Home > मॅक्स रिपोर्ट > पुरुष नसबंदी आणि पुरुषी दांभीकपणा...

पुरुष नसबंदी आणि पुरुषी दांभीकपणा...

पुरुष नसबंदी आणि पुरुषी दांभीकपणा...
X

महिलांप्रमाणेच पुरुषांची देखील कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करता येते. मात्र, स्त्री पुरुष समानतेचे धडे देणारे अनेक पुरुष कधीही स्वत:ची शस्त्रक्रिया करत नाहीत. पूर्वी चूल आणि मूल हेच महिलांचे विश्व समजले जायचे कदाचित पुरुषप्रधान संस्कृतीचा हा प्रभाव होता. मात्र, काही समाजसुधारकांनी ही प्रथा मोडीत काढत महिलांना पुरुषाप्रमाणे समान अधिकार प्रदान केले तरीही समाजामध्ये पुरुषी अहंकार कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतं. मुलांना जन्म देणे. त्यांचा सांभाळ करणे, घरातील सर्व कामं करणे. या सर्व जबाबदाऱ्या फक्त स्त्रियांनीच पार पाडायच्या. पुरुषांना ही कामं येत नाहीत का? निश्चितच येतात. फक्त आडवा येतो पुरुषी अहंकार. य़ातील एक महत्वाचं उदाहरण म्हणजे म्हणजे कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया. कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुषही करु शकतात. मात्र, पुरुष ही शस्त्रक्रिया करायची टाळतात.

स्त्रियांची समाजसुधारकांनी विविध बंधनाच्या चौकटीतून आणि बऱ्याच अनिष्ट रूढी - परंपरेतून महिलांची सुटका केली. मात्र अजूनही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी महिलांचीच परवड सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतं.

शासनाकडून पुरुषाने कुटूंब नियोजन करावे म्हणून विविध माध्यमातून जनजागृती देखील करण्यात येते. शासनाकडून पुरुषाच्या कुटूंब नियोजनासाठी 3 हजार रुपये अनादान देखील दिलं जातं. मात्र, या शस्त्रक्रियेने नपुसकता येते, जड काम करता येत नाही. असे अनेक गैरसमज असल्याने पुरुष या शस्त्रक्रियेसाठी समोर येत नाहीत. अशी कारणं देखील सांगितली जातात. मात्र, या सर्वांमागे खरं कारण आहे पुरुषी मानसिकता!

घरातील स्वयंपाक करताना पुरुषांना नपुसकता आलेली तुम्ही ऐकलं आहे का? निश्चित नाही ना? तरीही बहुतेक पुरुष ती काम करत नाहीत. यामागे पुरुषी मानसिकता हे एक कारण आहे.

या संदर्भात आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील काही महिलांशी बातचित केली. स्थानिक महिला मंगला शेळके सांगतात, कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुषांनी करायला हवी. पुरुषांना सांगितलं तर ते सांगतात शेतीत जड काम करावं लागतं. मात्र, इतर पुरुषांचा विचार केला तर त्याचं काय? काही लोक मेडीकल, दवाखाना या सारख्या ठिकाणी आरामाचं काम करतात. ते लोक का करत नाही. आम्हाला घरात खूप काम असतात. मुलं त्रास देतात. त्यांनी करायला पाहिजे. पण ते करत नाही. असं म्हणत आपली व्यथा व्यक्त केली.

बुलढाणा जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार सांगतात, पुर्वी कुटूंब नियोजनाची जबाबदारी महिलांवरच होती. मात्र, आता ही जबाबदारी पुरुष घेऊ शकतात. महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कामं करतात. त्यामुळं पुरुषांनी महिलांना समजून घेतलं पाहिजे. त्यांनी जर आपली पुरुषी मानसिकता बाजूला ठेवून महिलांना समाजात पुढे नेण्यास मदत केली तर समाजात एक आदर्श निर्माण होईल. अशी प्रतिक्रिया दिली.

बुलढाणा जिल्ह्यातील महिला आणि पुरुषांच्या कुटूंब नियोजनाची माहिती जेव्हा आम्ही घेतली तेव्हा मोठी धक्कादायक माहिती समोर आली. बुलडाणा जिल्ह्यात २०१९ - २० या आर्थिक वर्षात १५, १९२ एवढं वार्षिक उद्दिष्ठ देण्यात आलं होतं. यामध्ये ग्रामीण भागासाठी ११ हजार ३६६ तर शहरी भागासाठी ३ हजार ८२६ एवढं उद्दिष्ठ देण्यात आलं आहे. त्यापैकी ४२१६ कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ३५६१ महिला तर फक्त ४१ पुरुषांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. ही सर्व माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितली आहे.

या आकडेवारीचा विचार केला तर पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची तुलना ही केवळ हातावर मोजण्या इतकी आहे. त्यातही ग्रामीण भागापेक्षा सुशिक्षिततेचे प्रमाण अधिक असलेल्या शहरी भागात याचे प्रमाण तर नगण्यच म्हणावे लागेल. पुरुष वर्ग ही शस्त्रक्रिया करून घेण्यास पुढे येत नसल्याचं आजवरच चित्र आहे. त्यामुळे शासकीय जनजागृती बरोबरच खऱ्या अर्थाने गरज आहे ती या अहंकारी पुरुषी मानसिकतेला मूठमाती देण्याची.

Updated : 8 Feb 2020 5:06 AM GMT
Next Story
Share it
Top