Home > मॅक्स रिपोर्ट > अमेरिकेत आणीबाणी : ट्रम्प यांची “मी म्हणेन ती पूर्व दिशा”

अमेरिकेत आणीबाणी : ट्रम्प यांची “मी म्हणेन ती पूर्व दिशा”

अमेरिकेत आणीबाणी : ट्रम्प यांची “मी म्हणेन ती पूर्व दिशा”
X

मर्यादित अध्य़क्षीय अधिकार आणि लोकशाहीचा प्रचंड तिरस्कार करणाऱ्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आणीबाणी जाहीर करुन लोकशाहीची कत्तल केली असंच म्हणावं लागेल. २०१६ साली निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अनेक हुकुमशाहांची प्रशंसा केली होती. सत्तेत आल्यास विरोधी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात डांबण्याची भाषा करत क्लिंटन यांच्या राजकीय विरोधकांची मनं जिंकली होती. त्याच बरोबर निवडणुकीत हार पत्करणार नाही असं वक्तव्य देखील त्यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये केलं होतं. या सर्व बाबी लक्षात घेता ट्रम्प हे हुकुमशाहीचेच पुरस्करते आहेत हे स्पष्ट होते.

२०१८ च्या निवडणुकांच्या प्रचारात देखील त्यांनी रिपब्लिकन उमेदवारांचा विजय सुकर व्हावा म्हणून अनेक खोट्या घोषणा केल्या. त्याचा फारसा लाभ झाला नाही. ट्रम्प २०२० मध्ये ते स्वत: उमेदवार असणार आहेत. त्याच बरोबर आत्ता पर्यंत त्यांचा सत्तेसाठी असलेला हावरेपणा त्यांच्या वागणुकीतून स्पष्ट होत असतांना ते सत्ता टिकवून ठेवण्याकरिता काय करतील याचा नेम नाही.

जगभरात सध्या वेगळेच राजकीय वारे वाहत आहेत. जगभरात अनेक लोकशाही देश सध्या कळतपणे अनियंत्रित राजकीय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहेत. अशा देशांमध्ये अति-राष्ट्रीयत्वाच्या भावना आणि लोकशाही विरोधी भावना प्रबळ होताना दिसत आहे. लोकशाही आणि मानवता वादाकरिता या पोषक गोष्टी नाहीत. अशा प्रकारचं नेतृत्व सत्ता टिकवण्याकरिता कुठल्याही स्तराला जाऊ शकतं यात शंका नाही.

चालू दशकात राजकारणाचा ट्रेन्ड बदलला असल्याचं दिसून येतं. राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं नेत्यांनी मतदारांना झूल पांघरत भूल दिलीय असं वाटतं. चीन, रशिया, जपान या सारख्या मोठ्या देशांमध्ये देखील अति राष्ट्रवादी नेतेच सत्ता काबीज करुन बसले आहेत. रशिया आणि चीन मध्ये तर सत्तेत कायम राहाण्याकरिता त्या नेत्यांनी साम, दाम, दंड भेदाचा वापरही केला आहे. रशियामध्ये स्टॅलिन आणि चीनमध्ये माओच्या पावलांवर पाऊल ठेऊन राजकारण करणारे नेते सत्तेपासून दूर जाण्यास नकारच देत आहेत. अशा परिस्थितीत सदैव इतरांचा तिरस्कार करणाऱ्या ट्रम्प यांनी अशा प्रकारचं पाऊल उचललं नसतं तरच नवल.

Courtesy : CNN मेक्सिको बॉर्डर Courtesy : CNN

सत्तेची लालसा असणारे नेते लोकशाहीस घातक ठरतात. त्याच बरोबर त्यांच्या या वृत्तीमुळे समाजात विविध प्रकारचे गट तयार होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत जातात. आणीबाणी जाहीर करुन ट्रम्प यांनी मी म्हणेन ती पूर्व दिशाह्या आपल्या हेकेखोर वृत्तीचं दर्शन घडवलं आहे. डेमोक्रॅट सदस्यांनी त्यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्याच बरोबर या निर्णयाला आव्हान देण्याचं देखील ठरवलं आहे. तसंच काही रिपब्लिकन सदस्यांनी देखील ट्रम्प यांच्या निर्णयाचा विरोध करत त्यांना घरचा आहेर दिलाय. अमेरिकी काँग्रेसच्या अधिकारावर ट्रम्प यांनी घाला घातला आहे, अशा शब्दात डेमोक्रॅट सदस्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाला विरोध करत आव्हान दिलं तरी त्या आव्हानावर सभागृहात चर्चा करण्याकरिता राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी लागेल हे देखील तितकचं सत्य आहे. आणि ट्रम्प अशा प्रकारच्या कुठल्याही प्रस्तावावर स्वाक्षरी करतील असं चित्र नाही.

ही आणीबाणी जाहीर करुन ट्रम्प यांनी एका घातक प्रथेची पायाभरणी केली आहे. काँग्रेसच्या अधिकारात असलेल्या बाबींमध्ये हस्तक्षेप करुन त्यांनी घटनेची अवहेलना केली आहे, असंच म्हणावं लागेल. घटनेपेक्षा व्यक्ती मोठी असू शकत नाही. चर्चेच्या माध्यमातून घटनेत दुरुस्ती करुन काही गोष्टी करता येऊ शकतात. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या प्रश्नांचा बाऊ करत ट्रम्प आपला राष्ट्रवाद योग राष्ट्रवाद असल्याचं भासवत आहेत. हा प्रश्न काही आज उद्भवला नाहीये. अगदी अनेक वर्षांपासून हा प्रश्न अमेरिके समोर आ वासून उभा आहे.

स्वत: ट्रम्प यांनी स्थलांतराबाबत काँग्रेसला डावलून निर्णय घेणं विघातक, घटना बाह्य आणि देशद्रोहच्या योग्य कार्य ठरेल असं म्हटलं होतं. आज तोच अध्यक्ष बोले तैसा चाले या प्रमाणे वागतांना दिसत नाहीय. फुशारक्या मारण्याकरिता मेक्सिकोच्या सीमेवर ट्रम्प यांना भिंत बांधावयाची इच्छा आहे, असं एकूण त्यांच्या वागणुकीवरुन दिसतंय.

ट्रम्प यांनी परिकल्पनांना सत्याचं रुप देत ही आणीबाणी जाहीर केली आहे. आत्ता पर्यंतच्या त्यांच्या काळात ते अशा प्रकारे इतरांच्या कामकाजात हस्तक्षेप करत आले आहेत. वास्तविक मेक्सिकोच्या सीमेवरील स्थलांतराची समस्या दिवसेंदिवस कमी होत गेली आहे. मेक्सिकेमधील विकासामुळे आता स्थलांतरितांचे लोंढे कमी झाले आहेत. पण ही सत्य स्थिती न दाखवता परिकल्पनेतून हा प्रश्न मोठा करत ट्रम्प यांनी ही आणीबाणी लादलीय.

कौस्तुभ कुलकर्णी

लेखक आंतरराष्ट्रीय घाडामोडींचे अभ्यासक आहेत

Updated : 17 Feb 2019 6:19 AM GMT
Next Story
Share it
Top