Home > मॅक्स रिपोर्ट > रस्त्याच्या मागणीसाठी जांबुड ग्रामपंचायती समोर गेल्या सोळा दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन

रस्त्याच्या मागणीसाठी जांबुड ग्रामपंचायती समोर गेल्या सोळा दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन

रस्त्याच्या मागणीसाठी जांबुड ग्रामपंचायती समोर गेल्या सोळा दिवसापासून ग्रामस्थांचे आंदोलन
X

रस्ते, पाणी,गटार वीज या गाव,शहर,जिल्हा राज्य,देश यांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. या गरजांची पूर्तता करण्यासाठी शासनाने पुरेशी यंत्रणा पण उभी केली आहे.परंतु शासनातील काही उदासीन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे किंवा चुकांमुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणी,गटार यांच्या समस्या आजही कायम असल्याच्या दिसत आहेत.असाच प्रकार माळशिरस तालुक्यातील जांबुड गावात उघडकीस आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील दलित वस्तीच्या रस्त्याचा प्रश्न रखडला असल्याचे तेथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.रस्ता तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून टोलवा-टोलवी करण्यात येत असल्याची चर्चा गावातील नागरिकांत आहे.जांबुड गावातील ग्रामीण मार्ग 98 ते चंदनशिवे वस्ती ग्रामीण मार्ग 448 जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून तो 464 मीटर आहे.तो लवकर दुरुस्त करण्यात यावा.रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असताना काही शेतकरी रस्त्याच्या कामात अडवणूक करीत असल्याने पोलीस बंदोबस्तात रस्ता दुरुस्त करण्यात यावा.यासाठी चंदनशिवे वस्तीवरील नागरिकाकडून ग्रामपंचायतीने 29 हजार 852 रुपये भरून घेतले असल्याचे आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले.आम्ही दलित,मागासवर्गीय असल्याने जाणूनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत निवेदन घेण्यास नकार देत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी केला आहे.जांबुड ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेल्या 16 दिवसापासून भीमराव चंदनशिवे, सचिन चंदनशिवे, सागर चंदनशिवे व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही,तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा नागरिकांचा आरोप

जांबुड गावाच्या पश्चिम दिशेला चंदनशिवे वस्ती असून याठिकाणी सुमारे 35 ते 40 कुटूंबे राहत आहेत.या वस्तीच्या अलीकडे राहणारे शेतकरी रस्ता आमच्या शेतातून गेला असून तो आमच्या वैयक्तिक मालकीचा आहे.येथून जाण्या-येण्यास चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांना मज्जाव करीत आहे.असे येथील रहिवासी असलेले आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले.जांबुड गावातील नागरिकांचा जाण्या-येण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शासन, प्रशासनाने लक्ष घालून प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने आंदोलन करावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.यावेळी आंदोलक भीमराव चंदनशिवे यांनी बोलताना सांगितले की,सदरचा रस्ता 20 वर्षांपूर्वी झालेला असून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा.यासाठी प्रशासनाकडे मागणी केली.परंतु अद्यापपर्यंत तो दुरुस्त झालेला नाही.जांबुड ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख 75 हजार रुपये मंजूर केले होते.तेही माघारी घेतले आहेत.त्यामुळे ग्रामपंचायती समोर आंदोलन करीत असून ग्रामपंचयाती समोरचे हे दुसरे आंदोलन आहे.

पावसाळ्यात नागरिकांना येण्या-जाण्यासाठी होतो त्रास

चंदनशिवे वस्तीवर जाण्या-येण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढत घर गाठवे लागते.सध्या रस्ता खराब झाला असल्याने जाण्या-येण्यास व दुचाकी घेऊन जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत.रस्त्यावरील दगड वर आले आहेत.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.एखादा अपघात झाल्यास शासन,प्रशासन त्याची जबाबदारी घेईल का असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.मागील काही दिवसांपूर्वी येथील एका शेतकऱ्यांने रस्ता खोदल्याने वाहतुक ठप्प झाली होती.प्रशासनाकडे दाद मागितल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्यात आला.रस्त्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यात यावा अशी अपेक्षा चंदनशिवे वस्तीवरील नागरिक करीत आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयासमोर केली आंदोलने

