News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > कोकणातील समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान, मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

कोकणातील समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान, मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात

कोकणातील नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र हाच व्यवसाय समस्यांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यातच जेलिफिशच्या संकटामुळे मच्छिमार त्रस्त झाले आहे. पण या जेलिफिशच्या वाढीची कारणे, जेलिफिशच्या संकटावर उपाय आणि मच्छिमारांसमोर उभे राहिलेले संकट याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

कोकणातील समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान, मासेमारी अडकली समस्यांच्या जाळ्यात
X

रायगड़ जिल्ह्यासह कोकणाला 720 किमी लांबीचा विस्तृत व अथांग असा सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश लोक मत्स्यव्यवसायावर आपली उपजीविका भागवत असतात. मात्र आजघडीला मत्स्यव्यवसाय चहूबाजुनी उध्वस्त होताना दिसतोय. इथली मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे, आता मत्स्यव्यवसाईकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. तर वाढत्या कर्जाने आत्महत्या करण्याची नामुष्की देखील ओढवण्याची भीती मत्स्यव्यवसाईकांना सतावतेय.

अलीबाग, मुरुड, श्रीवर्धन व कोकण किनारपट्टीत समुद्रकिनारी जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्यात मासेमारीसाठी घातल असलेल्या जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्किल झाले आहे. तसेच या जेलिफिशच्या संकटामुळे कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने मासळी मिळणे मुश्किल झाले आहे. उत्पादन घटले आहे, परिणामी मच्छीमार संकटात सापडला आहेत.आपल्या देशाला एकूण 7516 किलोमीटर सागरी किनारा लाभलेला आहे.ज्यावर एकूण 3288 मासेमारी गावे असून जवळपास 40 लाख लोक त्यावर अवलंबून आहेत असे केंद्रीय सागरी मत्स्य विभागाने 2010 मध्ये केलेल्या नोंदीतुन समजते. रायगड़ जिल्ह्यातील समुद्रकिनारी दिघी, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, जीवना, बागमांडला व मुरुड तसेच अलीबाग तालुक्यात देखील नवेदर नवगाव, रेवस, बोडणी, मांडवा, वरसोली अशी मासेमारीसाठी अनेक प्रसिद्ध बंदर आहेत. मात्र याठिकाणी जेलिफिश मुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाल्याने कोळीबांधव व मत्स्यव्यवसायीक चिंताग्रस्त झालेत.

कोकणातील पर्यटनासाठी नारळ - सुपारीच्या बागा, निसर्ग सौंदर्याने नटलेली गावे यासोबतच रोजगार मिळवून देणारी पारंपारिक मासेमारी महत्वाची ठरते. मात्र, मोठया प्रमाणात समुद्रात जेलिफिशचे संकट वाढल्याने मासेमारी समस्यांच्या जाळ्यात अडकली आहे.
या गावातील अनेक स्थानिक या समुद्रामध्ये पारंपरिक पद्धतीने किंवा छोट्या होडीने मच्छीमारी करून उपजीविका करतात. दरम्यान वातावरणातील बदल, अवेळी वादळी पावसाची हजेरी असे अनेक संकटांतून सामोरे जाऊन मासेमारी दुष्काळ सहन करत असताना त्यामध्ये आता विषारी जेलिफिशने परिसरातील मच्छीमार चिंताग्रस्त झाले आहेत.

वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पाऊस व बदलणारे हवामान यामुळे मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे फार मुश्किल झाले आहे. तर आठ ते दहा दिवस खोल समुद्रात जाऊन सुद्धा पुरेशी मासळी मिळत नसल्याने व्यावसायिक खूप चिंतेत आहेत . डिझेल खर्च , बर्फ व होडीवर काम करणाऱ्या लोकांची मजुरी सुद्धा सुटत नाही . त्यामुळे हा व्यवसाय कसा करावा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सध्या खोल समुद्रात जेलिफिश वाढल्याने जाळ्यात त्याचेच प्रमाण जास्त असल्याने मासळी फार कमी मिळत आहे. खर्च देखील सुटत नसल्याची परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे मच्छिमारांनी होड्या समुद्रकिनारी नांगरल्या आहेत

मॅक्स महाराष्टाने येथील मच्छिमारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्यां जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक मच्छिमारांनी आपली कैफियत व दुःख मांडले तर अनेकांनी सरकारविरोधात चीड व संताप व्यक्त केला आहे. हिवाळ्यात समुद्रकिनारी जेलिफिशना पोषक वातावरण तयार होऊन त्या किनार्‍यालगत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतात. जेलिफिशचा डंक शरीराला इलेक्ट्रिक शॉक लागल्या सारखा असतो. त्यामुळे वेदना होऊन सर्वत्र खाज सुटते, अशी माहिती व्यवसायिक देत आहेत. त्यामुळे उपजीविका कशी करणार? अशी चिंता मच्छिमारांना सतावते आहे.

