Home > Election 2020 > चित्र चौथ्या टप्प्यातील लढतीचे

चित्र चौथ्या टप्प्यातील लढतीचे

चित्र चौथ्या टप्प्यातील लढतीचे
X

नंदुरबार हिना गावीत भाजपा - के. सी पडवी कॉंग्रेस

हा कॉंग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ या मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रचाराची सुरूवात केली जायची. हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या माणिकराव गावित यांनी ४२ वर्षे राखला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या हिना गावीत यांनी भाजपात प्रवेश करून ही जागा जिंकली होती. मात्र मोदी लाटेचा प्रभाव असल्याने हिना गावीत यांना विजय मिळाला होता. आता पुन्हा एकदा कॉंग्रेसने आपल्या पारंपरिक मतदारसंघावर दावा केल्याने येथील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश आहे. हे तालुके सातपुडाच्या दुर्गम भागात असून या ठिकाणी अनेक समस्या आहेत. दुर्गम भागात अजूनही रस्ते, दूरसंचार, आरोग्य, शिक्षण, रोजगार, सिंचन, कुपोषण आणि स्थलांतर या मुख्य समस्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी भाजपाचे प्राबल्य वाढले असून काँग्रेस आणि भाजपा काट्याची लढत जिल्ह्यात पाहण्यास मिळते. मात्र या ठिकाणी डॉक्टर गावित परिवारातील गृहकलह पाहण्यास मिळतो. विजयकुमार गावित यांचे दोघे भाऊ माजी आमदार शरद गावित आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित राष्ट्रवादीत असल्याने डॉ. गावितांना या ठिकाणी तेही आव्हान निर्माण करताना दिसतात. जिल्ह्यात भाजपाने भरारी घेतली असेल तरी भाजपात सरळसरळ दोन गट आहेत. नवे कार्यकर्ते आणि जुने कार्यकर्ते असे हे गट असल्याने ही गटबाजी संपवून विजय मिळवण्याचे आव्हान हिना गावित यांच्यासमोर असणार आहे.

धुळे सुभाष भामरे –भाजपा - कुणाल पाटील कॉंग्रेस

हा मतदारसंघ मराठा – पाटील आणि मुस्लिम मतदारांचा असून या मतदारसंघावर कॉंग्रेस राष्ट्रवादीचा असलेला प्रभाव तोडून गेल्या निवडणूकीत सुभाष भामरे यांनी विजय संपादित केला. भामरे यांना केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती मिळाल्याने या मतदारसंघात भाजपाचे पारडे सध्या जड आहे. त्यात भामरे यांनी जातीय समिकरणे जुळवून आणल्याने कॉंग्रेसच्या कुणाल पाटील यांना ही लढत जड जाणार आहे. धुळे जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न, आदिवासी वनजमीनी आणि आरोग्य शिक्षणाच्या समस्या महत्त्वाच्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रोजगार, एमआयडीसी, सुल्वाडे जामफल कानोली धरणातील पाणी पुरवढा योजना, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, मालेगावमधील पावर लूम मजुरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. धुळे जिल्हा तसा शेतकरी बहुल असल्याने शेतीसाठी अजूनही आठ तास वीज मिळते, जी पूर्ण वेळ मिळण्याची मागणी आहे. 121 कोटींची भुयारी गटार योजनाही पूर्ण झालेली नाही. याच मुद्द्यांवर पुन्हा निवडणूक लढली गेली असून भामरे यांचे पारडे सध्या वरचढ आहे.

दिंडोरी – भारती पवार – भाजपा, धनराज महाले – राष्ट्रवादी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हा मतदारसंघ कॉंग्रेस आणि जनता दलाचा गड होता. मात्र गेल्या तीन टर्ममध्ये भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला. चव्हाण यांनी मतदारसंघात विशेष काम केले नाही, त्यामुळे गत निवडणूकीत त्यांना मोदी लाटेचा फायदा झालो होता. यावेळी भाजपाने त्यांचे तिकिट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार याना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने शिवेसेनेचे माजी आमदार धनंजय महाले यांना गळाला लावून त्यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील यंत्रमाग धारकांच्या समस्या, मुस्लिम समाजाचे प्रश्न, केळी आणि कांदा उत्पादक शेतक-यांच्या समस्या हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आदिवासी समाजाचे प्राबल्य असणा-या या समाजात आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. भारती पवार यांच्यामागे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीतील काही मंडळी असली तर पक्षनिष्ठा बदलल्यानंतर त्याचा किती फायदा होतो आणि महाले कसा फायदा करून घेतात यावर अवलंबून असल्याने या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

