Home > मॅक्स रिपोर्ट > सेंद्रिय खताच्या सहाय्याने शेतकऱ्यांने फुलवली सुर्यफुलाची शेती

सेंद्रिय खताच्या सहाय्याने शेतकऱ्यांने फुलवली सुर्यफुलाची शेती

जगावर तिसऱ्या महायुध्दाचे सावट असताना महागाईचे ढग जमा होऊ लागले आहे. खाद्यतेलांचे दर वाढत असताना सेंद्रीय सुर्यफुल लागवडीचा प्रयोग सोलापूरमधे यशस्वी झाला आहे, अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

सेंद्रिय खताच्या सहाय्याने शेतकऱ्यांने फुलवली सुर्यफुलाची शेती
X



भारताच्या अर्थव्येवस्थेत शेती क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे.या शेती क्षेत्रावर 70 टक्के जनता अवलंबून असल्याचे सांगितले जात होते.पण 1992 साली भारताने अर्थव्यवस्था खुली केल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक व शेती क्षेत्र,शेतकऱ्यांच्या जीवनावर झाला असल्याचे पहायला मिळते.जागतिकीकरण, उदारीकरण,खाजगीकरण याचा स्वीकार केल्याने परकीय गुंतवणूकदार भारताच्या बाजारपेठेकडे आकर्षित होऊन त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.आजच्या स्थितीला भारतात परकीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे दिसते.त्याला शेती क्षेत्र ही अपवाद राहिले नाही.बदलत्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन भारतातील शेतकऱ्यांनी शेतात पिके घेण्यास सुरुवात केली व कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात रासायनिक खतांचा वापर करण्यास सुरुवात केली.त्यामुळे पिके कमी कालावधीत निघण्यास सुरुवात झाली. पूर्वीची नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीची जागा बोरवेल,विहरीच्या पाण्याने घेतली.शेतकरी शेतीकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहत होता.आता त्याचा शेतीच्या बाबतीतील दृष्टिकोन बदलून व्यवसायिक झाला आहे.शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढला आहे.त्यातच सेंद्रिय शेतीचे प्रमाण दुर्मिळ झाले असल्याचे दिसते.पण सेंद्रिय शेतीतून निघणारी फळे,धान्य विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसतो.

सेंद्रिय खतापासून तयार केलेल्या पिकांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा वाढता कल पाहून सांगोला तालुक्यातील शेतकरी श्रीपती वगरे यांनी 20 गुंठा शेती क्षेत्रात सेंद्रिय खतांच्या सहाय्याने सुर्यफुलचे उत्पादन घेतले आहे.त्यांच्या शेतातील सूर्यफूल सव्वा फूट व्यासाचे झाले आहे.ही सर्व किमया सेंद्रिय खतांच्या वापरामुळे झाली असल्याचे श्रीपती वगरे सांगतात.त्यांची ही सेंद्रिय शेती सांगोला तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.काही वर्षांपूर्वी शेतीत शेणखत,पालापाचोळा यांचा नैसर्गिक खत म्हणून उपयोग केला जात होता.या खतांच्या सहाय्याने नैसर्गिकरित्या पीक निघत होते.या निघणाऱ्या पिकात नैसर्गिक पोषकतत्वे जास्त प्रमाणात होती.त्याचा मानवी जीवनावर काही परिणाम होत नव्हता.सेंद्रिय खतांचा उपयोग केल्याने पीक नैसर्गिकरित्या येत होते.काही वर्षांपूर्वी कोरडवाहू शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते.नैसर्गिक पावसाच्या पाण्यावर शेती शेतकरी करत असत.शेतजमिनीत मोजकीच पिके घेतली जात होती.त्यामुळे जमिनीचा कस टिकून होता.शेतीच्या वाढीसाठी नैसर्गिक वातावरण पोषक होते.नैसर्गिक हवामानात भरघोस उत्पादन निघत होते.पण अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा कल कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देणाऱ्या पिकांकडे वाढला आहे.त्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जात आहे.सांगोला तालुक्यात डाळींब पिकाची शेती जास्त प्रमाणात आढळते.त्यातच वगरे यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या सुर्यफुलाच्या शेतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.त्यांच्या या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकरी भेट देऊ लागले आहेत.

