Home > मॅक्स रिपोर्ट > एकीनं झालं गाव दुष्काळमुक्त

एकीनं झालं गाव दुष्काळमुक्त

दुष्काळ पाचवीला पूजलेल्या गावात टँकरने द्राक्ष बागांना पाणी घालावं लागत होतं. गावानं ठरवलं..एकी झाली.. दुष्काळ मुक्तीच्या ध्यासातून आज गावात जलगंगा वाहतेय, सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गाव दुष्काळमुक्त झाले असून केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पुरस्कार देऊन गौरविले आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...

एकीनं झालं गाव दुष्काळमुक्त
X

दुष्काळ पाचवीला पूजलेल्या गावात टँकरने द्राक्ष बागांना पाणी घालावं लागत होतं. गावानं ठरवलं..एकी झाली.. दुष्काळ मुक्तीच्या ध्यासातून आज गावात जलगंगा वाहतेय, सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गाव दुष्काळमुक्त झाले असून केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पुरस्कार देऊन गौरविले आहे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...

सोलापूर जिल्ह्यातील बराचसा भाग हा कायमच दुष्काळी समजला जातो.त्यात बार्शी तालुक्यातील काही गावांच्या समावेश आहे.आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रातील बरीच गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम केले आहे.त्यात सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी गावाने सहभाग घेऊन गाव दुष्काळमुक्त करण्याचे काम केले आहे.या गावाला पाणी फाऊंडेशनचा महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.नुकतेच या गावाला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने पुरस्कार देऊन गौरविले आहे.काही वर्षांपूर्वी या गावात पिण्याचा पाण्याचा वानवा होता.टँकरने पाणी पुरवठा केला जात होता.एखादा टँकर विहरीत आणून ओतला तर पाणी भरण्यासाठी लोकांची झुंबड उडायची.गावात पाण्यासाठी भांडणे होत असे.पाणी भरण्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत होता.

गाव मुळातच उंचावर, चारी बाजूच्या डोंगरामुळे पावसाचे पडलेले पाणी गावात टिकत नव्हते. सर्व पाणी ओढ्या-ओघळीने निघून जात होते. परिणामी जमिनीच्या पोटातून बेसुमार पाणीउपसा सुरू झाला. द्राक्ष उत्पादनासाठी गाव जिल्ह्यात प्रसिद्ध. मात्र, बागा जगविण्यासाठी भरपूर पाणी लागत असल्यामुळे भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा होत होता.




गावातील सर्व वयोगटातील नागरिक पाण्याच्या समस्येने त्रस्त झाले असल्याने यातून मुक्तता व्हावी यासाठी गावातील शिक्षक व नोकरदार वर्गाने पुढाकार घेत सत्यमेव जयतेच्या वाँटर कप स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले. बैठकीत उतारावरून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी गावकऱ्यांनी तब्बल 45 दिवस अहोरात्र श्रमदान केले.या कामात आबाल वृद्ध ते लहान मुले सहभागी झाले होते.जे गाव काही वर्षांपूर्वी पाण्यासाठी वणवण करीत होते.आज त्याच गावाच्या श्रमदानातुन गाव दुष्काळमुक्त झाले आहे.द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकरी टँकरने पाणी विकत आणून घालत होते. आज गावातील विहरी तुडुंब भरल्या आहेत. बोरवेल हातपंप यांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.गावातील तरुण पिढी शेती व्यवसायाकडे वळली असून गावातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.गावातील भांडणे कमी झाली असून सुर्डी गाव प्रगतीच्या दिशने वाटचाल करू लागले आहे.

पहाटेपासून श्रमदानासाठी केली जायची तयारी

गावातील नागरिक श्रमदानाच्या कामावर जाण्यासाठी पहाटेपासूनच तयारीला लागायचे.गावात गाडी स्पीकर लावून फिरवली जात होती.गावातील ज्या नागरिकांकडे चार चाकी वाहने होती.त्यांनी लोकांना श्रमदानाच्या ठिकाणी मोफत सोडण्याचे काम केले.या कामात गावातील शिक्षक वर्गाचे काम अनन्यसाधारण असल्याचे सांगितले जात आहे.त्यांच्यामुळेच श्रमदानाचे काम साध्य झाले आहे.असे येथील नागरिक सांगत आहेत. पाणी जमिनीत मुरल्याने गावच्या परिसरातील शेती हिरवळीने नटलेली आहे.द्राक्ष बागांचे क्षेत्र वाढले असून शेतात काम करणाऱ्या मजूर महिलांना 500 रुपये रोजगार मिळत आहे.रोजगार मिळू लागल्याने येथील नागरिकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला असल्याचे जाणवत आहे.