नाशिक – हेमंत गोडसे – शिवसेना, समीर भुजबळ - राष्ट्रवादी

नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा आहे. विद्यमान खसादार हेमंत गोडसे विरूद्ध राष्ट्रवादीचे समीर भुजबळ अशी लढत येथे होते आहे. या मतदारसंघात मराठा,दलित आणि काही प्रमाणात आदिवासी मतदार आहेत. गत निवडणूकीत शिवसेनेच्या गोडसे यांनी मोदी लाटेत विजय मिळवला असला तरी यावेळी मनसेचा प्रभाव असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी मोदी शहा यांच्याविरोधात घेतलेली भूमिका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला सहाय्यभूत ठरणारी आहे. त्यातच गोडसे यांच्याबद्दल असलेली नाराजी. नाशिक शहरात अजूनही अनेक समस्या आहेत. सध्या नाशिकमध्ये औद्योगिक क्षेत्राला अवकळा आलेली आहे. अनेक मोठे प्रकल्प शहराबाहेर जात आहेत. महिंद्रा कंपनी, IT सेक्टर अजूनही शहरात प्रकल्प नाही. त्यामुळे तरुणांचा बेरोजगारीचा महत्वाचा प्रश्न उभा आहे. विमानसेवेचा खोळंबा झालेला आहे. नाशिक ते पुणे रेल्वे सेवा सुरू नाही. त्यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक विकासकामे बाकी आहेत. त्यामुळे भुजबळ यांनी केलेली विकासकामे यांच्याशी त्यांची तुलना झाल्यास भुजबळांचे पारडे जड होते. त्यामुळे या निवडणूकीत गोडसे यांना नक्कीच भुजबळांशी झुंजावे लागणार आहे.

पालघर – राजेंद्र गावित -भाजपा, बळीराम जाधव – बाविआ

पालघर लोकसभा मतदारसंघावर डाव्या पक्षांचे वर्चस्व होते. हा मतदारसंघ शिवसेनेचे चिंतामण वनगा यांच्याकडे होता. त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसच्या राजेद्र गावीत यांनी भाजपात प्रवेश घेऊन ही पोटनिवडणूक जिकली होती. या मतदारसंघातील भाजपाचे मंत्री विष्णु सावरा यांच्या कामाबाबत आदिवसींमध्ये असलेली नाराजी आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांना डावलून गावितांना शिवसेनेने उमेदावरी दिल्याने या निवडणूकीत भाजपाला शिवसैनिक किती मदत करतील हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीला कॉंग्रेस राष्ट्रावादीची ताकद मिळाल्याने गावितांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. आदिवासीबहुल या मतदारसंघात शिक्षणाचे, आरोग्याचे, कुपोषणाचे, रोजगाराचे तसेच समृद्धी मार्गात जाणा-या जमीनीच्या प्रश्नांचे प्रश्न आहेत. आदिवासी कातकरी समाजाचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. गावित यांचा जनसंपर्क चागला असला तरी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याबाबत प्रसिद्ध नाहीत मात्र स्थानिक विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचा त्यांना पाठिंबा मिळाला तर त्यांच्यासाठी ती जमेची बाजू आहे. असे असले तरी ही निवडणूक त्यांना जड जाणार हे नक्की.

