Home > मॅक्स रिपोर्ट > गावची गावठाणं ड्रोनद्वारे होणार हायटेक

गावची गावठाणं ड्रोनद्वारे होणार हायटेक

राज्यातील गावठाणांचे पहिले सर्व्हेक्षण ब्रिटिश काळात झाले होते. स्वातंत्र्याच्या काळानंतर खेडेगावात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून जसं-जसा काळ पुढे सरकत गेला तस-तशा सुधारणा होत गेल्या. आजच्या आधुनिक युगात राज्यातील खेडेगावात अमुलाग्रह बद्दल झाले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान ड्रोनद्वारे सर्व्हे केल्याने गावठाणांची मोजणी वेगाने होणार असून त्यामुळे प्रत्येकाच्या जाग्याच्या सीमा निश्चित होणार आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट..

गावची गावठाणं ड्रोनद्वारे होणार हायटेक
X

सोलापूर जिल्ह्यात ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी सुरू असून या मोजणीत सर्व्हे ऑफ इंडिया,भूमिअभिलेख विभाग,ग्रामविकास विभाग आणि जमाबंदी विभाग सहभागी झाले आहेत. हा सर्व्हे सध्या गावोगावी सुरू असून येत्या काही दिवसात सर्व्हेचे काम पूर्ण होईल,असे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. गावठाणाचे सर्व्हे केल्याने सिटी सर्व्हेचे नकाशे भूमी अभिलेख विभागात उपलब्ध होणार असून सध्याच्या स्थितीत गावठाणे निश्चित नसल्याने प्रशासनाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गावात-गावात जागेचे वाद उफाळून आल्याचे दिसून येतात. जाग्याच्या वादातून भांडणे विकोपाला जावून अनेक ठिकाणी अनेकांच्या जीवावर भांडणे बेतली आहेत.

गावात रस्ते,घर जागा आणि अतिक्रमणे यांच्या सीमा निश्चित नसल्याने प्रशासना समोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. त्या आता ड्रोनद्वारे सर्व्हे केल्याने नाहीशा होणार आहेत. गावठाणाचे डिजिटल अभिलेख उपलब्ध होणार असून त्यामुळे जाग्याचे वाद कायमस्वरूपी मिटणार आहेत. राज्यात गावठाने डिजिटल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून यासाठी ड्रोन उडवताना सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना नैसर्गिक अडचणीचा सामना करावा लागत आहेत. या सर्व्हेद्वारे गावातील मालमत्ता फिक्स करून संबधित मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय कामे करताना हे कार्ड घर मालकांना उपयोगी पडणार आहे.

ड्रोनद्वारे होणाऱ्या सर्व्हेचे नागरिक आणि प्रशासनाला काय फायदे होतील

राज्यातील गावठाणांचे पहिले सर्व्हेक्षण ब्रिटिश काळात झाले होते. स्वातंत्र्याच्या काळानंतर खेडेगावात मोठ्या प्रमाणात बदल झाले असून जसं-जसा काळ पुढे सरकत गेला तस-तशा सुधारणा होत गेल्या. आजच्या आधुनिक युगात राज्यातील खेडेगावात अमुलाग्रह बद्दल झाले आहेत. ड्रोनद्वारे सर्व्हे केल्याने गावठाणांची मोजणी वेगाने होणार असून त्यामुळे प्रत्येकाच्या जाग्याच्या सीमा निश्चित होणार आहेत. यामुळे संबधित मालमत्तेचा नकाशा तयार होणार असून नकाशा तयार झाल्यानंतर जाग्याच्या मालकिवरून होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी सीमा रेषा निश्चित नसल्याने अथवा गावचा सिटी सर्व्हेचा नकाशा उपलब्ध नसल्याने कोणाची किती जागा आहे. याची माहिती उपलब्ध होत नव्हती. ती माहिती या ड्रोन सर्व्हेद्वारे उपलब्ध होण्यास होणार असून गावठाणातील मिळकतीचा डिजिटल नकाशा तयार होणार आहे.

