Home > मॅक्स किसान > शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ

शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ

शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ
X

सुधागड जांभुळपाडा ग्रामपंचायतीत १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ, सामाजिक वनिकरणाकडून कागदोपत्री १३०० झाडे मिळूनही खाजगी नर्सरीतूनही केली झाडांची खरेदी, माहितीच्या अधिकारात उघड, ग्रामस्तांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार.

याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्तांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे.

सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायतीत शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ व रोपे खरेदी विक्री व्यवहारात त्रुटी असल्याचा प्रकार समोर आला आहे. जांभुळपाडा ग्रामस्तांनी माहितीच्या अधिकारातून मागविलेल्या कागदपत्रातून हा प्रकार उघड झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, याबरोबरच पर्यावरणाचा दिवसागणिक होत असलेला र्‍हास थांबण्यासाठी राज्य शासनाने यंदा १ जुलै ते ३ जुलै या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

वृक्षलागवड कार्यक्रम लोकचळवळ म्हणून वृध्दीगंत व्हावी व वनाच्छदीत प्रदेशात वाढ होवून हरित महाराष्ट्र घडावा या उद्देशाने वृक्षलागवड मोहिम राबविली जात असली तरी जांभुळपाडा ग्रामपंचायतीत मात्र या वृक्षलागवड उपक्रमाचे तीनतेरा झाले असल्याचे समोर आले आहे. याबाबत जांभुळपाडा माजी सरपंच मिलिंद बहाडकर, ग्रा.पं. सदस्य विशाल गुरव, संतोष अहिरे, भास्कर शेळके, मधुकर कदम गणेश शिंदे, वसंत खंडागळे, संदीप ठकोरे, आदिंसह ग्रामस्तांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेल्या तक्रारी निवेदनाद्वारे केली आहे. जांभुळपाडा ग्रामस्त संतोष विष्णु अहिरे यांनी वृक्षलागवडीसंदर्भात जांभुळपाडा ग्रामपंचायतीकडे तर विशाल गुरव यांनी सामाजिक वनिकरण परिक्षेत्र पाली सुधागड यांच्या कार्यालयाकडून मागविलेल्या माहितीच्या अधिकाराच्या कागदपत्रातून हा प्रकार उघडकीस आला आहे.

त्यानुसार सामाजिक वनिकरण परिक्षेत्र कार्यालय पाली सुधागड यांच्यामार्फत जांभुळपाडा ग्रामपंचायतीला दि. ६ जुन २०१८ रोजी १३०० झाडे देण्यात आल्याची पावती उपलब्द आहे. तर दुसर्‍या बाजूला जांभुळपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी शासनाने दिलेल्या १३ कोटी वृक्षलागवडीचे उध्दीष्ठ पुर्ण करण्यासाठी खाजगी नर्सरीतून देखील झाडे खरेदी केली आहेत. अशातच मौजे वर्‍हाड जांभुळपाडा सर्व्हे नं. १६३ गावठान क्षेत्रात ६०० झाडांची लागवड करण्यात आली असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ २५० झाडांच्या खरेदीसाठी २० हजार रुपये ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून खर्च करण्यात आले असल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या कागदपत्रातून समोर आले आहे. तसेच या पावतीप्रमाणे १ रोप ८० रुपयाप्रमाणे खरेदी केले आहे.

त्यामुळे शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्याक्रमाचा पुर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे सांगत जांभुळपाडा ग्रामस्तांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी ग्रामसभेत वृक्षलागवड कार्यक्रमातील त्रुटींचा मुद्दा ग्रामस्तांकडून उपस्थीत करण्यात आला. यावेळी सबंधीत ग्रामसेवकाने दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी शासनाने दिलेल्या वृक्षलागवडीच्या मुदतीनंतर १०० झाडे लावली असल्याचे ग्रामस्तांचे म्हणणे असून त्याबाबतचे आवश्यक पुरावे देखील ग्रामस्तांकडे उपलब्द आहेत. सामाजिक वनिकरण परिक्षेत्र पाली सुधागड कार्यालयात याबाबत चौकशी करुन १३०० वृक्ष खरेदीची पावती दाखविली असता सदर पावतीनुसार सदर झाडे ग्रामपंचायतीला दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. अशात जांभुळपाडा ग्रामसेवकाने खाजगी नर्सरीतून २० हजार रुपये किमतीची २५० झाडे का खरेदी केली असा सवाल उपस्तीत होत आहे. याबरोबरच जर सामाजिक वनिकरण परिक्षेत्र पाली सुधागड कार्यालयाने १३०० झाडे जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या नावाने पावतीसह दिली असतील तर ती झाडे गेली कुठे असा सवाल जांभुळपाडा ग्रामस्तांनी केला आहे. शिवाय राज्य शासनाचा १३ वृक्षलागवड कार्यक्रम करताना लोकप्रतिनिधी, ग्रामस्त, पोलीस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका, सर्व शालेय शिक्षक, सेविका, भजनी मंडळे, महिला मंडळे, अशासकीय संस्था, शेतीनिष्ठ, कृषीनिष्ठ, व कृषीभुषण पुरस्कारप्राप्त शेतकरी व पत्रकार आदिंसमवेत कार्यक्रम घेण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांनी जांभुळपाडा ग्रामपंचायतीला दिले होते. मात्र शासन आदेशानुसार देखील वृक्षलागवडीचा कार्यक्रम झाला नसल्याचे तक्रारदार ग्रामस्तांनी म्हटले आहे.

जांभुळपाडा ग्रामपंचायत वृक्षलागवड कार्यक्रमात सावळा गोंधळ झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे. दरम्यान पाली सुधागड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांची प्रतिक्रीया जानून घेतली असता जांभुळपाडा ग्रामस्तांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार चौकशी अहवाल तयार करण्याच्या सुचना ग्रामविस्तार अधिकारी महेश घबाडी यांना दिल्या असून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

Updated : 26 Sep 2018 12:37 PM GMT
Next Story
Share it
Top