भिवंडी - कपिल पाटील – भाजप - सुरेश टावरे --- कॉंग्रेस

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे कपिल पाटील खासदार आहेत त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ आगरी-कुणबी आणि मुस्लिमबहुल मतदारांचा मतदारसंघ आहे. शहरीकरण झालेल्या कल्याण, भिवंडी या क्षेत्रासह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यासह वाड्याकडील ग्रामीण भाग येत असल्याने येथील आगरी कुणबी समाजाचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ काँग्रेसकडून भाजपाने खेचून घेतला. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात दाखल झालेले कपिल पाटील यांनी काँग्रेस पक्षात दाखल झालेले कुणबी सेनेचे संस्थापक विश्वनाथ पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र गेल्या साडेचार वर्षात भिवंडी लोकसभा मतदारसंघात हवी तशी विकासकामं झाली नाहीत. काही ठिकाणी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचं भूमिपूजन झालं. पण त्या कामांना गती नाही. कपिल पाटील यांनी खासदार निधीला शहरी भागात प्राधान्य दिल्यानं ग्रामीण भागात त्यांना याचा फटका बसू शकतो. तसंच भाजपमधलाच एक वर्ग कपिल पाटील यांच्यावर सुरुवातीपासूनच नाराज आहे. त्यामुळे यंदा भाजपची कसोटी लागणार आहे. कॉंग्रेसचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणारे सुरेश टावरे यांचा अल्पसंख्याक समाजाबरोबर असलेले सौहार्दपूर्ण संबंध यामुळे त्यांना पोषक वातावरण असून त्यांनी त्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरु केली आहे त्यामुळे यंदा या मतदारसंघात तुल्यबळ लढत पहायला मिळेल, मात्र समाजवादी पार्टीची भूमिका निर्णयाक राहणार आहे. या मतदारसघातील यंत्रमागधारक, आगरी कुणबी समाजाचे शेतीचे आणि रोजगाराचे प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

कल्याण - डॉ श्रीकांत शिंदे शिवसेना - बाबाजी पाटील राष्ट्रवादी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५० ते ६० टक्के मतदार हे आगरी समाजातील आहेत. ते आसपासच्या १७० च्या गावपाड्यांत वास्तव्यास आहेत. यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघातील शिळफाटा ते २७ गाव आणि पुढे अंबरनाथ, कल्याण, बदलापुरातील काही ग्रामीण पट्टय़ांत आगरी मतदारांचा आकडा मोठा आहे. रेल्वे, पायाभूत सुविधांचे प्रश्न कायम पायाभूत सुविधांच्या आघाडीवर तीनतेरा वाजलेली शहरे या मतदारसंघात आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता असली तरी ही शहरे नियोजनाच्या आघाडीवर फसली आहेत. कल्याण ते सीएसटी हा मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवास अजूनही सुसह्य झालेला नाही. या प्रश्नांसह शिवसेनेला आता मतदारांसमोर जायचे आहे. मात्र, मुंब्रा वगळता या पट्ट्यात शिवसेनेचा गड असल्याने शिवसेनेला हा मतदारसंघ सुरक्षित वाटतो आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांची मदत लाभली तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील हे आव्हान निर्माण करू शकतात.

ठाणे – राजन विचारे – शिवसेना - आनंद परांजपे – राष्ट्रवादी

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या कक्षेत नवी मुंबई, ठाणे आणि मिरा भाईंदरपर्यंतचा विस्तीर्ण पट्टा येतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नागरी समस्या आणि बकालीकरणाच्या समस्य़ा आहेत. या मतदारसंघावर गेली काही वर्षे शिवसनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या प्रकाश परांजपे यांच्यानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. गत निवडणूकीत शिवसेनेचे राजन विचारे या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याविरोधात यावेळी राष्ट्रवादीतून आनंद परांजपे यांना तिकिट देण्यात आले आहे. या मतदारसंघावरील शिवसेनेचे वर्चस्व पाहता परांजपे यांना ही निवडणूक नक्कीच सोपी नाही.