खोल समुद्रात गेल्यावर फिशिंगवाल्या व जाळीवाल्या मासेमारीचे उत्पादन कमी झाले आहे. मासेमारीत डोलवीमध्ये मोठया प्रमाणात जेलिफिश अडकल्याने ती शरीराला घातक ठरत असून हातापायांना, डोळ्यांना इजा होण्याची भीती मासेमारीला निघताना मनात कायम आहे, असे जीवना कोळीवाड्याचे माजी चेअरमन बाळकृष्ण रघुवीर यांनी सांगितले.

भरडखेल येथील मच्छिमार कल्पेश पावशे यांनी सांगितले की, कोरोनाने ग्रामिण भागातील अनेक३चे व्यवसाय हिरावले आहेत. पर्यटनावर अवलंबून असणारा आणि मासेमारीचा व्यवसाय अनेक दिवस बंद होता. श्रीवर्धनमधील पर्यटन हंगामाला जोर मिळत असतानाच मासेमारी व्यवसाय जेलिफिशमुळे संकटात सापडला आहे. तसेच दिनेश चोगले यांनी मच्छिमारांची व्यथा सांगताना म्हटले की, भरडखोल बंदरात गेले काही दिवस मासळीसाठी टाकलेली जाळी व डोलवी जेलिफिशने भरून निघते. त्यामुळे जाळ्यात मासळी कमी प्रमाणात व जेलिफिश जास्त असते. त्यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त केली.

सध्या एकीकडे महागाईचा आगडोंब तर दुसरीकडे नोकरांचे पगार, पेट्रोस डिझेलचे दर, भत्ता खर्च, जाळीखर्च व कर्जाचे थकलेले हप्ते कसे भरायचे असा प्रश्न पडला आहे. त्यातच जेलिफिशसारख्या आपत्तींमुळे आमच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे शासन स्तरावर आम्हा कोळी लोकांना मदत करावी, अशी मागणी दिघी कोळी समाजाचे अध्यक्ष किरण कांदेकर यांनी सांगितले.
विमल अमृत कोळी या महिलेने आपली कैफियत मांडताना सांगितले की जेलीफिश पासून आमचे धंदे ठप्प पडलेत. वर्षभर हातात कोणतेही उत्पन्न नाही. मजूरी वाढली, डिजेल पेट्रोलचे भाव वाढले. एल ई डि बोटीवाले दोन दोन तीन तीन लाख ची पलट घेतात. आम्हाला एक लाख रूपयांची पलट होत नाही. जेलीफ़िश मुळे हाता पायाना खाज येते. डोळ्याना इजा होते. उन्हात फिट येवून कोळी महिला पडतात. मात्र आमच्याकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. जेट्टी वर कोणत्याही सोईसुविधा नाहीत. निवडणुकीत राजकारणी केवळ आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात कोळी बांधवांच्या वेदना व कष्ट कमी व्हायला कोणतीही मद्त व सहकार्य करीत नाहीत. आमची कुटुंब आम्ही जगवायची कशी? असा सवाल विमल कोळी यांनी उपस्थीत करतात.

नवेदर नवगांव कोळी वाड्यातील शिवदास गजानन मुंडे यांनी सांगितले की जेलफिश मुळे तीन महिने बोटी किनारी लागून आहेत. आमची संपूर्ण जाळी फाटली. यापूर्वीच वादळांनी आमचे खुप मोठे नुकसान झाले. तर आता जेलीफिश मुळे आमची अवस्था बिकट झाली. जेलिफिशमुळे मोठी मच्छी नष्ट झाली. सरगा, सिंगाला, पापलेट, घोल मासा आता मिळत नाही. लहान मच्छी परवडत नाही, कामगारांची मजूरी सूटत नाही. त्यामुळे कोळी बांधव संकटात आहेत. त्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे, असे मत व्यक्त केले.

नवेदर नवगाव कोळी वाड्यातील दिनेश पोशा सुरेकर म्हणाले की, पाच वर्षापासून जेलीफिश मुळे आमचे मासळी उत्पादन घटलेय. एल ई डी बोटीमुळे जेलीफिश वाढले. प्रकाशझोताने जेलीफिश खोल समुद्रात जात नसून किनाऱ्याकड़े येते. जाळ्यात जेलीफिश मोठ्या प्रमाणावर सापडत असून मत्स्य उत्पादनाला फटका बसला आहे. सरकार कडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी आहे.

