Home > मॅक्स रिपोर्ट > आरोग्य यंत्रणेचा कोरोना गोंधळ, स्वॅब घेतलेला नसतानाही एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

आरोग्य यंत्रणेचा कोरोना गोंधळ, स्वॅब घेतलेला नसतानाही एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

स्वॅब न दिलेल्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्याचे नाव,पत्ता नंबर नसल्याने आरोग्य यंत्रणेचा कारभार वेशीवर टांगला गेला आहे. वाचा आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांचा रिपोर्ट....

आरोग्य यंत्रणेचा कोरोना गोंधळ, स्वॅब घेतलेला नसतानाही एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
X

कोरोनाच्या रुग्णसंख्या सध्या राज्यात दररोज वाढत आहे. पण यामध्ये आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा आणि गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. एका व्यक्तीचा स्वॅब घेतलेला नसतानाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील पंडित देशमुख हे साधारण दुखण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेल्यावर त्यांची नोंदणी करुन घेण्यात आली. त्यानंतर त्यांना औषधोपचार करून घरी जाण्यास सांगण्यात आले. मात्र आठवडाभरानंतर त्यांना कोविड सेंटरमधून आपला कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला असून आपन तात्काळ भरती होण्यासाठी यावे असा फोन आला तेव्हा त्यांना धक्काच बसला. स्वॅब न देता आपला रिपोर्ट पॉजिटिव्ह कसा आल्याचा ऐकून त्यांना धक्का बसला होता. यानंतर आपण कोविड सेंटर गाठून काय गोंधळ आहे याची विचारण केली तेव्हा उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी कऱण्याची त्यांनी मागणी केली आहे.



आरोग्य अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणातून धक्कादायक माहिती उघड

यासंदर्भात आम्ही तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र पुरी यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "पंडितराव हे साधारण आजारावर उपचारार्थ कोविड केंद्रामध्ये आले होते. मात्र तिथे टेस्ट करावी लागेल असे त्यांना सांगण्यात आले आणि त्यांची नोंदणी करुन घेण्यात आली. मात्र कुठलीच टेस्ट न करता ते निघून गेले. पण त्यांच्या नावाचा स्वॅब घेण्यासाठी ट्युब तयार करण्यात आली होती. त्या ट्युबमध्ये दुसऱ्या नागरिकाचा स्वॅब टाकण्यात आला. शुक्रवारी तो अहवाल पॉझिटिव्ह आला. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाईल व ज्यांचा अहवाल पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आला त्यांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मात्र, पंडितरावाच्या नावाने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर लिहिला गेला नसल्याने या रुग्णाला शोधून काढमे कठीण झाले आहे. त्यामुळे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गेल्या २४ तासांपासून यंत्रणेच्या संपर्कात नसून तो कुठे आहे आणि कोण आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता त्या व्यक्तीमुळे संसर्ग जास्त पसरला तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कोरोना टेस्ट सांगूनही पंडितराव ती न करताच निघून गेल्याने या गोंधळाला तेही काही प्रमाणात जबाबदार असल्याचे दिसते आहे.

Updated : 6 March 2021 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top