मुंबई उत्तर लोकसभा - गोपाळ शेट्टी – भाजपा - उर्मिला मातोंडकर --- कॉंग्रेस

मालाड पश्चिम ते दहिसर चेकनाक्यापर्यंत पसरलेल्या या मतदारसंघात संमिश्र मतदार आहेत. मराठी भाषिक, उत्तरभारतीय, गुजराती, दलित मुस्लिम आणि आदिवासी अशी मतदारसंघाची जातनिहाय रचना आहे. मतदार संघातील सर्वांत मोठी समस्या असेल तरी ती म्हणजे वाढती झोपडपट्टी. वन जमिनीसह जिल्हाधिकारी यांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात झोपड्या असल्याने त्यांचा पुनर्विकासाचाच प्रमुख मुद्दा आहे या मतदार संघात गोराई, मार्वे मनोरी असे कोळीवाडे तसेच गावठाणांचा मुद्दाही तेवढाच गंभीर आहे. कोळीवाड्यांचा विकास हाही प्रमुख मुद्दा आहे. आजही गोराई आणि मनोरीला फेरीबोटीने जाण्याशिवाय पर्याय नाही गावांमध्ये सुसज्ज असे रुग्णालय आणि प्रसुतीगृह बांधण्याची प्रमुख मागणी होत आहे. या मतदारसंघावर भाजपा आणि त्यानंतर कॉंग्रेसने आपला दावा सांगतिला होता. मात्र गेल्या निवडणूकीत मताधिक्याने निवडून येत भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी पुन्हा भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात कॉंग्रेसने आयत्यावेळेस अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवून लढतीत रंगत आणली आहे. उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीशिवाय मराठी चेहरा म्हणून समोर आल्याने तसेच अभिनेता गोविंदा यानीं या मतदारसंघातून विजय मिळवल्याचा इतिहास असल्याने ही लढत यावेळी अत्यंच चुरशीची ठरणार आहे.

मुंबई वायव्य - गजानन किर्तीकर शिवसेना - संजय निरूपम कॉंग्रेस

या मतदारसंघात बंगले, उच्चभ्रू वस्ती, म्हाडा वसाहती, कोळीवाडे, झोपडपट्टी अशी संमिश्र लोकवस्ती आहे. या मतदारसंघात साडे सहा लाख मराठी मतदार आहेत. उत्तर भारतीय (तीन लाख ६५ हजार) आणि मुस्लीम (तीन लाख ४५ हजार) यांचे प्राबल्य आहे. गुजराती आणि मारवाडी समाजाचे तब्बल दोन लाख मतदार आहेत. दरवेळी ४५ ते ५० टक्के मतदान होते. हे प्रमाण लक्षात घेतले तर ही काटय़ाची टक्कर असते. मोदी लाटेमुळे गेल्या निवडणूकीत कीर्तिकर यांचा विजय खूपच सोपा झाला होता. आता त्याची पुनरावृत्ती होईल, याची खात्री नाही. गेल्या पाच वर्षांत सेना-भाजप यांच्यातील कलहामुळे उभय कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. भाजप कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून काँग्रेसचा कोणीही उमेदवार असला तरी विजय आपलाच आहे, असा दावा त्यांनी केलाय. २००९ मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले व माजी केंद्रीय राज्यमंत्री गुरुदास कामत यांच्या अकाली निधनाने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी याही इच्छुक होत्या मात्र निरुपम यांच्या उमेदवारीने सेनेला धास्ती निर्माण झाली आहे. या मतदारसंघाशी दांडगा संपर्क असल्यामुळे युतीची मते खेचता येतील, असा निरुपम यांचा दावा आहे. गेल्यावेळी मनसेनेही ६६ हजार मते मिळविली होती. प्रामुख्याने अंधेरी पश्चिम व पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचा पारंपरिक मतदार मोठय़ा प्रमाणात आहे, त्याचा कलही या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव, दिंडोशी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून त्यापैकी भाजप व शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येक तीन आमदार आहेत.या मतदारसंघात झोपडीवासीयांच्या मतावरच काँग्रेसचा कायम डोळा राहिला आहे. या मतदारसंघात मध्यमवर्गीय मराठी मतदार मोठय़ा संख्येने असून त्यामुळेच सेनेला हा मतदारसंघ आपला वाटतो. गेल्या निवडणुकीत म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी तातडीने धोरण आणले जाईल, असे दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. धोरण विलंबाने जाहीर झाल्यामुळे हा मराठी मतदार तसा नाराज आहे. सीआरझेडमुळेही या परिसरातील अनेक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न रखडला होता. सीआरझेडचे धोरण जाहीर झाल्याने त्याचा फायदा कीर्तिकरांना घेता येईल या परिसरातील वाहतूक कोंडीबाबत ते फारसे काही करू शकलेले नाहीत, याबाबत मतदार नाराज आहेत.

