Home > मॅक्स रिपोर्ट > Online Education:दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार अंधारात आहे का?

Online Education:दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार अंधारात आहे का?

Online Education:दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत सरकार आंधळ झालं आहे का?

Online Education:दृष्टीहीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार अंधारात आहे का?
X

Online Education घेताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अडचणी येत असताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय झालं असेल? याचा विचार आपण कधी करणार आहोत का? जे विद्यार्थी सदृढ आहेत. अशा मुलांचा शिक्षणाचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला असेल तर ज्या मुलांना दृष्टी नाही, ऐकता येत नाही, बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय झालं असेल? वाचा गौरव मालकचा स्पेशल रिपोर्ट

कोरोनामुळं मानवी जीवन प्रणालीवर मोठा परिणाम झाला आहे. मानवाची जीवनपद्धती बऱ्यापैकी बदलली आहे. तशाच पद्धतीने शिक्षण पद्धती देखील बदलली आहे.

covid-19 मुळं जवळ जवळ सर्व जगात ऑनलाइन शिक्षण सुरु झालं आहे. online Education असं गोंडस नाव देऊन शिक्षणाला सुरुवात झाली.

ज्या मुलांकडं मोबाईल नाही. ते विद्यार्थ्यी शिक्षण प्रक्रियेपासून वंचित राहिली. ज्यांच्याकडे मोबाईल, इंटरनेट आहे. त्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान यासारखे विषय अधिकच कठीण जाऊ लागले आहेत. कमी वयात मुलांचा मोबाईलचा वापर वाढला आहे. त्याचे वेगळे परिणाम समोर येत आहेत. खेड्यागावात इंटरनेटचा स्पीड नसल्याने मुलांना शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. अशा विविध समस्या मुलांना येत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. या संदर्भात माध्यमांमध्ये बातम्या देखील छापून आल्या आहेत.

मात्र, या सर्वांमध्ये दिव्यांग (Special Child) मुलांचं काय झालं? जे विद्यार्थी सदृढ आहेत. अशा मुलांचा शिक्षणाचा इतका मोठा प्रश्न निर्माण झाला असेल तर ज्या मुलांना दृष्टी नाही, ऐकता येत नाही, बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय झालं असेल?


ऑनलाईन शाळा सुरु झाल्यानंतर सर्वसाधारण शाळांमध्ये अभ्यासाचे साहित्य/ स्टडी मटेरिअल नव्हते. अजुनही पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. यातच दिव्यांग मुलांचं (Special Child) काय झालं असेल? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

online शिक्षण योग्य की अयोग्य? तंत्रज्ञानाचे 'फायदे आणि तोटे' या व अशा अनेक विषयांवर अनेकांनी तर्क-वितर्क लावले. परंतू या सगळ्यांमध्ये याच तंत्रज्ञानाच्या शिक्षण प्रणालीचा फटका अनेक दृष्टी बाधित दिव्यांग विद्यार्थ्यांना बसला आहे.

या संदर्भात आम्ही दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी चर्चा केली.

अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाच्या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या करण पवार या विद्यार्थ्यांशी आम्ही बातचीत केली. नरेंद्र सांगतो...

"गेल्या एका वर्षापासून मी online शिक्षण घेत आहे. परंतू, या शिक्षणात आणि त्या शिक्षणात मोठा फरक आहे. मी दृष्टीबाधित आहे. मला या पद्धतीने शिकताना अडचणी येत आहे. online शिक्षण पद्धतीमध्ये अनेक निरनिराळे application आहेत. त्यामुळे या शिक्षण पद्धतीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. जसे की दृष्टीबाधीत मुलांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण घेताना आमच्याकडे असलेल्या mobile मध्ये accessibility नावाचा पर्याय असतो आणि याच पर्यायाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण mobile हाताळू शकतो.

परंतू शिक्षणाशी निगडीत अनेक application या पर्यायाशी विसंगत आहेत.

उदाहरणार्थ.. Diksha app , Zoom app , Microsoft Team इत्यादी.

करण ने सांगितलेल्या समस्यांवर अद्यापर्यंत काम झालेलं नाही. असं करण सांगतो.

मुंबई येथील Elphinstone महाविद्यालयात शिक्षण घेणारी वैशाली गोपनारायण सांगते.

"शिक्षण घेत असताना आम्हाला श्राव्य आणि स्पर्श ज्ञानाच्या माध्यमातूनच अभ्यास करता येतो. याकरिता दृष्टी बाधीत विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी मध्ये असणारी पुस्तके असतात. परंतू यावर्षी पाठ्यक्रम बदलल्यामुळे ही पुस्तके अजूनही तयार झालेली नाहीत. त्यात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये हे शिक्षण कसं पूर्ण करायचं? असा प्रश्न माझ्या समोर आहे.''

असं मत वैशालीने मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना व्यक्त केलं आहे.


पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकणारा सतीश एकनार सांगतो,

"मी सध्या ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आमच्या भागामध्ये तासन तास वीज पुरवठा खंडित झालेला असतो. अशामध्ये महाविद्यालयाचे online lecture अनेक वेळा करता येत नाहीत आणि दुसरीकडे आमच्यासाठी पुस्तकही नाहीत. अशा परिस्थितीत परीक्षेमध्ये उत्तम गुण कसे मिळणार? घरच्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? आणि जर उत्तम गुण मिळाले नाही तर पुढच्या वर्षी चांगले महाविद्यालयात मला प्रवेश मिळेल का? गूण कमी मिळाले तर शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल का? असा प्रश्न माझ्यासह अनेकांना पडला आहे".

