकांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत, कोणकोणत्या अडचणी आहेत, याचा तपशील घेतला जाईल व या नागरिकांना त्यादृष्टीने सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून जलद पावले उचलली जातील.




आमदारांचे म्हणणे काय?

या प्रश्नावर महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्याशी आम्ही बातचीत केली यावेळी ते म्हणाले "रायगडच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगरवाडी येथील ग्रामस्थ ही देखील माणसे आहेत, त्यांना देखील मूलभूत सुविधा मिळणे गरजेचे आहे, या मताचे आम्ही आहोत. मधल्या काळात आम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून गावानजीक कच्चा रस्ता नेला होता. परंतु अतिवृष्टी व महापुरात हा रस्ता खचला आहे. पुन्हा नव्याने हा रस्ता करण्यासाठी निधीची तरतूद केली जाईल. तसेच ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांचा आढावा घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल".




स्वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आपण साजरा करत आहोत. पण जगातील महासत्‍ता बनण्‍याचे स्‍वप्‍न पाहणाऱ्या डिजीटल इंडियातील हे वास्‍तव केव्‍हा बदलणार हा खरा प्रश्‍न आहे.

Updated : 11 Oct 2021 11:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top