Home > Election 2020 > लोकसभेच्या महाराष्ट्रातील १० जागांसह देशातील ९५ जागांवर आज मतदान

लोकसभेच्या महाराष्ट्रातील १० जागांसह देशातील ९५ जागांवर आज मतदान

लोकसभेच्या महाराष्ट्रातील १० जागांसह देशातील ९५ जागांवर आज मतदान
X

अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह लोकसभेच्या महाराष्ट्रातील १० जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. तर देशातील ९५ लोकसभा मतदारसंघासाठीही मतदानाला सुरूवात झाली आहे. या ९५ जागांसाठी तब्बल १६०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील १० जागांसाठी तब्बल १७९ उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्रात लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार आहेत. त्यासाठी २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ३८२ संवेदनशील मतदान केंद्रांवर अधिक कडक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २१०० मतदान केंद्रांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे तेथील मतदान प्रक्रियेवर करडी नजर असेल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितले.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, मराठवाडय़ातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर या १० मतदारसंघांत मतदान होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, आनंदराव अडसूळ, डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह राज्यातील १७९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरणार आहे.

राज्यात या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदारसंघात आहेत. १५ पेक्षा जास्त उमेदवार असलेले चार मतदारसंघ असून यापैकी बीड मतदारसंघात एका कंट्रोल युनिटमागे ३ बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदारसंघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट, तर अन्य सहा मतदारसंघात प्रत्येकी एक बॅलेट युनिट लागणार आहेत.

राज्यात दुसऱ्या टप्यातील ३८२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ७१ मतदान केंद्रे सोलापूर मतदारसंघातील असून त्याखालोखाल ६४ संवेदनशील मतदान केंद्रे परभणीतील आहेत. लातूर ४८, नांदेड ४७, अमरावती ३७, तर बीडमध्ये ३७ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून तेथे मतदान प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी ६२ हजार ७०० ईव्हीएम, तर सुमारे २७ हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

लोकसभेबरोबर विधानसभेच्याही पोटनिवडणूका

तमिळनाडूतील लोकसभेच्या ३९ पैकी ३८ मतदारसंघांसह विधानसभेच्या १८ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक आयोगाने बुधवारीच रद्द केली. तसेच त्रिपुरातील एका जागेवरील मतदानही लांबणीवर टाकण्यात आले आहे. कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओदिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदानाला सुरूवात झालीय. ओदिशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही मतदानाला सुरूवात झाली आहे.

Updated : 18 April 2019 4:05 AM GMT
Next Story
Share it
Top