एकंदरीत सतीशला ऑनलाइन शिक्षणामुळे भविष्यातील शिक्षणाबाबत शंका आहेत.

युवाशक्ती महाविद्यालय अमरावती येथे पदवीच्या प्रथम वर्षाला असलेला गोपाल अंजनकर सांगतो...

"प्रशासकीय स्तरावर शैक्षणिक दृष्ट्या होणाऱ्या निर्णय प्रक्रियेमध्ये दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांचा अजिबात विचार केला जात नाही. मग त्यामध्ये परीक्षेसाठी लेखनिक न मिळण्याची अडचण असो किंवा आमच्या लिपीमध्ये पुस्तकांची अडचण. यातील उदाहरण द्यायचे झाले तर बारावीमध्ये शिकणाऱ्या दृष्टीबाधित बांधवांना परीक्षेकरिता लेखनिक मिळत नव्हते तर MaxMaharashtra ने जेव्हा आमची समस्या लक्षात घेऊन बातमी केली. तेव्हा कुठे सरकारला जाग आली.

आमच्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही. असं मत गोपाल अंजनकर यांनी व्यक्त केलं आहे.

अमरावती येथे किशोर भाई लाहोटी महाविद्यालय इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या लखन राठोड सांगतात,

"मी पुसद या यवतमाळ जिल्ह्यामधील छोट्या तालुक्यातील एका तांड्यावर राहतो आणि माझी परिस्थिती अगदी बेताची आहे. आमच्या घरी साधी लाईट देखील नाही. बाबा छोटा-मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात. माझ्याकडे अभ्यासासाठी कुठलेही साधन नाही, त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून माझा एकही तास झालेला नाही आणि दुसरीकडे पुस्तक देखील नाहीत. आता परीक्षा डोक्यावर आली आहे. मग अशात परीक्षेमध्ये लिहायचे तरी काय?

असा सवाल लखन राठोड या 12 वीतील विद्यार्थ्याने केला आहे.

आता या सगळ्या संदर्भात आम्ही या दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेतल्या.

शिक्षक माधव तायडे सांगतात…

"online शिक्षण ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. यात काही शंका नाही. परंतू हे शिक्षण दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांना देत असताना या विद्यार्थ्यांशी जवळीकता साधता येत नाही आणि यामुळेच गणित, विज्ञान यासारखे विषय विद्यार्थ्यांना अवघड जातात. कारण विज्ञानामध्ये विविध आकृत्या आणि प्रात्यक्षिक हे या विद्यार्थ्यांना स्पर्शाच्या साहाय्याने दाखवणे अत्यंत महत्त्वाचे असते. परंतू सध्याची परिस्थिती पाहता ते शक्य नाही."

असं मत शिक्षक माधव तायडे यांनी व्यक्त केलं आहे.


शिक्षक सोपान रत्नपारखी हे संगीत हा विषय शिकवतात. त्यांचंही मत आम्ही या संदर्भात जाणून घेतलं. ते म्हणाले...

मी संगीत या विषयाचा शिक्षक आहे आणि अनेक दृष्टी बाधित विद्यार्थ्यांना मी शिकवतो. 12 वी सारख्या महत्त्वाच्या वर्षाला देखील संगीत हा विषय असतो आणि हा विषय शिकवत असताना online lecture मध्ये व्यवस्थित शिकवता येत नाही. कारण संगीत या विषयांमध्ये विविध वाद्यांचा प्रात्यक्षिक या विद्यार्थ्यांना स्पर्शाच्या साहाय्याने शिकवता येतं. सर्व मुलांकडं हे साहित्य घरी असेलच असे नाही.

असं मत सोपान रत्नपारखी यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरीत विद्यार्थी आणि शिक्षकांची मत जाणून घेतल्यानंतर एक बाब स्पष्टपणे समोर आली ती म्हणजे लॉकडाऊनच्या काळात दृष्टीबाधीत मुलांच्या शिक्षणावर कोणीही लक्ष दिलं नाही. असं दिसून येतं. शासनाने कल्याणकारी राज्याचा भाग म्हणून तरी दिव्यांगाच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, आपल्या प्रयत्नांच्या बळावर मुख्यप्रवाहात येणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या पंखांना शासनाने आज जर बळ दिलं नाही. तर ही पिढी कायमची मुख्य प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती आहे.

जगात तंत्रज्ञान अगदी प्रगत होत चालले आहे आणि याच तंत्रज्ञानाचा आपण सर्व अगदी मोठ्या प्रमाणात वापर करत आहोत. आता या तंत्रज्ञानाच्या प्रणालीमध्ये दृष्टी बाधितांना आगामी काळात जर सुलभता प्राप्त झाली तर हे विद्यार्थी देखील तंत्रज्ञानाच्या या मुख्य प्रवाहामध्ये येऊन अधिक सक्षम होतील. याकडे लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल हीच अपेक्षा.

- गौरव मालक

Updated : 22 March 2021 10:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top