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यालयासमोर रस्त्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन, उपोषण केले,परंतु प्रशासनाला आमच्या प्रश्नांची जाणीव झाली नाही.प्रशासन जाणूनबुजून आमच्यावर अन्याय करण्याच्या दृष्टिकोनातून टाळाटाळ करीत आहे.येथील शेतकरी रस्ता दुरुस्त करण्यास अडवणूक करीत आहे.रस्ता शासनाचा असल्याने रस्ता दुरुस्त करण्यास अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यावर कायद्यानुसार कारवाई करावी.सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी उपअभियंता बांधकाम विभाग यांनी ग्रामपंचायतीस पोलीस बंदोबस्तात रस्ता दुरुस्त करावा असे पत्राद्वारे कळले होते.त्यासाठी वर्गणी गोळा करून 29 हजार 852 रुपये चंदनशिवे वस्तीवरील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे भरले होते.तरीही ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्त केला नसल्याचे भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्तीसाठी 14 व्या वित्त आयोगातून मंजूर केलेला निधी घेतला माघारी

सदरच्या रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता.परंतु सदरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याचे कारण देत निधी रद्द करण्यात आला.काल परवा ग्रामपंचायतीने रस्ता दुरुस्त करून देतो असे कळविले आहे.त्यासाठी ईस्टीमेट बदलून घ्यावे लागेल.असे सांगितले गेले.त्यानंतरही रस्ता दुरुस्त केला गेला नाही.असे आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांनी सांगितले.

सरपंचावर ग्रामपंचायत बॉडीचा दबाव का ?

चंदनशिवे वस्तीवर दलित लोक राहत असल्याने जाणूनऊनबुजून त्रास देण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत त्रास देत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांनी केला आहे.भीमराव चंदनशिवे यांनी सांगितले की,सरपंच जरी दलित समाजाचा असला,तरी जांबुड ग्रामपंचायतीच्या सदस्य बॉडीमधील काही सदस्य,पार्टी लीडर सरपंचावर दबाव आणत असून त्यांना काम करू देत नाहीत.अशी आमची शंका आहे.जर सरपंच दलित असून दलित वस्तीतील विकास करण्यास टाळाटाळ करत असेल तर त्या सरपंचाचा काय उपयोग ? जर घरचा भेदया लंका दहन करत असेल तर यांच्यावरती मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्ते भीमराव चंदनशिवे यांनी बोलताना केली.

रस्ता दुरुस्त नाही झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार

रस्ता दुरुस्त नाही झाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याची भूमिका आंदोलनकर्ते यांनी घेतली आहे.यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना भीमराव चंदनशिवे म्हणाले की,मागील दोन महिन्यांपूर्वी आम्ही पंचायत समिती समोर आंदोलनास बसलो होतो.त्यावेळेस जांबुड ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणुक लागली होती.आचारसंहिता संपताच रस्ता दुरुस्त करून देतो.असे गटविकास अधिकारी म्हणाले होते.परंतु अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्त झालेला नाही.काल परवा गटविकास अधिकारी यांना भेटलो असता सदरचा निधी आम्हाला या रस्त्यासाठी वापरता येत नाही.त्यावेळी त्यांच्याकडे दलित वस्तीतील इतर ठिकाणच्या रस्त्यावर 14 व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मागणी केली.त्यावेळेस रस्ता दुरुस्त करू असे नुसते तोंडी उत्तर मिळाले.परंतु दुरुस्तीचे काम अद्यापही झाले नाही.रस्ता लवकर दुरुस्त नाही झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांनी दिला आहे.

रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर गटविकास अधिकारी प्रशांत खरात

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत खरात यांनी सांगितले की,हा रस्ता जिल्हा परिषदेचा आहे.त्यामुळे चंदनशिवे वस्तीच्या रस्ता दुरुस्ती कामासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून वर्क ऑर्डर झाल्यानंतर लवकरच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.


हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 10 लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. या कामाच्या इ-टेंडरिंगची प्रोसेस सुरू आहे.लवकरच चंदनशिवे वस्तीच्या रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल.असे जांबुड ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश खरात यांनी बोलताना सांगितले.


Updated : 20 Jan 2022 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top