सदरचा नकाशा संबधित मालमत्ता धारकाच्या मिळकत रजिस्टरला ग्रामपंचायत जोडण्याचे काम करणार आहे. गावच्या गावठाण हद्दीतील नियमाप्रमाणे चौकशी करण्यात येणार असून मिळकत पत्रिका व सनदा भूमी अभिलेख विभागामार्फत तयार करण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभाग गावातील मिळकतीचे जी.आय.एस. प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्याचे काम करणार आहे. या ड्रोन मोजणीद्वारे गावठाणातील प्रत्येक मिळकतदारांच्या मालकीच्या हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी,बांधकाम परवानगी,अतिक्रमण निर्मूलन यासाठी ग्रामपंचायतीकडे अभिलेख व नकाशे उपलब्ध होणार असून त्यामुळे गावात नियोजन आणि सुलभता निर्माण करण्यास मदत होणार आहे.





ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता या मालमत्ताकराच्या व्याप्तीत येणार असून त्यामुळे ग्रामपंचायतीच्या महसुलात वाढ होण्यास होणार आहे. ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक नमुना आठ नोंदवही आपोआप तयार होणार असून मालमत्ता हस्तातरणाच्या नोंदी सहज,सुलभ व पारदर्शक अद्ययावत होणार आहेत. गावातील ग्रामपंचायतीच्या मिळकतीचा व सार्वजनिक मिळकतीच्या सीमा निश्चित होवून जनतेला त्या माहितीसाठी सहज उपलब्ध होणार आहेत. ही सर्व माहीती ग्रामपंचायतीकडे उपलब्ध झाल्यास गावात जागे संदर्भात होणारे वाद कमी होणार आहेत.

ड्रोनच्या माध्यमातून गावातील गावठाणाचे घेतले जातात फोटो

ड्रोन गावा बाहेरून उडवले जात असून ते सुमारे चार ते पाच फुटाचे आहे. त्यामुळे गावातून ड्रोन उडवत असताना गावातील झाडे,विजेच्या तारा,घरे यांचा अडथळा येत असल्याने ड्रोन गावाच्या बाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेतून उडवले जात आहे. ड्रोन उडविण्याच्या आधी भूमिअभिलेख विभागाचे कर्मचारी गावातील रस्ते,घरे,सार्वजनिक मालमत्ताच्या बाजूने चुन्याच्या पांढऱ्या पावडरने रेषा मारण्याचे काम केले जाते. गावातील सर्व मालमत्ताना पांढऱ्या पावडरने रेषा मारून झाल्यानंतरच ड्रोन उडवले जाते. गावाबाहेरून ड्रोनने उड्डाण घेतल्यानंतर ते पाच किलोमीटर अंतरावरील गावातील पांढऱ्या पावडरने मारलेल्या रेषांचे फोटो घेवून जीआयएस प्रणालीद्वारे संबधित यंत्रणेला पाठवते. या ड्रोनची लांबी जास्त असल्याने गावच्या बाहेरूनच त्याचे उड्डाण करावे लागते.





ड्रोन उड्डाण घेते विमानाप्रमाने

ड्रोन सर्व्हे ऑफ इंडियाचे अधिकारी ऑपरेट करत असून ते पूर्णपणे थरमाकोलचे बनवले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. यामध्ये काही बिघाड झाल्यास त्याचे साहित्य जर्मनी येथून मागवावे लागते,असे सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यानी बोलताना सांगितले. हे ड्रोन कोरड्या आणि स्वच्छ निरभ्र आकाशात उड्डाण घेते. पाऊस आणि जास्त हवा असेल तर उड्डाण घेत नाही. उड्डाण घेत असताना ड्रोन विमानाप्रमाणे गोल फिरत वर जाते आणि खाली येत असताना पुन्हा गोल फिरून खाली येते. गावावरून ड्रोन फिरत असताना गावातील संबधित मालमत्तेचे फोटो घेतले जात असून त्यामुळे येत्या काही दिवसात गावठाणे अद्यावत होणार आहेत.

ब्रिटिश काळानंतर प्रथमच गावठाणांची मोजणी तहसीलदार-प्रशांत बेंडसे पाटील

1930 साली ब्रिटिशांनी गावठाणांची मोजणी केली होती. त्यानंतरच प्रथमच गावठाणाची अद्यावत ड्रोनद्वारे मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे गावातील मालमत्ता निश्चित होणार असून संबधित मालमत्ता धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या मालमत्तेची माहिती मिळण्यास सोपे होणार आहे. गावातील अतिक्रमणे निष्कासित करण्यास मदत होणार असून ग्रामपंचायतीच्या करत वाढ होणार आहे.


Updated : 7 Aug 2022 1:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top