दीपक झिटे या कोळी बांधवाने यावेळी संतप्त होत प्रतिक्रिया दिली. जेलीफिश मुळे चार पाच वर्षात खुप मोठे नुकसान झाले. एल ई डी बोटीमुळे जेलीफिश वाढले. सरकार या बोटींवर कारवाई करीत नाही, दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पारंपरिक व छोटे व्यवसाईक मरत आहेत. एल ई डी बोटी बंद झाल्या पाहिजे. सरकार गरिब जनतेला मारत आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता मग कोळ्यांना भरपाई का देत नाहीत? कोळ्यांचे माव्हरे चवदार लागतात, मग आम्हाला भरपाई कोण देणार ?असे सवाल झीटे यांनी उपस्थीत केले.

महादेव मच्छीमार संघटनेचे चेअरमन

उल्हास वाटखरे म्हणाले कि जेलीफिश अत्यंत घातक व विषारी आहे. जेलिफिशने शारीरिक व आर्थिक हानी होतेय. आज नैसर्गिक संकटे देखील कोळी बांधवांना जगू देत नाहीत. आम्ही वारंवार सरकारकडे निवेदनाद्वारे प्रश्न व समस्यां मांडतोय, मात्र सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद व सहकार्य मिळत नाही हे दुर्दैव्य आहे. डिझेल भाव वाढीने व जेलिफिशने मत्स्य उत्पादन घटल्याने मच्छीमार कोळी बांधवांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. एल ई डी बोटींच्या प्रकाशझोताने जेलिफिश खोल समुद्रात न जाता किनारपट्टी कडे येते.परिणामी पारंपरिक व लहान होड्याने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी व जेलिफिश अधिक येतात, यामुळे जाळी तुटून देखील नुकसान होते. सरकारने याचा साकल्याने विचार करून कोळी बांधवांना जगविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे अशी विंनती वजा मागणी वाटखरे यांनी केली.

मुरुड तालुक्यात छोटया व मोठ्या अशा एकूण ६५० होड्या असून त्यापैकी निम्यापेक्षा जास्त होड्यांनी किनारा गाठला आहे. मागील दोन वर्षांपासून चक्रीवादळ, निसर्ग वादळ, अवकाळी पाऊस यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. तसेच मासळी खूप दूरवर निघून गेल्याने पुन्हा एकदा बोटी किणाऱ्याला परत आलेल्या आहे. निसर्गाशी लढणे आता कोळी बांधवांना कठीण झाले असून मच्छीमार पूर्णतः हतबल झाले आहेत. जूनला शासनातर्फे मासेमारी न करण्याचे आदेश दिले जातात त्यावरून साधारतः २८ मे पासून मच्छिमार होड्या किनाऱ्याला लावत असतात. परंतु यंदा जेलिफिशचा फटका बसून मासळीच मिळत नसल्याने मच्छिमारांनी स्वतःहून लवकरच होड्या किनाऱ्यावर साकारून पुन्हा मासेमारीला न जाण्याचे ठरवल्यामुळे एकदरा पुलाच्या कठड्याला जाळ्या सुकवण्याचे चित्र पहावयास मिळत आहे . यंदा किमान एक महिना अगोदर मासेमारीचा काळ समाप्त झाला असून खूप लवकर मासेमारी संपुष्टात आली आहे. मासळी नसल्यामुळे होड्या किनारी आल्याने कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे . यंदा मासळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्जाऊ घेतली रक्कम कशी फेडावी अशी चिंता कोळी बांधवांना सतावत आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीकडे कोळी बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.

जेलीफिशला पोषक वातावरण कसे निर्माण होते?

समुद्र हे जगभरात मोठ्या शहरात निर्माण होत असलेला मानवी आणि औद्योगिक मैला फेकण्याची जागा झालेला आहे. ज्यामुळे मुंबई, न्यूयॉर्क सारख्या शहरात निर्माण होत असलेला मानवी मैला, बोईसर-तारापूर एमआयडीसी, वापी-जीआयडीसी सारख्या औद्योगिक वसाहतीतून निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडले जात आहे. ज्यामुळे समुद्रातील प्राणवायू ह्या रसायनांची संयुगे बनवत असल्याने कमी होतो आहे. शिवाय ह्या रसायनामुळ , समुद्रात अतिरिक्त प्रमाणात नत्र आणि इतर पोषक द्रव्यांच्या मानवी मैलातून झालेल्या अतिरिक्त प्रदूषणा मुळे लाल शैवाल सारखे घातक शैवाल वाढीस लागतात. ज्यामुळे समुद्रात खोलवर सूर्यकिरणे पोहोचत नाहीत. ज्या मुळे विविध खोली वरती वाढत असलेल्या पाणवनस्पती आणि इतर चांगले शैवाल मरुन जातात आणि येथे प्राणवायू आणि अन्न पदार्थांची कमी झाल्याने इतर प्राणी देखील मृत पावतात. पाण्यात कमी झालेला प्राणवायू आणि प्रमाणाबाहेर वाढलेलं शैवाल जेलीफिश सारख्या प्राण्यांना वाढण्यासाठी अती उत्तम वातावरण बनवतात. कारण ह्या प्राण्यांना जगण्यासाठी जास्त प्राणवायू लागत नाही आणि पाण्यातील प्राणवायू कमी झाल्याने ह्यांना खाणाऱ्या माशांची देखील संख्या कमी झालेली असते आणि अशाप्रकारे जेव्हा इतर प्राण्यांची संख्या जवळपास नगण्य होते तेव्हा जेलीफिश ची संख्या प्रमाणाबाहेर वाढते .
जेलिफिशमुळे होणारे परिणाम

