Home > मॅक्स किसान > आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा...
X

आज राज्यात कर्जबाजारीपणा, नापिकी, सतत पडणारा दुष्काळ, यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. बीड जिल्ह्यात पाच वर्षात, 1087 शेतकऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आपली जीवनयात्रा संपवली आहे. हे चित्र बदलत नसून त्यात वाढच होत आहे. युती सरकारच्या काळामध्ये, सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली होती. नुसती घोषणाच नाही तर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्ज माफी केलीय! असं देखील खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. अनेक भाषणांमध्ये कर्जमाफी केल्याचा दावा देखील केला होता. मात्र ही कर्जमाफी नावाचीच कर्जमाफी होती. ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच नाही. याचं उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आहेत.

आज जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करतोय. मात्र सरकार या शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवत आहे. याच भूलथापांना वैतागलेला आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्र म्हणतोय की, ‘आज माझा शेतकरी बाप गेला आहे! मात्र, महाराष्ट्रातील त्या माझ्यासारख्या मुलांचे तरी शेतकरी बाप कर्जमाफी करून वाचवा.’ माझ्या वडिलांनी कर्जापायी आत्महत्या केली अन् मला शिक्षण सोडून द्यावं लागलं. कारण घरात कर्ता आता मीच आहे. ज्या कर्जासाठी वडीलांनी आत्महत्या केली त्या कर्जासाठी बँक आजही आम्हाला नोटीस पाठवतेय. आज माझी पण मानसिकता वेगळी झालीय. कारण शेतात काहीच पिकत नाही मग मी कर्ज फेडणार कसा? पाहुयात बीड जिल्ह्यातील त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्राची व्यथा, काय आहेत त्याच्यापुढील समस्या, काय आहे त्याची मागणी? या ‘मॅक्समहाराष्ट्र’च्या स्पेशल रिपोर्टमध्ये…

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असणारे पारनेर गाव. या गावात सगळे वस्तीवर भीमराव सगळे हे आपल्या कुटुंबासह शेतात राहायचे. सगळे यांना सात एकर शेती आहे. याच शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. कुटुंबातील तीन मुलींच्या लग्नानंतर त्यांनी शेतात पॉलीहाउस शेती करण्याचं ठरवलं होतं. यासाठी त्यांनी पाटोदा येथील एसबीआय बँकेकडून, अडीच लाख रुपये कर्ज काढलं होतं. कर्ज मिळाल्यानंतर भीमराव सगळे यांनी, दहा गुंठ्यांमध्ये पॉलीहाउस शेती उभी केली होती. त्यामध्ये त्यांनी शिमला मिर्च, टोमॅटोची लागवड केली होती. मात्र बीड जिल्ह्यात २०१७-१८ या वर्षात पडलेल्या भयान दुष्काळामुळे, शेतात उभारलेली शिमला मिरची आणि टोमॅटो पूर्णपणे करपून गेले.

भीमराव सगळे यांच्यापुढे आर्थिक संकट उभं होतं. बँकेचे हप्ते फिटले नाहीत. त्यातच बँकेच्या येणाऱ्या नोटीस, शेतात होत असलेली नापिकी, यामुळे भीमराव सगळे हे पूर्णपणे खचून गेले होते आणि एके दिवशी दिनांक 18 ऑगस्ट 2018 रोजी, त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचं कुटुंब उघड्यावर आलं.

Bhimrao sagale

आपल्या वडिलांच्या आत्महत्येनंतर, महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या बाबू या तरुणाला, आपलं शिक्षण सोडून देण्याची वेळ आली. कारण वडिलांच्या मेहनतीवर शेती थोड्या प्रमाणात पीकायची. आता वडिलाचं छत्र हरवलं त्यामुळे घरात कर्ता म्हणून बाबू होता. जर महाविद्यालयीन शिक्षण शिकलो तर शेतीत राबायला कोणी नाही. म्हणुन बाबूंनी महाविद्यालयात जाण्याचं बंद केलं आणि शेतीचं करू लागलाय.

आपल्या वडिलांविषयी बोलताना बाबू म्हणत होता, " वडील असताना मी शिकायचो. मात्र, वडील गेल्यानंतर आज मला कळतंय, की त्यांची किंमत काय आहे. आज पूर्णपणे मी खचलो आहे. शेतात काम करतोय, गेल्या सरकारनं म्हटलं होतं, की कर्जमाफी करू, मात्र ती कर्जमाफी झाली नाही. जर सरकारने आमची कर्जमाफी केली असती तर, आज वडील माझ्यासोबत राहिले असते. आज माझ्या वडिलांचं छत्र हरवले आहे. मला वाईट वाटतं हे सरकार सुद्धा आमची कर्जमाफी करू म्हणतंय. मात्र सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झाले तरी कर्जमाफीचं नाव घेत नाहीत. निवडणुकीपुरतं सरकार म्हणतं की कर्जमाफी करू. एकदा निवडणुक संपली की सादं शेतकऱ्याला विचारत सुद्धा नाहीत.”

ज्या बॅंक कर्जाच्या नोटीसी बघुन भीमराव सगळे यांनी आत्महत्या केली. त्याच कर्जाच्या नोटीस आज मुलासाठी येत आहेत. “शेतात सध्याला काही पीकलेलं नाही. कर्ज कसं फेडू हा माझ्यापुढे प्रश्न आहे. हे सरकार तरी माझी कर्जमाफी करेल का? आज महाराष्ट्रात माझ्यासारखे असे अनेक मुलं आहेत. त्यांच्या बापाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. या सरकारनं त्या बापाच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर माफ करावा. जेणेकरून माझ्यासारखं ती मुलं, आपला बाप गमवणार नाहीत. त्यांचा बाप या सरकारने तरी वाचवला पाहिजे. ज्याचा बाप जातो ना त्यालाच माहित आहे त्याचं दुःख काय असतं!” अशी विनंती बाबू सरकारला करत आहे.

आज माझा लेक गेलाय, त्यानं कर्ज घेतले होतं शेतीसाठी. त्याला बँकेच्या नोटीसा येत होत्या. तो परेशान असायचा. मी म्हणत होते परेशान होऊ नको फिटतील पैसे. अन् एके दिवशी त्यानं आत्महत्या केली. ज्याच्या खांद्यावर मी जाणार होते तोच आज गेलाय. कर्जमाफी झाली असती तर त्याने आत्महत्या केली नसती. अशी खंत मयत भीमराव सगळे यांच्या आई ठकूबाई सगळे यांनी व्यक्त करत आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.

आज बाबू सारखी शेकडो मुलं बीड जिल्ह्यात आपल्या शेतकरी बापाच्या आत्महत्येनंतर खचलेले आहेत. आज खरी गरज आहे ती शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याची कारण, बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून सतत दुष्काळ पडतोय. त्यातच यंदा देखील ओला दुष्काळ आल्यामुळे शेतात होत्याचं नव्हतं झालं आणि पूर्णपणे पिकाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं उराशी बाळगलेले स्वप्न त्या ओल्या दुष्काळानं वाहून नेलं. म्हणून आज बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकरी मरणयातना भोगतो आहे. त्यातच डोक्यावर असणारा कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मुलीचं लग्न, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांचा दवाखाना आणि समोर कर्जाचा डोंगर याच गर्तेत शेतकरी सापडला आहे. युती सरकारनं या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं म्हटलं होतं. मात्र, या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फक्त नावालाच झाली. आज शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती तर शेकडो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते. त्यांना आपला जीव गमवावा लागला नसता. बाबू सारखी शेकडो मुलं आज शिक्षण घेत असती. मात्र गेंड्याची कातडी असणाऱ्या सरकारला शेतकऱ्याचं दुःख कळलं नाही. या महाविकास आघाडीच्या सरकारनेदेखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिलेलं आहे. या सरकारनं तरी या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. महाराष्ट्रातील 'बाबू' सारख्या युवकांच्या शेतकरी बापांना वाचवावं अशी देखील मागणी खचलेल्या बाबूनं केलीय...

Updated : 17 Dec 2019 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top