ईशान्य़ मुंबई - संजय दिना पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस - मनोज कोटक भाजपा

ईशान्य मुंबईतल्या मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम ही मराठी वस्ती असलेले भाग आहेत. त्यावर आधी शिवसेनेची एकहाती सत्ता होती, पण मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर हा भाग राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला. पण मनसेकडून अपेक्षाभंग झाल्याने हा मतदार पुन्हा शिवसेनेच्या पारड्यात मतदान टाकण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईत दलित, मराठी, मुस्लीम, गुजराती असा वेगवेगळ्या प्रभावांचा मतदार आहे. त्यामुळे या सर्व वर्गांना मान्य होणारा उमेदवार इथे तरला जाण्याची शक्यताय,असं असलं तरी शिवसेना-भाजपमधील भांडणाचा राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. संमिश्र वस्तीच्या या मतदारसंघात मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम या भागात मराठी वस्ती अधिक असून, मुलुंड पश्चिम आणि घाटकोपर पूर्व या भागात गुजराती मतदारांचा बोलबाला आहे. मानखुर्द, गोवंडी या भागात मुस्लिमांचा वरचष्मा असून या मतदारसंघात दलित, उत्तर भारतीयांचाही टक्का निर्णायक आहे. या सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. मिठागरांच्या जागांचा रखडलेला विकास, नाहूर ते मुलुंडपर्यंतच्या अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न, रमाबाई आंबेडकर आणि मानखुर्दच्या झोपडपट्ट्यांचा विकास, मानखुर्दमधील मुस्लिम कब्रस्तानाचा प्रश्न आणि मल्टिस्पेशालिटी रूग्णालयाचा अभाव हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफूस साभाळून जर संजय पाटील यांनी या मतदारसंघात नवख्या

मुंबई उत्तर मध्य - पुनम महाजन भाजप - प्रिया दत्त कॉंग्रेस

बहुभाषिक, बहुधार्मिक अशी रचना असलेला हा मतदारसंघ. त्यामुळेच एखाद्या पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघात कधीच बघायला मिळालं नाही. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, कुर्ला, चांदिवली आणि विलेपार्ले असा आहे. महाराष्ट्राचे एक राजकीय सत्ताकेंद्र मातोश्री या मतदारसंघात येतें. तर बहुतांश बॉलीवुड स्टार्सही याच मतदारसंघात राहातात. सरकारी कर्मचा-यांची मोठी वसाहत, आर्थिक केंद्र असलेलं वांद्रे-कुर्ला कॉमप्लेक्स, मुंबईला जगाशी जोडणारे दोन विमानतळ, मुंबईतलं अत्यंत वर्दळीचं वांद्रे आणि लोकमान्य टिळक असे दोन रेल्वे टर्मिनसही याच मतदारसंघात येतात. वांद्रे - खार - सांताक्रुझ या भागांत उच्चभ्रु श्रीमंत वस्ती, विलोपार्ले-कलिनामध्ये मध्यमवर्गीय वस्ती तर कुर्ला परिसरामध्ये गरीब वस्ती असं वैविध्य इथे आहे. गेल्या निवडणूकीत भाजप उमेदवार आणि दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्य़ा पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांच्यावर विजय मिळवला होता. आता पुन्हा त्या समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत या भागांत मुस्लिम मतदाराची संख्या लक्षणीय आहे. त्यापाठोपाठ उत्तरभारतीय, दलित, ख्रिश्चन, मराठी भाषिक मतदारांची संख्या आहे. आता चार वर्षानंतर राजकीय परस्थिती बरीच बदललीय. या मतदारसंघात कामं झालेली नाहीत, त्यामुळे यंदा आपलाच विजय होईल, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतंय. पुनम महाजन जनतेशी जनसंपर्क फारसा चांगला नाही. त्यामुळे पूनम महाजन यांना पुन्हा निवडून येणें सोपे राहिलेले नाही. सध्या या मतदारसंघात भाजपाविरोधात नाराजी आहे. कॉंग्रेसने अंतर्गत गटबाजी टाळून लढत दिल्यास नक्कीच चित्र वेगळे दिसेल.

मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड कॉंग्रेस - राहूल शेवाळे शिवसेना

पूर्वीचा उत्तर-मध्य पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून दक्षिण मध्य मुंबई ओळख बनलेला लोकसभा मतदार संघ. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापासून ते अणुशक्ती नगरपर्यंत lj दादरच्या उच्चभ्रू शिवाजी पार्क पासून ते चेंबूरमधल्या झोपडपट्टीतील चाळींपर्यंत अशी संमिश्र लोकवस्ती असलेला हा मतदार संघ. आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी ही या लोकसभा मतदार संघाची ओळख. संसदेत सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे करतात. मराठी, दलित, गुजराथी, दाक्षिणात्य, मुस्लीम अशी मतदारांची रचना येथे आहे. इथला बहुतांष मतदार हा झोपडीवासीय आहे. या मतदार संघात कधीच कुठल्या एका राजकीय पक्षाची मक्तेदारी राहिलेली नाही. सध्या राजकीय संख्याबळ पहिलं तर शिवसेनेचे 3 आमदार, भाजपाचा एक आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत. दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्राबल्यामुळे पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेससाठी अनुकूल मानला जायचा. मोदी लाटेत शिवसेनेचे नगरसेवक राहुल शेवाळे महापालिका सभागृहातून थेट संसदेत पोहोचले. राजकीय विश्लेषकांच्या निरीक्षणानुसार दक्षिण मध्य मुंबईत सध्या शिवसेनेचंच पारडं जाड मानलं जाते आहे. गेल्या निवडणुकीत भाजपशी असलेल्या युतीचा फायदा दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेला झाला होता. सलग दोन टर्म असलेलं काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढणं शिवसेनेला शक्य झालं होतं. मात्र, गेल्या १० वर्षात धारावीचा पुनर्विकास सरकारी फायलींमध्ये गुदमरून गेलाय. धारावीकरांच्या आयुष्यात कसलांही बदल झालेला नाही. निवडणूक जवळ आली की राजकीय पक्षांना धारावीची आठवण होते. दर सहा महिन्यांनी धारावी विकासाची टूम निघते. पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही. झोपडपट्टीतला मतदार ते गगनचुंबी इमारतींमध्ये राहणारा उच्चभ्रू मतदार अशी इथं मिश्र लोकवस्ती असली तरी ईस्टर्न फ्री वेला लागून असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून प्रलंबित असल्याचा आरोप स्थानिक करतात. शेवाळे यांचा जनसंपर्क कमी झाल्याने मतदारांमध्ये असलेली नाराजी गायकवाडांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असली तरी पुन्हा क़ॉंग्रेसचा झेंडा फडकवणे त्यांच्यासाठी सोपे नाही.

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत --- शिवसेना - मिलिंद देवरा -- कॉंग्रेस

मुंबईतल्या सर्वात उच्चभ्रू लोकवस्तीचा या मतदारसंघात समावेश होतो. मलबार हिल, कुलाबा परिसरात विधानभवन, आमदार-खासदारांचे बंगले, मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला, कुलाब्यातल्या नौदलाच्या वसाहती, सीएसटी आणि आसपासचा उच्चभ्रू परिसर या मतदारसंघात येतो. पण त्यासोबतच शिवडी आणि वरळीतल्या बीडीडी चाळी तसेच काही मध्यमर्गीय वसाहती देखील इथे आहेत. त्यामुळे आधीपासूनच उच्चभ्रू राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा या मतदारसंघावर वरचष्मा राहिला आहे. काँग्रेस आघाडीच्या काळातील केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि त्याआधी त्यांचे वडील मुरली देवरा यांनी या मतदारसंघात १९८४ च्या निवडणुकांनंतर ६ वेळा काँग्रेसचा झेंडा फडकावला. जयवंतीबेन मेहतांच्या रुपाने दोन वेळा भाजपनेही आपला झेंडा रोवला होता. मात्र २०१४च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा खासदार या मतदारसंघातून निवडून गेला. एक लाखाहून जास्त मताधिक्याने अरविंद सावंत यांनी विजय नोंदवला. यात मोदी लाटेचा मोठा हात होता. सध्या मोदी लाट ओसरली असल्याने सावंत यांना यावेळी निश्चितच अडचण निर्माण झाली आहे. त्यातच मतदारांशी असलेला संपर्क कमी झाल्याने आणि कोणतेही मोठे विकासकाम न आणल्याने मतदारामध्ये असलेल्या नाराजीचा फटका त्यांना बसू शकतो. दक्षिण मुंबई मतदारसंघात हायप्रोफाईल आणि व्यापारी, उद्योजकांचं वास्तव्य असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे इथल्या मतदारांचं गणित वेगळं आहे. असं असलं तरीही चिराबाजार, ठाकूरद्वार, गिरगाव, कुंभारवाडा या भागात मराठी वस्ती जास्त असल्याने शिवसेनेचं प्राबल्य चांगलं आहे. तसंच या मतदारसंघातला एकेकाळी अस्सल मराठमोळा भाग असलेलं गिरगाव यावेळी कोणाच्या बाजूने उभं राहतं हे महत्त्वाचं असणार आहे. कारण मेट्रो प्रकल्पावरुन गिरगाववासियांनी मोठा लढा दिला होता. त्याला शिवसेनेने चांगली हवा दिली होती.मात्र, भायखळा आणि नागपाडा विभागातील मुस्लिम मते यावेळी एमआयएमकडे वळण्याची चिन्हे नसल्याने देवरा यांना ती मते मिळाली तर निश्चितच निकालावर परिणाम होवू शकतो.असलेल्या कोटक यांना टक्कर दिली तर ही लढत यावेळी वेगळा निकाल देवू शकते.

