Home > मॅक्स रिपोर्ट > तिरंगा पोहोचला पण इंडिया यांच्यापर्यंत कधी पोहोचणार?

तिरंगा पोहोचला पण इंडिया यांच्यापर्यंत कधी पोहोचणार?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एक भारत असाही आहे जिथे तिरंगा पोहोचला पण आजही इंडिया त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही....अशाच एका भारताची ओळख करुन देणारा अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

तिरंगा पोहोचला पण इंडिया यांच्यापर्यंत कधी पोहोचणार?
X

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एक भारत असाही आहे जिते तिरंगा पोहोचला पण आजही इंडिया त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही....अशाच एका भारताची ओळख करुन देणारा अशोक कांबळे यांचा ग्राऊंड रिपोर्ट... देशभरात 'हर घर तिरंगा ' ही मोहीम राबविली जात आहे. यानिमित्ताने घरे,वाड्या,वस्त्यांवर झेंडे लावण्यात येत आहेत. पण अमृत महोत्सवाची जनजागृती करणारे अधिकारी ज्यावेळी तिरंगा झेंडा घेवून आदिवासींच्या वस्त्यांवर गेले तेंव्हा त्या निरागस लोकांना स्वातंत्र्याचा अर्थच कळला नाही. त्यामुळे या स्वतंत्र भारतातील वास्तव अधोरेखित झाले.

भारतीय जनतेच्या अखंड लढ्यामुळे भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. १५ ऑगस्ट 2022 रोजी या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात 'हर घर तिरंगा ' ही मोहीम राबविली जात आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'हर घर तिरंगा ' ही मोहीम 13 ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान राबवण्यात येत आहे. या मोहिमेत देशभरातील शाळा,कॉलेज,सामाजिक संस्था,राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. यानिमित्ताने देशभरातील नागरिकांत देश प्रेम जागृत करण्याच्या उद्देशाने विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज हा स्थलांतरित झाला आहे. याठिकाणी तो शेतातील झाडे तोडून कोळसा बनवण्याचे काम करत आहे. लाकडे तोडून भट्टीत कोळसा तयार करून मुंबई येथे विकण्यासाठी पाठवतात. त्यातून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. त्याच्यावरच त्यांची उपजीविका चालते. हा समाज सातत्याने रानावनात भटकत असल्याने त्याला जगात घडणाऱ्या घटनांचे आकलन होत नाही. त्यांच्यात शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांच्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींची माहितीच त्यांना मिळत नाही.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत झेंड्याचे वाटप करण्यात आले. पण त्यांना या झेंड्याबद्दल काहीच माहिती नव्हती. स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहिती नाही. त्यांना फक्त जगण्यापूरते कमविणे आणि मिळेल तेथे राहणे हेच माहित आहे. त्यांचे गेल्या अनेक वर्षापासून असेच जीवन सुरू आहे. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहे. त्यांच्या सामाजिक,आर्थिक,राजकीय, शैक्षणिक स्थितीचा आढवा घेणे जरुरीचे आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. नाहीतर या आदिवासी बांधवांच्या येणाऱ्या कित्येक पिढ्या बरबाद होतील. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यांना जगण्याची साधने उपलब्ध करून देण्यात यावी. त्यांचे स्थलांतर थांबवण्यासाठी समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेवून त्यांच्या हाताला काम देणे गरजेचे आहे.

पण गेल्या हजारो वर्षांपासून जातीय व्यवस्थेमुळे डोंबारी, मरीआईवाले आणि आदिवासी समाज विकासापासून कोसो दूर आहेत. त्यांच्यापर्यंत आजही लाइट,पाणी, गटार या सोयी सुविधा पोहोचल्या नाहीयेत. त्यांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारची घरे नाहीत. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. आदिवासी समाज गेल्या हजारो वर्षापासून भटके जीवन जगत आहे. त्यामुळे ते कोणत्याच एका गावचे मूळ रहिवासी नाहीत. आता कुठे तर हे समाज स्थायिक होताना दिसत आहेत. पण या समाजाकडे जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी साधने नाहीत. ते कोणत्याच गावी स्थायिक नसल्याने त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता नाही. म्हणून त्यांना मिळेल ते काम करावे लागते. या कामाचे त्यांना कधी पैसे मिळतात तर कधी मिळत नाहीत. या समाजातील लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी प्रचंड असा संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या या संघर्षाकडे शासनाचे लक्ष नाही. त्यांच्यात प्रचंड प्रमाणात दारिद्र्य असल्याने शिक्षणाचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच कदाचित त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ माहित नसावा असे अनेकांना वाटत आहे.

आदिवासी समाजाला जातीय व्यवस्थेने हजारो वर्षे गुलामीच्या जोखडात कोंडून ठेवले आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतरही दुःख,दारिद्र्य त्यांच्या पाचवीला पुजले आहे. त्यांना आजही प्राथमिक सोयी-सुविधा मिळत नाहीयेत. हजारो वर्षापासून शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Updated : 2022-08-13T21:19:48+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top