Home > मॅक्स रिपोर्ट > एसटीच्या संपाने गावगाडा थांबला; गैरसोय आणि त्रास, व्यवहार ठप्प

एसटीच्या संपाने गावगाडा थांबला; गैरसोय आणि त्रास, व्यवहार ठप्प

एसटीच्या संपाने गावगाडा थांबला;  गैरसोय आणि त्रास, व्यवहार ठप्प
X

दिर्घकाळ लाबंलेल्या एसटी संपाचा समाजातील अनेक घटकांना फटका बसत असून आता गावगाडा थांबून एसटीच्या संपाने जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे त्यामुळेच एसटी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागात दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून एसटी महत्वपूर्ण मानली जाते, मात्र एसटी बंद असल्याने एकूणच जनजीवनावर मोठा परिणाम झालाय. एसटीच्या संपामुळे जिल्ह्यातील गाव-खेड्यातील व्यवहार व जीवनक्रम अक्षरशः थांबला आहे. जिल्ह्यातील गावे व वाड्या विविध कारणांनी शहरी व निमशहरी भागांशी जोडल्या आहेत.

गाव व आदिवासी वाड्यापाड्यांतून शहराकडे व इतर मोठ्या गावात दूध, भाजी घेऊन येणारे विक्रेते व मजूर यांना एसटीचाच आधार आहे. मात्र एसटी संपामुळे त्यांची खूप मोठी गैरसोय होतांना दिसत आहे. शिवाय विविध प्रशासकीय व बँक कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांची कामे खोळंबली आहेत. शहर व मोठ्या गावातील बाजारपेठांमध्ये देखील शुकशुकाट पहायला मिळत आहे. एकूणच संपूर्ण ग्रामीण व शहरी भागाचे अर्थचक्र व व्यवहार थांबले आहेत.

जिल्ह्यात सध्या गावठी भाज्यांचा व कंदमुळांचा हंगाम जोरात सुरू आहे. येथील आदिवासी वाड्यापाड्यावरील आदिवासींना या गावठी भाज्या व कंदमुळे विकून उदरनिर्वाह चालतो. हे सर्व जिन्नस घेऊन त्यांना शहरातील व मोठ्या गावातील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी यावे लागते. मात्र आजघडीला एसटी बस बंद असल्याने अनेकांना अधिकचे पैसे देऊन खाजगी वाहनांनी यावे लागत आहे. तर काहीजणांना हे अतिरिक्त भाडे परवडत नसल्याने डोक्यावर हा भार घेऊन डोंगरवाटा तुडवत यावे लागत आहे. अशा परिस्थितीत येऊनही एसटी नसल्याने अनेक लोक बाजारहाट करण्यास बाहेर पडत नाहीत.

त्यामुळे त्यांना ग्राहक देखील मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे श्रम व पैसे वाया जात आहेत. दूध विक्रेत्यांची देखील अशीच अवस्था आहे. रोजचे उकडे टाकण्यास त्यांना यावेच लागते. मग उत्पादन खर्च आणि प्रवास खर्च याचा मेळ लागत नाही. अशावेळी त्यांना देखील नाईलाजाने पायीच वाट चालावी लागत आहे. असे ताई बावधणे या दूध विक्रेत्या महिलेने सांगितले. गावठी मासळी विक्रेत्यांना देखील संपाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांची मळणी व झोडणीची कामे अजूनही बाकी आहेत.

या कामांना मजुरांची अत्यन्त गरज आहे. मात्र वाड्यापाड्यावर राहणारे मजूर एसटी बस नसल्याने कामावर येऊ शकत नाहीत. शिवाय पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने त्यांना गाडी करून आणणे परवडत देखील नाहीत. त्यामुळे शेतीची कामे देखील खोळंबली आहेत. विविध दाखले, सातबारा उतारे, प्रशासकीय योजनांचा लाभ मिळविणे, जनधन खात्यातील रक्कम काढणे आदी कामांसाठी तालुक्याच्या व महसुली गावात जावे लागते. अशावेळी एसटी नसल्याने लोकांची ही सर्व कामे मार्गी लागत नाही आहेत. परिणामी लोकांना हातावर हात धरून बसावे लागत आहे. वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात जाणे देखील दुरापास्त झाले आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी कित्येक किमीची खडतर पायपीट करावी लागत आहे.

कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अधिकची रक्कम देऊन जावे लागत आहे. एसटीच्या संपाची झळ सर्वांनाच पोहचत आहे. परिणामी जिल्ह्यातील गावगाडा थांबला असून अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. संपामुळे बाजारात शुकशुकाट पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य बाजारपेठा या खेड्यापाड्यातील लोकांवर अवलंबून आहेत. एसटी संपामुळे लोकांना खरेदीसाठी बाहेर पडता येत नाही. त्यामुळे बाजारात ग्राहक कमी प्रमाणात येत आहेत. व्यवसायावर परिणाम झाला आहे, असे व्यापारी असोसिएशन, पालीचे उपाध्यक्ष प्रशांत खैरे यांनी सांगितले. तर संपामुळे लोकांची दैनंदिन कामे व व्यवहार सुरळीत होत नाही आहेत. प्रशासकीय व बँकांच्या कामांसाठी लोकांचा वेळ, श्रम व पैसा वाया जात आहे. शिवाय गैरसोय देखील होते. खाजगी वाहने अतिरिक्त भाडे घेत आहेत, असे सिध्देश्वर ग्रुपग्रामपंचायत उमेश यादव म्हणाले.

Updated : 2021-11-21T20:06:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top