गावातले गट-तट, राजकारण स्वता:पुरते ठे‌वून गावाला जलसंधारणाच्या एका साखळीत बांधण्यात यश येऊ लागले. शेती हे उत्पन्नाचे मुख्य साधन असल्यामुळे सुर्डी गाव ९० टक्के वाड्यावस्त्यांवर विखुरलेले आहे. एकूण लोकसंख्येच्या दहा टक्केच लोक गावात राहात असल्याने टीमने वस्त्यांवर जाऊन जलसाक्षरता केली. श्रमदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. पाण्याशी सर्वांत जवळचा संबंध असतो, तो महिलांचा. त्यामुळे या कामासाठी सर्वप्रथम महिलांना तयार केले. दीड महिना जनजागृती सुरू होती. मॅडप, बायोडायनॅमिक, माती परिक्षण कसे करायचे, शोषखड्डे कसे खणायचे हे लोकांना प्रात्यक्षिके दाखवून समजावले. दररोज २५ किलोमीटरची शिवारफेरीही केली जात होती. लोक अन्नदान, धनदान, मतदान करतात. मात्र, श्रमदान करीत नाहीत. श्रमदान केले तर गावाला होणारे फायदे लोकांना समजावल्यानंतर लोकांना पाण्याचे महत्त्व पटू लागले.

गाव ९० टक्के वाडी-वस्तीवर राहात असल्यामुळे लोक विखुरले होते. मात्र, स्पर्धेच्या ५० दिवसांनी चित्र बदलून टाकले. लोकांमध्ये एकी झाली. स्पर्धेच्या काळात गावातली हॉटेल, दुकाने, टपऱ्या सकाळी नऊ नंतर सुरू करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला गेल्याने हॉटेल टपऱ्यांवर रेंगाळणारी मंडळीही श्रमदानात सहभागी झाली. परिणामी श्रमदान करणाऱ्या लोकांचा आकडा तेराशेच्या खाली आला नाही. एक मे रोजी विक्रम करीत तब्बल तीन हजार लोकांनी महाश्रमदानात सहभाग नोंदविला.

वॉटर कप स्पर्धेत यांत्रिकीकरणाच्या कामालाही गुण दिले जातात. मात्र, हे काम करीत असताना त्यासाठी लागणारा खर्च लोकांनी स्वत:च्या खिशातून करणे अपेक्षित असते. त्यासाठी देणगी, बक्षीस घेता येणार नाही, अशी अटच असते. यावरही डोईफोडे यांनी मार्ग काढला. सुरुवातीला लोक देणगी देत नव्हते. यावर मधुकर डोईफोडे यांनी शक्कल लढविली. त्यांनी स्वत:च्या खिशात हात घातला. एके दिवशी ५० हजार रुपये घेऊन गावातल्या चौकात आले आणि त्या पैशातून अकाउंट उघडण्याची घोषणा केली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लोकांनी पैसे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आठ एप्रिलला प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. त्यावेळी तब्बल ८०० लोक प्रत्यक्ष श्रमदानाासाठी गावच्या माळरानावर हजर झाले. पाण्याचे महत्त्व पटलेल्या गावकऱ्यांनी मग पाच हजार रुपये जमा केले.




पाण्यासाठी उन्हात बसावे लागायचे

पाण्यासाठी दिवसभर लहान मुलांना घेऊन घागरी ओळीला लावून उन्हातान्हात बसावे लागत होते.या ठिकाणी पाण्याचा टँकर आल्यानंतर पाणी भरण्यावरून महिलांची भांडणे होत होती.पाण्याचा टँकर गावात आला तर पाणी भरण्यासाठी तुंबळ गर्दी होत असे.गावातील महिलांना पाण्याच्या अडचणीला तोंड द्यावे लागत होते.पाण्यासाठी तासनतास टँकरची वाट पाहावी लागत.एखादा टँकर विहरीत ओतला तर महिला,पुरुष,मुले,मुली यांची पाणी भरण्यासाठी झुंबड उडत होती.त्या गर्दीमुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकला असता एवढी गर्दी पाणी भरण्यासाठी होत होती.गावाला दुष्काळातून मुक्त व्हावे असे वाटत होते.महिलांना दुष्काळाच्या झळा जास्त बसल्याने श्रमदानासाठी त्या बाहेर पडल्या.हा प्रवास खडतर असला तरी पाठीमागचा पाण्यासाठीचा संघर्ष पाठीशी होता.त्यामुळे श्रमदानाचे काम हसत खेळत पार पाडले. श्रमदानासाठी सकाळी 6 वाजता कामावर जात होतो.पुरुष जे खोदत होते.ते महिला खोऱ्याने भरून टाकत असत.पुरस्काराच्या रूपाने श्रमदानाचे फळ मिळाले आहे.असे या गावातील महिलेने बोलताना सांगितले.