मावळ - श्रीरंग बारणे --- शिवसेना - पार्थ पवार राष्ट्रवादी

मावळ मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल हे विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झाला आहे. या मतदारसंघावर शेकाप कॉंग्रेस यांचे वर्चस्व होते. तर त्यानंतर राष्ट्रवादीने दावा सांगतिला होता. यंदा या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे यावेळी बारणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिले आहे. मावळ मतदारसंघात प्रामुख्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रिंगरोडचा मुद्दा. तसेच, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आयोजलेली पवना धरण बंद जलवाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मावळ मधील लोकांचा या बंद जलवाहिनी मोठा प्रश्न आहे, या बंद जलवाहिनी काही दिवसांपूर्वी मावळ मध्ये या प्रकल्पा विरुद्ध मोठे जनआंदोलन उभे केले होते त्या मध्ये या आंदोलनात तीन शेतकऱ्याचा मृत्यू देखील झाला होता .मावळ लोकसभा मतदार संघावर पगडा आहे, तो पिंपरी चिंचवडचा. वास्तविक पाहता पिंपरी चिंचवडमधल्या लोकांना मुंबई, लोणावळा इथे जाण्यासाठी अधिक ट्रेनची आवश्यकता आहे. या फेऱ्या वाढाव्यात आणि त्याच बरोबर ट्रॅक वाढवले जावेत ही मागणी गेली कित्येक वर्षे केली जाते आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणारी अनेक घरे ही संरक्षण विभागाच्या हद्दीत अर्थात रेड झोनमध्ये येतात. हा प्रश्न संरक्षण विभागाशी निगडीत असल्याने त्यावर तोडगा निघालेला नाही. रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचा विचार केला, तर या उरण येथील जेएनपीटीचे प्रकल्पग्रस्त, CWC मधील स्थानिकांच्या नोक-या, पनवेल – उरण लोकल रेल्वे, पनवेल – कर्जत लोकल सेवा, रसायनीतील HOC मधील प्रकल्प ग्रस्तांचा प्रश्न कायम आहे. उरणमधील जेएनपीटीमध्ये स्थानिकांच्या जमिनी गेल्यात, स्थानिकांचा रोजगार बुडाला आहे. या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून पार्थ पवार यांनी मतदारांना आवाहन केल्याने तसेच पवार कुटूंबियांचे पाठबळ असल्य़ाने त्यांनी या मतदारसंघावर आपला ठसा उमटवला तर आश्चर्य वाटायला नको.

