उध्दव ठाकरेंना काँग्रेसची चिंता
Max Maharashtra | 27 May 2019 1:06 PM IST
X
X
काँग्रेस पक्षाचे काय होणार हा प्रश्नच आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारलाय.
काँग्रेस पक्षाचं काय होणार , असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनाच पडला आहे. पक्षानं नवा नेता निवडावा , मी राजीनामा देतो असे राहुल गांधी कार्यकारिणीच्या बैठकीत बोलले होते.
काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. व लोकसभेत विरोधी पक्षनेता बनवता येईल इतक्या ५५ जागाही काँग्रेस मिळवू शकत नाही. पक्षाचे अध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली. पण पक्षच अस्तित्वात नाही अशी दशा काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसने प्रियंका गांधीना आणले मात्र त्याचा फायदा काही झाला का? उत्तर प्रदेशमध्ये आधी दोन जागा होत्या मात्र आता एक झाली आहे. राहुल गांधी अमेठीत हरले. उत्तर प्रदेश, बिहार , महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १९४ जागा आहेत. मात्र त्यामधील तीनच जागा फक्त काँग्रेस जिंकली. १३४ वर्षे जुन्या काँग्रेसला हा अखेरचा धक्का आहे. राहुल गांधी यांच्यावर सर्व खापर फोडणे चुकीचेच आहे. राहुल गांधी म्हणजे इंदिरा गांधी व राजीव गांधी नाहीत किंवा मोतीलाल किंवा जवाहरलाल नेहरु देखील नाहीत. ते फक्त सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. देशाच्या राजकरणात सोनिया गांधींचे कर्तृत्व राजीव गांधीची पत्नी इतकेच आहे, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
लोकांना आकर्षित करतील असं राहुल गांधीचं व्यक्तिमत्त्व नाही,त्याचप्रमाणे भाषणे व विचार करण्याची, भूमिका मांडण्याची शैली प्रभावी नाही. त्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली, कष्ट केले. मात्र त्यास दिशा नव्हती. राहुल गांधी जे सांगतात त्यातून युवकांनी किंवा देशाने प्रेरणा घ्यावी असं काय आहे, असंही सामनाच्या संपादकीयतून विचारण्यात आलंय.
उत्तर प्रदेशमध्ये अपक्ष उमेदवारांना जितकी मते पडतात त्यापेक्षा कमी मते काँग्रेस उमेदवारांना देखील पडत आहेत व प्रियंका गांधींनी वेगळे काय करुन दाखवले. राहुल गांधींकडे एकतर पोरखेळ आहे किंवा पेन्शनरांचा क्लब आहे. दिल्लीमध्ये त्यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली, मात्र स्वबळावर जिंकून येण्यासाठीचे त्यांचे दिवस संपले हा दोष राहुल गांधींचा नाही तर काँग्रेस पक्षाचा आहे.
मोदींनी हिंदू राष्ट्रवादाने वातावरण भारुन टाकले. पुलवामा हल्ला व बालाकोट एअर स्ट्राइकनंतर देश राष्ट्रभक्तीत लीन झाला व राहुल गांधी हे स्वातंत्र्यलढ्याचे महानायक वीर सावरकरांवर अभद्र बोलत राहिले. सावरकरांना पळपुटे म्हणणारे राहुल उरलेली सहानुभूती गमावून बसले. मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस पक्ष चालवण्यापेक्षा पक्ष बरखास्त करणेच योग्य. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, पण पक्षाने तो स्वीकारला नाही. राजीनामा न स्वीकारणा-यांना चेहरे नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरुप आहे . अशा पक्षाचे काय होणार हा प्रश्नच आहे असे उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयतून विचारलाय.
Updated : 27 May 2019 1:06 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire