Home > मॅक्स रिपोर्ट > पतीच्या निधनानंतर एका महिन्यात आईची चार मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पतीच्या निधनानंतर एका महिन्यात आईची चार मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पतीच्या निधनानंतर एका महिन्यात आईची चार मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
X

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात आदिवासी ग्राम म्हणून ओळख असणाऱ्या माळेगाव इथं एकाच कुटुंबातील चार मुली व आईनं विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

महिनाभरापूर्वी पतीचे निधन

मृत उज्वला बबन ढोके या महिलेच्या पतीने सुमारे एक महिन्यापूर्वी विषारी औषधं प्राशन करुन आत्महत्या केली होती. त्यानंतर महिनाभरातच हा दुर्देवी प्रकार घडला आहे. उज्ज्वला यांना चार मुली होत्या. पतीच्या निधनानंतर अडीच एकर जमीनीत चार मुलींचे शिक्षण कसं भागणार? या विवंचनेतून उज्ज्वला यांनी आपल्या चारही मुलीसह स्वत:चं जीवन संपवल्याचं आमचे प्रतिनिधी निखिल शहा यांनी सांगितलं.

मृतदेह गावालगतच्याच विहीरीत आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. उज्वला बबन ढोके (३५) या महिलेसह त्यांच्या चार मुली वैष्णवी बबन ढोके(९), दुर्गा बबन ढोके (७), आरूषी बबन ढोके (४) आणि पल्लवी बबन ढोके (१)अशी मृतांची नावं आहेत.

सोमवारी (दि २३) पहाटे माळेगाव लगत असले्ल्या तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील विहीरीत प्रारंभी चारही मुलींचे मृतदेह आढळून आले. त्यांनंतर जानेफळचे तंटामुक्त समिती अध्यक्ष कृष्णा हावरे आणि पोहणाऱ्या युवकांनी उज्वला बबन ढोके या महिलेचाही विहीरीतील गाळात फसलेला मृतदेह बाहेर काढला.

मृत महिला उज्वला बबन ढोके या रविवारी शेतामध्ये उडीद सोंगण्यासाठी आपल्या चारही मुलींसह जात असल्याचे घरी सांगून गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी त्या परत आल्या नाहीत. त्यामुळे उज्वला ढोके या महिलेचा दीर व सासऱ्याने त्यांचा परिसरात ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला. मात्र, त्या आढळून आल्या नाहीत. मात्र, २३ सप्टेंबर रोजी तुळशीराम चोंडकर यांच्या शेतातील विहीरीत चार मुलींचे मृतदेह आढळून आले.

विहीरी लगतच त्यांच्या चपलाही आढळून आल्या. प्रारंभी महिलेचा शोध लागला नाही. ग्रामस्थांनी विहीरीत खाली उतरून पाहिले असता, महिलेचाही मृतदेह विहीरीत असल्याचे निदर्शनास आले. सध्या पाचही जणींचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली..

Updated : 23 Sep 2019 2:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top