Home > मॅक्स रिपोर्ट > एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर;विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार

एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर;विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार

गेली अनेक दिवस सुरु असलेल्या एसटी संप संपता संपत नसून रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर रखरखत्या उन्हात जिव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना एसटी अभावी कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत असून वेगवान व अवजड वाहनांच्या धडकेची विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. श्रम आणि वेळ वाया जाण्याबरोबरच शिक्षणाला ब्रेक लागल्याचे दिसत आहे... प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

एसटीचा संप विद्यार्थ्यांच्या मुळावर;विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार
X

सलग दीड वर्षातून अधिक काळ कोव्हिडं महामारीत शाळा , महाविद्यालय बंद होती, कोव्हिडं 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता 5 वी पासून पुढील इयत्तांच्या शाळा नियमित सुरू झाल्या खऱ्या मात्र एसटी संपाने विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवन वाहिनी मानली जाते, मात्र एसटी चा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गलगत असणाऱ्या शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खाजगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात विद्यार्थी कोसो दूर पायी चालत येजा करीत आहेत, यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जातात, तर शिक्षणाला देखील ब्रेक लागताना दिसतोय. शिवाय महामार्गावरील वेगवान व अवजड वाहनांची ठोकर बसून अपघात होण्याचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गातून जोर धरत आहे.





जिल्ह्यातील दूर गावावरून आदिवासी वाड्यापाड्यावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी कित्येक किमीची खडतर पायपीट करावी लागत आहे. यामुळे श्रम व वेळ वाया जात आहे. त्यामुळे लवकर योग्य तोडगा निघून लाल व निळी परी पूर्वव्रत सुरू करावी अशी मागणी अनेक शिक्षक, विद्यार्थी व पालक करत आहेत. यावेळी बोलताना प्रिया किरण डाकी या विद्यार्थीने सांगितले की मुंबई गोवा महामार्गावर सतत वाहनांची येजा सुरू असते, उन्हातान्हात पायी चालत जाताना येताना खूप त्रास होतो, वाहनांची खूप भीती वाटते, एस टी बस लवकर सुरू व्हावी हीच मागणी असल्याचे प्रियाने सांगितले.

तसेच तब्बल दोन ते तीन किलोमीटर चा पायी प्रवास करून आलेल्या करिष्मा नागोठकर या विद्यार्थीनीने देखील आपली व्यथा मांडली. कोव्हिडं च्या वातावरणानंतर आम्हाला शाळेत यायला खूप हुरूप आला होता, मात्र शाळा सुरू व एस टी बंद अशी परिस्थिती झाली. तळपत्या उन्हात पायी चालत येताना खूप हाल होतात, गाड्या जवळून जाताना हादरे बसतात, खूप भीती वाटते. लवकरच एसटी सुरू व्हाव्यात.





प्रभाकर गावंड पळस विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णा ठाकूर यांनी सांगितले की मुंबई गोवा महामार्गलगत आमची शाळा आहे. कार्ली, जाम्बोशी, कोलेटी, पळस व अन्य भागातून विद्यार्थी येतात, आता एसटी संप असल्याने मुले चालत येतात, या मार्गावर जीवघेण्या अपघाताची भीती असते, विद्यार्थी व शिक्षकांचे देखील शाळेत येता जाताना हाल होतात, जोपर्यंत मुले शाळेत पोहचत नाहीत, तोपर्यंत शिक्षकांना काळजी तर मुले शाळेतून घरी परतेपर्यंत पालकांना काळजी लागून राहते. खाजगी वाहनातून ये जा करणे गोरगरीब सर्वसामान्य व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कसे परवडणार? एसटी सेवा ही सोयीची व सर्वाना परवडणारी आहे, आज एसटी बंद असल्याने सर्वांचेच खूप हाल होतायेत, सरकारने जो निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा व सेवा सुरू करावी असें कृष्णा ठाकुर सर म्हणाले.

सार्थक मढवी या विद्यार्थ्याने सांगितले की सध्या एसटी बंद आहेत, त्यामुळे ऊन, धूप, धूळ यामध्ये आम्हाला चालत शाळेत जावे लागत आहे, खूप त्रास होतोय, अपघाताची भीती वाटते, जिव मुठीत घेऊन भीत भीत चालावे लागते.

डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात अनेक गावे वाड्या व वस्त्या दुर्गम भागात आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एसटीचाच आधार आहे. मात्र सध्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत वेळेत पोहचता येत नाही आहे. शिवाय रानावनातील व खडतर रस्त्यावर चालत शाळेत जाणे व तेथून पुन्हा घरी येणे धोकादायक व जिकरीचे देखील आहे. तसेच काही मुले चालण्याचा कंटाळा करतात दमतात देखील. त्यामुळे शाळेत येत नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांची अनुपस्थित वाढत आहे. आणि त्यांचा अभ्यास देखील बुडतो. कुंडलिका विद्यालयातील शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले. बस नसल्याने कित्येक किमीची पायपीट, शिवाय खाजगी वाहनाने जाणे खर्चिक असल्याने विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. एसटी बस नसल्याने मुलांना पायी शाळेत जावे लागते त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. काही मुलांची शाळा बुडत आहे. त्यामुळे मुलांची चिंता वाटत आहे. म्हणून परिवहन मंडळाचा संप लवकर मिटणे गरजेचे आहे, असे पालक रमेश पवार यांनी सांगितले.





अनेक विद्यार्थ्यांना शाळेत व घरी पोहचण्यासाठी 3-4 किलोमीटर पेक्षा अधिक पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूपच त्रास सहन करावा लागतोय संप चालू असल्याने गावात सकाळी व संध्याकाळी येणाऱ्या बसही बंद आहेत. त्यामुळे प्राथमिक, माध्यमिक व कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. लवकर संप मिटला पाहिजे, असे सुधागड प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे सचिव अनिल राणे म्हणाले.





मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची खूप वर्दळ वाढले, आम्ही उन्हात पायी चालत येतो जातोय, महामार्गावरची झाडे तोडलीत, उन्हाच्या काहिलीने जिव नकोसा होतोय, कुठं थांबायला सावली नाही, चक्कर आल्यासारखे वाटते, तास होतो खूप असे विद्यार्थी सुमित मढवी याने सांगितले. एसटी बसच्या संपामुळे दूरच्या गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड परवड व गैरसोय होत आहे. याबरोबरच वेळ व श्रम देखील खूप लागत आहेत. याचा मुलांच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. दैनंदिन उपस्थिती अत्यल्प आहे. एस टी बस लवकर सुरू व्हावी ही अपेक्षा माध्यमिक विद्यालय, पाच्छापूरचे मुख्याध्यापक दिपक माळी म्हणाले. रोज किमान 8 किमी चालावे लागत आहे. शिवाय रस्ते खूप खराब व चढणीचे आहेत. खूप दमायला होते. घरी देखील वेळेत पोहचत नाही. अभ्यासाला वेळ पुरत नाही. त्यामुळे लवकर संप मिटवा ही इच्छा आहे असे विद्यार्थीनी रेश्मा कोकरे म्हणाल्या.


Updated : 18 Nov 2021 7:08 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top