शिरूर शिवाजीराव आढळरावशिवसेना - डॉ अमोल कोल्हेराष्ट्रवादी

पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र परिसर असलेल्या शिरूर मतदारसंघात मराठा आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. जिल्ह्याच्या राजकारणात शिरूर मतदारसंघ कायम चर्चेत राहिला आहे. दिलीप वळसे आणि आढळराव यांच्यात वरकरणी राजकीय संघर्ष असला तरी शिरूर लोकसभा आणि आंबेगाव विधानसभेच्या राजकारणात त्यांच्यात सामंजस्य दिसून येते. भोसरीतून अपक्ष निवडून आलेल्या आमदार लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच शिरूरसाठी शड्डू ठोकले होते. नंतर मात्र त्यांनी लोकसभेऐवजी भोसरी विधानसभा लढवण्याची भूमिका घेतली. सन २००९ मध्ये शरद पवारांनी शिरूर लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. मात्र त्यांनी माढा लोकसभेचा पर्याय निवडला. खासदार आढळराव चौथ्यांदा रिंगणात आहेत. पूर्वी ते वळसे पाटलांचे निकटवर्तीय होते. पुढे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. आढळराव शिवसेनेत गेले. सन २००४च्या लोकसभा निवडणुकीत आढळरावांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार अशोक मोहोळ यांचा पराभव केला. त्यानंतर २००९च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचातर गेल्या २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या देवदत्त निकम यांचा पराभव करत आढळरावांनी हॅट्ट्रिक साधली. आतापर्यंतच्या प्रवासात आढळरावांना भाजपशी असलेल्या युतीचा फायदाच झाला. राष्ट्रवादीला शिवसेनेकडून झालेल्या सलग तीन पराभवाचे उट्टे काढायचे आहे. आढळराव यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा केला जात नाही. हेच आढळराव यांच्या पथ्यावर पडते. मात्र, यंदा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे अभिनेते डॉ संभाजी कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करीत आढळराव यांना तगडे आव्हान दिले आहे. कोल्हे यांच्या मालिकेतील लोकप्रियता आणि त्यांना मिळणारा तरूणांचा महिलांचा प्रतिसाद पाहता आढळराव यांना यंदाची निवडणूक सोपी नाही हे लक्षात येताच त्यांनी सेलिब्रेटी काय कामे करणार अशा घोषा लावला आहे. या मतदारसंघातील समस्या म्हणजे पुणे-नाशिक रेल्वे, पुणे-नाशिक महामार्ग, रस्त्यांचे रुंदीकरण, वाहतूककोंडी, बैलगाडा शर्यतींवरील बंदी, विमानतळाचे स्थलांतर, दाऱ्या घाटाचा प्रलंबित प्रश्न, पाण्याची टंचाई, शेतीमालाला हमीभाव, औद्योगिक पट्टय़ातील खंडणीखोरी या प्रश्नांची तड लागणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पाहिले तर मालिकेतील संभाजी विरूद्ध शिवाजी अशी लढत नक्कीच रंगतदार होणार आहे

शिर्डी - सदाशिव लोखंडे शिवसेना - भाऊसाहेब कांबळे कॉंग्रेस

पुर्वीचा कोपरगाव मतदरसंघ २००९ साली शिर्डी या नावाने ओळखला जाऊ लागला याच वर्षी अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित करण्यात आला. २००९ साली शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवले यांचा पराभव केला होता. कोपरगाव लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे दिर्घकाळ वर्चस्व होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील हे या मतदारसंघातून नऊ वेळा खासदार झाले होते. मात्र मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर इथे २००९, २०१४ सलग शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांनी अवघ्या 15 दिवसांचा प्रचार करुन विजयश्री मिळवली होती. यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना कॉंग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांनी आव्हान दिले आहे. मराठा आणि दलित मतदारांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा. निळवंडे धरणावरून या मतदारसंघात नेहमीच राजकारण होत आले. धरणाचे काम पुर्ण झालेले असून कालव्याचे काम अद्याप बाकी आहे. निळवंडे कालव्यांचा प्रश्न प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी ठरत आहे. 182 गावांच्या पाण्याचा हा ज्वलंत प्रश्न आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेनेकडून श्रेयाचं राजकारण सुरू आहे. गेल्या चार दशकांपासून निळवंडे धरणाच्या कामावरूनच लोकसभा निवडणुका लढवल्या जात आहेत. शिर्डी साईबाबा संस्थानने कालव्यांच्या कामासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. यावरुन श्रेयवाद सुरू आहे, तर अकोले तालुक्यात बंदीस्त कालव्यांची मागणी करत राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी कालव्यांची कामे बंद पाडली. शिवसेनेचे विद्यमान खासदार लोखंडे यांचा कमी असलेला जनसंपर्क ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटी ठरणार आहे तर भाऊसाहेब कांबळे या नवख्या उमेदवाराला या मतदारसंघात किती मताश्रय मिळतो यावरच ही लढत निर्णायक ठरणार आहे.

Updated : 26 April 2019 3:43 PM GMT
Next Story
Share it
Top