Home > मॅक्स किसान > पाणीही नाही अन् दुष्काळही नाही 

पाणीही नाही अन् दुष्काळही नाही 

पाणीही नाही अन् दुष्काळही नाही 
X

मॅक्स महाराष्ट्रनं राज्यातील दुष्काळाची भीषणता जाणून घ्यायला सुरूवात केलीय. त्यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत लातूर जिल्ह्यातील फक्त एकाच तालुक्याची नोंद घेण्यात आल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलीय.

दुष्काळ घोषित करतांना जिल्ह्यावर अन्याय

राज्य सरकारनं २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. यापैकी ११२ तालुक्यांमध्ये गंभीर तर ३९ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, २-३ किलोमीटर पाण्यासाठी वण-वण फिरावं लागणाऱ्या लातुर तालुक्यावर अन्याय केल्याची भावना इथल्या ग्रामस्थांमध्ये आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना खायला चारा नाही अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर का केला नाही, असा संतप्त सवाल इथले ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. लातूर जिल्ह्यातील १० तालुक्यांपैकी फक्त शिरूर अनंतपाळ हाच तालुका मध्यम दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

लातूर तालुक्यात पिण्यासाठी पाणी नाही

लातूर तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. आमच्या टीमनं एकुर्गा गावातील शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळाची भीषणता जाणून घेतली. इथल्या कुटुंबांना पाण्यासाठी २-३ किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी बोअर, विहीरीचं अधिग्रहण नाही किंवा सरकारनं टँकरद्वारेही पाणी पुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळं प्रत्येक कुटुंबाला दररोज अंदाजे २००-३०० रूपयांचं पाणी खासगी टँकरमधून विकत घ्यावं लागतंय. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एकुर्गा परिसराची पाहणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय

साखर कारखान्यांकडून सापत्न वागणूक

लातूर तालुक्यातील एकुर्गा गावापासून जवळच तीन साखर कारखाने आहेत. मात्र, स्थानिक ऊस उत्पादकांऐवजी शंभर किलोमीटर अंतरावरील इतर शेतकऱ्यांचा ऊस हे कारखाने घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस उशीरा घेऊन जात आहेत, त्यामुळंही ऊसाचं नुकसान होतंय. शिवाय एकूण ऊसामध्ये कारखान्यांकडून २० ते ३० टक्के कपात केली जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. वेगवेगळ्या कारणांनी नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामेही अजून झालेले नाहीत, असा आरोप ऊस उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.

दुष्काळाकडे लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

माजी मुख्यमंत्री, दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख याच जि.प. मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. शिवाय स्थानिक आमदार त्र्यंबक भिसे हे ही काँग्रेसचे आहेत. या दोघांनीही दुष्काळाबाबत फारसं काही केलं नसल्याचा आरोप एकुर्गा इथल्या ग्रामस्थांनी केलाय. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थितीत गंभीर असतांना फक्त एकाच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेव्हा पालकमंत्री संभाजी पाटील हे काय करत होते, असा प्रश्नही ग्रामस्थांनी विचारलाय. दुष्काळासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

Updated : 10 Feb 2019 1:20 PM GMT
Next Story
Share it
Top