श्रमदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. पाण्याशी सर्वांत जवळचा संबंध असतो, तो महिलांचा. त्यामुळे या कामासाठी सर्वप्रथम महिलांना तयार केले. दीड महिना जनजागृती सुरू होती. मॅडप, बायोडायनॅमिक, माती परिक्षण कसे करायचे, शोषखड्डे कसे खणायचे हे लोकांना प्रात्यक्षिके दाखवून समजावले. दररोज २५ किलोमीटरची शिवारफेरीही केली जात होती. लोक अन्नदान, धनदान, मतदान करतात. मात्र, श्रमदान करीत नाहीत. श्रमदान केले तर गावाला होणारे फायदे लोकांना समजावल्यानंतर लोकांना पाण्याचे महत्त्व पटू लागले.

श्रमदानासाठी पहिल्याच दिवशी तीन हजार नागरिक जमले

येथील नागरिक आण्णासाहेब डोईफोडे यांनी सांगितले की,पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला गावातील 12 जण गेलो होतो.त्यानंतर गावात येऊन जनजागृती केली. गावाला पाणी अडवण्याचे महत्व पटले.ज्यादिवशी श्रमदानासाठी जायचे होते.त्यादिवशी 3 हजाराच्या आसपास नागरिक एकत्र आले होते.गावात श्रमदानानातून पाणी आले आहे. आता सर्व जण समाधानाने जीवन जगत आहेत.




गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दिले योगदान

प्रणिता डोईफोडे या विद्यार्थ्यांनीने बोलताना सांगितले की,गावाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी गावातील आबाल वृद्धांसह तरुणांनी योगदान दिले आहे.यामध्ये विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा आहे.विद्यार्थी सकाळी 6 वाजता गावकऱ्यांसोबत श्रमदानाच्या कामावर जाऊन 9 वाजेपर्यंत त्याठिकाणी काम करत होतो.गावामध्ये दुष्काळ खूप होता.पण आता मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. गाव आता सुजलाम सुफलाम झाले आहे.गावामध्ये अगोदर खूप भांडणे होत होती.पण आता एकही भांडण होत नाही.सगळे गावकरी मिळून मिसळून आनंदात राहत आहेत.

जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देऊन भविष्यातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी गावाने वॉटर बजेट तयार केले आहे. सर्व गावकऱ्यांना आपल्या गावातील पाण्याची स्थिती काय आहे, हे पाहता यावे यासाठी देवळाच्या भिंतीवर हे बजेट लिहून ठेवण्यात आले आहे. त्या बजेटनुसार सुर्डीची सध्याची गरज २३९ कोटी लिटर इतकी आहे. ५० दिवसांच्या श्रमदानातून गावकऱ्यांनी २६ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता असणारी भांडी तयार करण्यात आली आहे.

दररोज हजार लोकांना दिला जात होता नाष्टा

कामाच्या ठिकाणी श्रमदान करणाऱ्या हजार लोकांच्या नाष्टयाची सोय केली जात होती.दररोज वेगवेगळे मेनू बनवले जात होते.नाष्टा बनवण्यासाठी बरबडे बंधूनी 45 दिवस निशुल्क सेवा दिली.श्रमदान करणाऱ्या लोकांना गावातील लोकांनी अन्नदानाचे काम केले.त्यासाठी नंबर लागलेले असायचे.या कामासाठी 25 वृद्ध महिला काम करत होत्या.यामध्ये कांदा,मिरची,टोमॅटो चिरण्याचे काम करत होत्या.गावच्या एकीमुळे गाव दुष्काळ मुक्त झाले असल्याचे आचारी मधुकर बरबडे यांनी सांगितले.

उतारावरून वाहून जाणारे पाणी अडविले

गावाच्या उत्तर दिशेवरून उतारावरून वाहून येणारे पाणी गावातील नागरिकांनी श्रमदान करून अडविले आहे.याठिकाणी काही काम जेसिबी मशीनच्या सहाय्याने केले गेले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.या गावात पाणी साठवण्यासाठी तळी बनवण्यात आली आहेत.या तळ्यात उतारावरून वाहून येणारे पाणी साठवले जात आहे.गावच्या बाजूला ओढा असून पावसाळा सोडून इतर वेळी तो कोरडा असायचा.पण वाँटरकपचे काम केल्यापासून हा ओढा सतत पाण्याने भरला असल्याचे नागरिकांनी सांगितले.वाँटर कपच्या कामामुळे गावात समृद्धी येऊन शेतातील आर्थिक उलाढाल वाढली आहे.असे येथील नागरिकांना वाटत आहे.