जगभरात माणसाला माहीत असलेल्या जेलीफिशच्या जवळपास १२०० प्रजाती आहेत . त्यातील काही एवढ्या लहान आहेत की त्या पोहताना पाण्यासोबत आपल्या पोटात जाऊ शकतात. तर या जेलिफिशमध्ये काही 200 किलो एवढ्या अवाढव्य वाढलेल्या असतात. या प्राण्यांमध्ये सर्व जातीत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे डंख मारणाऱ्या पेशी जेलीफिशच्या फ्लोट खाली असतात त्यांची लांबी एक मीटर किंवा त्याहून जास्त देखील असू शकते. या तंतुमय धाग्यांमध्ये विणलेल्या डंख मारणाऱ्या पेशी एखाद्या समुद्री जिवाच्या संपर्कात आल्यास त्याला ह्या तंतुमय धाग्यांनी गुंडाळून त्यात असलेल्या लाखो विषारी डंख प्राण्याच्या शरीरात विष पसरविण्याचे काम करतात. मग तो प्राणी मेल्यावर त्याचे शरीर गोल छत्री सारख्या आकारात असलेल्या शरीरात आणले जाते आणि पचवले जाते.

तसेच समुद्र किनारी लागलेल्या जेलीफिशच्या स्पर्शकांना चुकूनजरी पाय लागला तर तीव्र वेदना होऊ शकतात. ब्लू बॉटल प्रजातीच्या जेलिफिशच्या स्पर्शकाना चुकून जरी हात लागला तरी तुम्हाला तीव्र वेदना आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला दवाखान्यात दाखल करण्याची पाळी येऊ शकते. तर काही प्रकरणामध्ये लोकांनी जीव देखील गमावल्याच्या नोंदी आहेत. बॉक्स जेलिफीश प्रजातीमुळे फिलिपाईन्स देशात दर वर्षी २० ते ४० लोक मृत्युमुखी पडत असल्याच्या वैद्यकीय नोंदी आहेत. हे प्राणी स्वत: पोहत नाहीत . समुद्राचे प्रवाह जिथे घेऊन जातील तिथे ते जातात. पण अलीकडे अरबी समुद्रात ह्यांचे प्रमाण कमालीचे वाढत आहे ही खूप चिंताजनक बाब आहे. कधीकाळी पावसाळ्याच्या सुरुवातीला ह्यांचा शिरकाव व्हायचा पण आता संपूर्ण वर्षभर ह्यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. ही खूप गंभीर बाब आहे. कारण जेलीफिश फक्त डंख मारत नसून त्या समुद्रातील मासळीचे खाद्य असलेले वनस्पती प्लावक खातात आणि त्याच बरोबर माशांची लाखो करोडो अंडी आणि लहान मोठी माशांची पिल्ले खाऊन फस्त करतात. त्यांच्या शरीराच्या दहापट वजनाऐवढे ते खाऊ शकतात. ज्याचा फार मोठा फटका मासेमारी वरती आणि मत्स्य उत्पादनावर पडतो. त्या समुद्राची अन्नसाखळी तोडत आहेत. एवढच नाही तर दैत्याकार असलेल्या अणूभट्या देखील त्यांच्या मुळे कित्येकदा बंद पडल्या आहेत .

या जेलिफिशच्या संकटावर बोलताना रायगड अलिबागचे सहायक मत्स्य आयुक्त सुरेश भारती म्हणाले, मागील काही वर्षात जेलीफिश चे प्रमाण रायगड़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , पालघर या सागरी कोकण किनार पट्टित वाढल्याचे दिसत आहे. जेलीफिश च्या उपद्रवाने मत्स्य उत्पादन घटते आहे. सागरात येणारी वादळे, वातावरणातील बदल, अन्न साखळी मधील बदल झाल्यानंतर जेलिफिशला खाद्य पदार्थाची विपुलता किनारपट्टीवर अधिक आढळण्याची शक्यता असते. सागरातील जीवाणु हे खाद्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे एखाद्या जिवाणु ची संख्या कमी अथवा जास्त होताना दिसते. सध्या जेलिफिशचे प्रमाण वाढल्याचे दिसते आहे.

Updated : 2022-05-24T19:41:51+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top