Home > Election 2020 > वंचितनं लोकसभा निवडणुकीत जागा कमावलीय ?

वंचितनं लोकसभा निवडणुकीत जागा कमावलीय ?

वंचितनं लोकसभा निवडणुकीत जागा कमावलीय ?
X

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र, तरीही वंचितनं या निवडणूकीत जागा कमावलीय. वंचितवर भाजपची बी टीम म्हणूनही निवडणुकीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून टीकाही झाली. अशा परिस्थितीतही वंचितनं सत्ताधारी आणि विरोधकांची व्होटबँक फारशी फोडली नाही. त्याऐवजी वंचितनं हक्काची अशी स्वतःची व्होटबँक तयार करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशिष्ट जागा कमावलीय. भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर सर्वाधिक मतदान मिळवत वंचितनं आघाडी आणि युतीला समर्थ पर्याय म्हणून निश्चितच स्वतःची जागा निर्माण केलीय.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला ४१ लाख ३२ हजार ४४६ इतकी मतं मिळालीत. ही मतं म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी १४ टक्के आहेत. आता भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि वंचितच्या मतांची टक्केवारी ही ९६.६७ टक्के इतकी होते. म्हणजेच ३.३३ टक्के मतं ही बसपा, डावे पक्ष, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना मिळालेली आहेत. वंचितला मिळालेल्या मतांचा विचार करता मतदारांना अपक्ष आणि छोट्यापक्षांपेक्षा वंचितवर विश्वास ठेवल्याचं दिसतंय.

२०१४ च्या तुलनेत एक-दोन जागा वगळता फारसा बदल राजकीय पक्षांच्या गणितात झालेला नाहीये. बदल झालाय तो मतांच्या टक्केवारीत. भाजप-शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत भाजपचा फारसा फायदा झालेला दिसत नाहीये, तर शिवसेनेच्या मतदानाची टक्केवारी ३ टक्क्यांनी वाढलीय. युती आणि आघाडीला समर्थ पर्याय म्हणूनच मतदारांनी वंचितला पसंती दिल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय.

२०१४ आणि २०१९ महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील मतं आणि जागांचं विश्लेषण वर्ष पक्ष एकूण जागा मतांची टक्केवारी

२०१४ भाजप २३ जागा २७.५६

२०१९ भाजप २३ जागा २७.५९

२०१४ शिवसेना १८ जागा २०.८२

२०१९ शिवसेना १८ जागा २३.२९

२०१४ काँग्रेस ०२ जागा १८.२९

२०१९ काँग्रेस ०१ १६.२७

२०१४ राष्ट्रवादी काँग्रेस ०४ जागा १६.१२

२०१९ राष्ट्रवादी काँग्रेस ०४ जागा १५.५२

२०१४ बसपा ०० २.६३

२०१९ बसपा ०० ०.८६

२०१४ सीपीआय ०० ०.१२

२०१९ सीपीआय ०० ०.०७

२०१४ सीपीआय (एम) ०० ०.३८

२०१९ सीपीआय (एम) ०० ०.२०

२०१४ मनसे ०० १.४७

२०१९ मनसे – निवडणूक लढवली नाही ०.००

२०१४ अपक्ष/इतर ०१ ३.२७

२०१९ वंचित+इतर ०२ १४.५५

या दोन्ही निवडणुकांमधील पक्षनिहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी अभ्यासली असता असं लक्षात येतं की, बसपा आणि डावे पक्ष यांना २०१४ च्या तुलनेत दोन टक्क्यांपर्यंत मतदान कमी झालंय. २०१४ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून ३४.४१ टक्के मतदान झालं होतं, ते २०१९ मध्ये ३१.७९ टक्के इतकं झालंय. म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी ही २.६२ टक्के इतकीच कमी झालीय. भाजप-शिवसेनेला २०१४ मध्ये ४८.३८ टक्के मतं मिळाली होती, २०१९ मध्ये युतीला ५०.८८ टक्के मतं मिळालीत. म्हणजेच युतीच्या मतात फक्त २.५ टक्क्यांची वाढ झालीय. याचाच अर्थ काँग्रेस-राष्ट्रवादीची व्होटबँक २०१४ च्या मोदी लाटेत आणि २०१९ च्या मोदी लाटेतही फारशी प्रभावित झालेली नाहीये.

वंचितनं लोकसभा निवडणुकीत जागा कमावलीय वंचित बहुजन आघाडीमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य प्रवाहातील पक्ष वगळता अपक्षांना मिळालेलं मतदान हे ३.२७ टक्के इतकं होतं. तेच २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना मिळून १५.६८ टक्के इतकं मतदान झालंय. त्यात वंचितला सर्वाधिक म्हणजे १४ टक्के इतकं मतदान झालंय. याचाच अर्थ वंचितच्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता आघाडी आणि युतीला फारसा फटका बसलेला दिसत नाही. मतांच्या टक्केवारीचा विचार करता भाजप-शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस असा क्रम लागतो. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडी + इतरांचा नंबर लागतो. त्यामुळं या आकडेवारीतून एक गोष्ट समोर आलीय ती म्हणजे आघाडी आणि युतीला सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीनं स्वतःची व्होटबँक तयार केलीय.

Updated : 11 Jun 2019 12:24 PM GMT
Next Story
Share it
Top