स्पर्धेत जिंकण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषात काम करणे बंधनकारक असते. त्यातही गावाने बाजी मारली. प्रत्येक घटकात निकषापेक्षा जास्त काम केल्याचा फायदाही झाला. सहा जेसीबी मशीनच्या साह्याने दोन लाख ५४ हजार ७०० घनमीटरचे टार्गेट तीन लाख घनमीटर काम करून पूर्ण करण्यात आले. त्याच पद्धतीने श्रमदानाचे १७ हजार ५०० घनमीटर हे टार्गेट, २२ हजार घनमीटर काम करून पूर्ण केले. या कामातून तयार झालेल्या नैसर्गिक भांड्यांमध्ये पावसाचे पाणी अडून भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवातही झाली आहे.

माती परीक्षण केल्यानंतर गावच्या शेतीची भयावह परिस्थिती लक्षात आली. मातीतले सेंद्रीय कर्ब मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्याचे लक्षात आले. अजून काही दिवस असेच सुरू राहिले, तर मातीतला उरला सुरला प्राणही निघून जाईल, अशी भीती गावकऱ्यांमध्ये होती. त्यामुळे शेतातला काडीकचरा जाळायचा नसतो, तो शेतातच गाडायचा असतो, हेही या स्पर्धेच्या निमित्ताने लोकांना कळून चुकले. नापिकीचा धोका ओळखून गावाने आता पीक पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात आठ महिने शेती आणि चार महिने जमिनीला विश्रांती देण्याचा निर्णय अमलात आणण्याचा विचार ग्रामस्थ करीत आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच जास्त पाणी लागणारी ऊस, केळी या पिकांची लागवड करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच ड्रीप व तुषारने पाणी देणे, मल्चिंग पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

गाव झाले सुजलाम सुफलाम

यावेळी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सरपंच सुजाता डोईफोडे म्हणाल्या की,गावात दुष्काळग्रस्त परस्थिती मोठ्या प्रमाणात झाली होती.महिलांना पाण्याची समस्या भेडसावत होती.गावची लोकसंख्या 3 हजार 500 असून द्राक्ष बागेचे क्षेत्र जास्त आहे.गावाच्या परिसरात दुष्काळ असल्याने शेतीवर त्याचा परिणाम झाला होता.द्राक्ष बागांना ठिबक सिंचनाने पाणी दिले जात होते.परंतु पाणी उपलब्ध नसल्याने टँकरने पाणी विकत आणून शेतकऱ्यांनी बागा जगवल्या.द्राक्ष बागांचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त प्रमाणात होत होता.गावाला पाण्याचा प्रश्न सतत भेडसावत होता.त्यामुळे सत्यमेव जयतेच्या वाँटर कप स्पर्धेत भाग घेतला.आता पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे.गावाने वाँटर कप स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले आहे.श्रमदानाच्या कामात गावाने खारीचा वाटा उचलला असून बक्षिसापेक्षा पाण्याचा प्रश्न मिटने आमच्यासाठी महत्वाचा होता.गावातील विहीर,बोरवेल यांना मुबलक पाणी आहे.शेतीला आठ-आठ तास जरी पाणी दिले तरीही पाणी साठा कमी होत नाही.त्यामुळे गाव सुजलाम सुफलाम झाले असल्याचे सरपंच सुजाता डोईफोडे यांनी सांगितले.

गाव ८५ टक्के जलसाक्षर झाल्यामुळे स्पर्धा संपली असली, तरी गावात श्रमदान सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 'एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला, तरी पाणी गावातच कसं राहील, याची आम्ही तजवीज करणार आहोत, बक्षिसाचे मिळालेले ७५ लाख रुपयेही ठराव करून फक्त पाण्यासाठीच वापरू आणि गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे लक्ष नक्की गाठू,' हा सुर्डीकरांचा विचार दुष्काळाशी झगडणाऱ्या इतर गावांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे.



गावातील सांडपाणी शोष खड्यात मुरवल्याने विहीर,बोरवेलच्या पाणी पातळीत झाली वाढ

यावेळी ग्रामसेवक पी.जी.कागदे म्हणाले की, 2019 साली गावाने सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.2018 साली या गावचा चार्ज घेतल्यानंतर या गावात पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई होती.गावातील विहरीत टँकरने पाणी ओतले जात होते.परंतु ज्या विहरीत पाण्याचे टँकर टाकत होतो.त्या विहरीत आज 30 फूट पाणी आहे.ते उन्हाळ्यात ही कायम राहते.14 व्या वित्त आयोगातून गावातील सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी शोष खड्याची सोय करण्यात आली आहे.त्यामुळे गावातील डासांचे प्रमाण कमी होऊन दुर्गंधी नाहीशी होण्यास मदत झाली आहे.सांडपाणी शोष खड्यात मुरल्याने विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.दुष्काळात जे हातपंप बंद होते ते सुरू झाले आहेत.

Updated : 24 May 2022 2:17 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top