सुर्यफुलाबरोबर गाजरची शेती फुलवली

सुर्यफुलाबरोबरच वगरे यांनी शेतात गाजर या पिकाची लागवड केली आहे.गाजराची पेरणी करण्यापूर्वी त्यांनी शेतात शेणखत टाकून घेतले असल्याचे ते सांगतात.शेतात सेंद्रीय खताचा वापर केल्याने गाजराचे पीकही जोमात आले आहे.त्यांच्या या दोन्ही पिकांची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व प्रगतशील बागायतदार अंकुश पडवळकर यांनी भेट देऊन पाहणी केली.या सेंद्रिय खतांच्या सहाय्याने पिकवलेल्या शेतातच वगरे यांनी शेतकरी परिसंवादाचे आयोजन केले होते.यावेळी शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या परिसंवादाला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.सेंद्रिय खतांने पिकवलेल्या गाजराच्या पिकाची लांबी जास्त असून वजनालाही चांगले भरत असल्याचे शेतकरी वगरे यांनी सांगितले.गाजराचे पीक हे त्यांनी आंतरपीक म्हणून घेतले आहे.सेंद्रिय खतांच्या सहाय्याने आलेली गाजरे खाण्यासाठी चविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन वर्षांनंतर सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी श्रीपती वगरे यांनी सांगितले की,गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न करत होतो.पण यश येत नव्हते.सुर्यफुलाची लागण करत असताना शेतामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखताचा वापर केला आहे.सुर्यफुलाच्या अगोदर या शेतात ज्वारी,मका ही पिके घेतली.पण या पिकांनी म्हणावे तेवढे भरघोस उत्पादन दिले नाही.गेल्या वर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये कर्नाटकातील कंपनीकडून मालतेश नावाचे सुर्यफुलाचे बियाणे खरेदी केले.शेतातील 20 गुंठा जमिनीत म्हणजे अर्धा एकरात सुर्यफुलाच्या एक किलो बियाणांची पेरणी केली. पेरणीनंतर या पिकाला तीन वेळेस पाणी दिले.या पिकावर आतापर्यंत रोगांचा प्रादुर्भाव झालेला नाही.त्यामुळे या सुर्यफुलावर फवारण्या करण्याची गरज भासली नाही.तसेच युरिया,सुफला किंवा 18:46 या खतांचा डोस देण्याची आवश्यकता भासली नाही.जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात शेणखताचा वापर केल्याने रोगमुक्त पीक तयार झाले आहे.असे वगरे यांनी सांगितले.

सर्वसामान्य सुर्यफुलाच्या उंचीपेक्षा वगरे यांच्या शेतातील झाडांची उंची व व्यास आकाराने मोठा

सर्वसामान्य सुर्यफुलाच्या झाडांची उंची 5 ते 6 फूट असते.पण वगरे यांच्या शेतातील सुर्यफुलाची उंची 9 ते 10 फुटाच्या आसपास आहे.तर सुर्यफुलाचा व्यास सव्वा फूट ते दीड फुटाच्या आसपास आहे.या फुलांची वाढ होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक फवारण्या केल्या नाहीत.या 20 गुंठ्यामध्ये 8 ते 12 क्विंटल सुर्यफुलाचे उत्पादन निघेल असे शेतकरी वगरे यांना वाटते.सध्या सुर्यफुलाला 5 ते 6 हजार रुपये क्विंटल भाव सुरू आहे.येणाऱ्या काळात या सुर्यफुलाला चांगला भाव मिळेल अशी आशा वगरे यांना आहे.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी

शेतकऱ्यांना आवाहन करताना श्रीपती वगरे यांनी सांगितले की,शेतकऱ्यांनी जीवनामध्ये माता आणि मातीला विसरायचे नाही.माता आपल्याला जन्म देते लहानाचे मोठे करते.तर माती आपल्याला जगायला शिकवते.या मध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे.त्यामुळे जवळा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आवाहन करतो की,शेतकऱ्यांनी विषमुक्त शेती म्हणजे सेंद्रिय शेती करावी.त्यामुळे रोगमुक्त समाज निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Updated : 1 March 2022 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top