Home > मॅक्स रिपोर्ट > इथेनॉलमुळे साखर कारखाने फायद्यात, शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचणार का?

इथेनॉलमुळे साखर कारखाने फायद्यात, शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचणार का?

इथेनॉलमुळे साखर कारखाने फायद्यात, शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचणार का?
X

सांगली जिल्ह्यात इथेनॉल उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे, त्यामुळे ऊसाला योग्य भाव मिळाला तर या हंगामात साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक याच्यामध्ये संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांची दररोज तीन लाख ६० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता वाढली आहे. हे कारखाने उसाचा रस, बी हेवी मोलॅसिस आणि साध्या मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करीत आहेत. पाच वर्षांत कारखान्यांनी दुपटीने इथेनॉल उत्पादन वाढविले आहे. साखर कारखान्यांचा इथेनॉलकडे कल वाढल्यामुळे येत्या हंगामात साखरेचे उत्पादन घटणार आहे. मात्र इथेनॉल निर्मितीमुळे राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. त्यामुळे स्वतः साखर कारखानदार देखील आता ऊसाला ठरलेला भाव द्यायला आम्ही तयार असल्याचं कबूल करत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊस कारखानदार आणि ऊस उत्पादक याच्यामध्ये संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे.

देशात महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण दहा टक्क्यांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. २०२३ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. मागणी आणि साखरेच्या दराची घसरण लक्षात घेऊन जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनावर भर दिला आहे.




राजारामबापू कारखान्याचे साखराळे युनिट दररोज ७५ हजार लीटर इथेनॉल तयार करत आहेत. येत्या हंगामापासून ते दीड लाख लिटरवर जाईल असा दावा केला जातो आहे. क्रांती कारखान्याचे ९० हजार लिटर, सोनहिरा कारखान्याचे ६० हजार लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. सध्या कंपन्यांच्या मागणीनुसार उत्पादन सुरू आहे. हुतात्मा, उदगिरी शुगर या कारखान्यांची प्रतिदिन ३० हजार लिटरची इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. हे कारखानेसुद्धा येत्या हंगामात पूर्ण क्षमतेने उत्पादन घेणार आहेत. राजेवाडी ( ता.खानापूर ) येथील श्री श्री रवीशंकर या कारखान्यानेही दररोज ५० हजार लिटर इथेनॉल उत्पादनाचा निर्णय घेतला आहे.



इथेनॉल करणारे कारखाने कारखाना रोजची क्षमता


राजारामबापू

१५०००० लीटर

क्रांती

९०००० लीटर

सोनहिरा

६०००० लीटर

हुतात्मा

३०००० लीटर

उदगिरी

३०००० लीटर

श्री श्री रवीशंकर

५०००० लीटर



गेल्यावर्षी उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून ७७ टक्के इथेनॉल तयार करण्यात आले होते. येत्या हंगामामध्ये इथेनॉलसाठी उसाच्या रसाचा कारखानदार वापर करणार आहेत. रसापासूनच्या इथेनॉलला प्रतिलिटर ६२ रुपये ६५ पैसे दर मिळत आहे.

साखरेला इथेनॉल उत्तम पर्याय ठरत आहे. साखरेचे दर आणि एफआरपीचा विचार करता कारखाने आर्थिक अडचणीत येतात. मात्र, इथेनॉल तयार करणारे कारखानेही व्यवस्थित चालू शकतील, असे बोलले जात आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेल्या निर्णयाचे कारखानदार स्वागत करत आहेत. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्यास, शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देता येणार आहे, असे मत राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांनी व्यक्त केले आहे.




साखर कारखानादार नेहमी साखरेच्या दराच्या आर्थिक गणितावर उसाला भाव ठरवत असतात. मात्र इथेनॉल सारख्या उपपदार्थमुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती चांगली होत आहे. आता तर शेतकऱ्यांना ज्यास्त भाव दयावा अशी अपेक्षा, शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेते व्यक्त करत आहेत.

Updated : 19 Sep 2021 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top