Home > Election 2020 > नाशिकमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

नाशिकमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित

नाशिकमध्ये सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वित
X

राज्यातील शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाने राज्यातील सर्वांत मोठा सौर उर्जा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील लासलगांव येथे उभारण्यात आला आहे. या माध्यमातून दररोज किमान साडेपाच हजार युनिट वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचा सर्व खर्च हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला असून त्यासाठी जागाही प्रशासनाची वापरण्यात आली आहे.

राज्यातील वीजनिर्मितीपैकी तब्बल 30 टक्‍के वीज ही शेतीपंपासाठी वापरली जाते. शेतीपंपांना सौर उर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचा निर्णय राज्य शासन आणि महावितरणच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, त्यानुसार लासलगांव येथे 2 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आला आहे. या प्रकल्पामुळे लासलगांव परिसरातील किमान दहा ते बारा गावांमधील शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, असा दावा महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी केला आहे.

तसेच शेतीला वीज जास्त लागते. या ग्राहकांकडे तब्बल 24 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याने प्रशासनालाही भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही योजना कार्यान्वित केल्यानंतर शेतकरी आणि प्रशासनाचाही “भार’ कमी होणार आहे. पुढील टप्प्यात पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला राज्य शासन मंजुरी दिली असून त्यांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यभरात टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे, या महत्त्वकांक्षी प्रकल्पामुळे वीजटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

Updated : 3 Jun 2019 5:56 AM GMT
Next Story
Share it
Top