Home > मॅक्स रिपोर्ट > सर्व पक्षीय बैठक हे सरकारला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’!

सर्व पक्षीय बैठक हे सरकारला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’!

सर्व पक्षीय बैठक हे सरकारला ‘उशिरा सूचलेले शहाणपण’!
X

मराठा आरक्षणावर सरकारने आज बोलावलेली सर्व राजकीय पक्षाच्या गटनेत्यांची बैठक म्हणजे ‘उशिरा सूचलेले शहाणपण’ असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विरोधी पक्षांनी मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले. या मुद्यावर सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र, आरक्षण लागू करण्यासंदर्भात होणाऱ्या दिरंगाईसाठी सरकारने सांगितलेल्या कारणांवर विरोधी पक्ष समाधानी झाला नाही. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आम्ही आजच्या बैठकीत लावून धरली व त्यादृष्टीने सूचनाही मांडल्या.

राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल लवकरात लवकर तयार केला जावा, यासाठी सरकारकडून पुरेसा पाठपुरावा व उपाययोजना झालेली नसल्याचे आम्ही यावेळी निदर्शनास आणून दिले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणीही आम्ही यावेळी मांडली. मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध नागरिकांवर ३५३, ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड होत असल्याची तक्रार आम्ही यावेळी केली. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने समाजकंटक वगळता अन्य सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचे विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी काँग्रेस आमदारांची बैठक

दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात पुढील रणनिती ठरविण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवार, दि. ३० जुलै २०१८ रोजी विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेस आमदारांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये राज्यातील वर्तमान परिस्थितीवर विचारविनिमय होणार असून, त्यानंतर पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल.

Updated : 28 July 2018 1:47 PM GMT
Next Story
Share it
Top