Home > मॅक्स रिपोर्ट > Maharashtra Politics : वज्रमूठ सभांचा इम्पॅक्ट काय?

Maharashtra Politics : वज्रमूठ सभांचा इम्पॅक्ट काय?

देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांवर होत असलेली ईडीची छापेमारी, वाढती महागाई, बेरोजगारी, याबरोबरच घटना वाचवण्याचा दावा करत ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी वज्रमूठ सभेची घोषणा केली आणि आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि मुंबईत वज्रमूठ सभा घेतल्या. पण या वज्रमूठ सभांचा इम्पॅक्ट काय? असा सवाल उपस्थित केला जातोय. त्याचाच वेध घेऊयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांच्या स्पेशल रिपोर्टमधून....

X

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकी दाखवत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आणि त्यापाठोपाठ भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ (Kasaba Peth bypoll Election) पोटनिवडणूकीत जोरदार विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडी एकीने लढल्यास भाजप विरोधात लढणं सोपं जात असल्याचं लक्षात आल्याने ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळली. त्यानंतर महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील वज्रमूठ सभेला जमलेल्या गर्दीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ आणखी घट्ट करत नागपूरमध्ये दुसरी सभा घेतली. या सभेत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली. परंतू या सभेत ठाकरे गटाचाच वरचष्मा राहिला. त्यामुळे यानंतरच महाविकास आघाडीत धुसफूस वाढली.

कसबा पेठ पोटनिवडणूकीतील महाविकास आघाडीची ताकद कमी होत आहे की काय? अशी स्थिती नागपूरच्या सभेनंतर निर्माण झाली. त्यातच अजित पवार यांचीही नाराजी याच दरम्यान समोर आली. त्यामुळे पुढे मुंबईतील वज्रमूठ सभा मोठी झाली असली तरी या सभेत ठाकरे यांचाच वरचष्मा होता. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होण्यास सुरुवात झाल्याची चर्चा रंगली. एवढंच नाही तर मुंबईतील वज्रमूठ सभा ही शेवटची वज्रमूठ सभा ठरतेय की काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र त्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत पुन्हा वज्रमूठ सभा सुरु करणार असल्याचं म्हटलं आहे.

पण वज्रमूठ सभेचा नेमका इम्पॅक्ट (Vajramuth Sabha Impact) कशा पद्धतीने होत आहे? याविषयी मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर (Jayant Mainkar Analysis) यांच्याशी बातचीत केली. यावेळी जयंत माईनकर म्हणाले की, राज्यात चार मोठे पक्ष आहेत. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद बरीच कमी झाली आहे. दुसरीकडे ठाकरे गटालाही भाजपची रसद नसल्याने त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे. मात्र यात भाजप केंद्रीय यंत्रणा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून सत्तेत आहे. पण जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात. त्यावेळी त्यांची ताकद वाढलेली असते. त्यामुळे महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. त्याबरोबरच प्रत्येक सभेतून आम्ही निवडणूकीला तयार असल्याची भाषा महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. याचा अर्थ महाविकास आघाडी एकीने लढल्यास भाजपचा धुव्वा उडण्याची दाट शक्यता आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार जयंत माईंकर यांनी व्यक्त केले.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी (Prasanna Joshi) यांच्याशी बातचीत केली. यावेळी प्रसन्न जोशी म्हणाले, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीने वातावरण निर्माण करण्यासाठी वज्रमूठ सभांना सुरुवात केली आहे. त्यातील तीन वज्रमूठ सभा झाल्या आहेत. त्यात शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानतंर वज्रमूठ सभा होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता वज्रमूठ सभा होत आहेत. या वज्रमूठ सभांच्या तारखा थोड्या मागे पुढे होत आहेत. मात्र वज्रमूठ सभा होणार आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला आपलं कॅडरला एक मेसेज द्यायचा होता की, आपण सगळेजण अजूनही प्रत्यक्ष काम करत आहोत. संघटीत होत आहोत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ज्या प्रकारची लोकभावना उद्धव ठाकरे यांच्या बाबत दिसून येत आहे. त्या भावना आपल्या सोबत घेण्यासाठी, पंखात हवा भरण्यासाठी वातावरण निर्मीतीची गरज असते. त्यामुळे या वज्रमूठ सभांचे आयोजन सगळीकडे होत आहे. यासंदर्भात तीन मुद्दे महत्वाचे ठरतात.

1) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा गट, त्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गटाला महाराष्ट्रभरातून पाठींबा मिळणे, एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या दाव्यावरून कोंडीत पकडणे, त्याबरोबरच आपण भाजपला सोडत नाहीत. भाजपला थेट अंगावर घेत आहोत, असा संदेश अशा वेळी देणे. ज्यावेळी भाजपला थेट कुणी स्पर्शही करत नाही. त्यावेळी भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. हा मुद्दा झाला ठाकरे गटाचा.

२) दुसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेससाठीही वज्रमूठ सभेच्या माध्यमातून होणारी वातावरण निर्मीती गरजेची आहे. कारण अनेकदा ठाकरे गटाच्या विरोधात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. अशा ठिकाणी आपला ठसा उमटवण्यासाठी राष्ट्रवादीलाही ही सभा महत्वाची ठरत आहे. दुसरा मुद्दा असा की, पक्षाच्या पलिकडे शरद पवार यांचे असलेले वजन म्हणजेच त्यांच्याच भाषेत आपलं नाणं खणखणीत वाजत असल्याचं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात दाखवून दिलं. त्यामुळे या वज्रमूठ सभेच्या माध्यमातून आपण अजूनही Active असल्याचं शरद पवार यांनी दाखवून दिलं. त्यातच कुणी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याही विरोधात आपण मैदानात उतरू, असा स्पष्ट संदेश शरद पवार यांनी दिला.

3) काँग्रेससाठी वज्रमूठ सभा हा फक्त महाविकास आघाडीचा एक कार्यक्रम असा त्याचा अर्थ होता. मात्र आता कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर वज्रमूठ सभा काँग्रेससाठीही महत्वाची झालेली आहे. त्यातच महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या कर्नाटकमध्ये आपण एकहाती विजय मिळवलेला पक्ष असल्याने काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढला आहे. नाना पटोले आपल्या आक्रमक स्वभावाने काँग्रेसमध्ये आत्मविश्वास पेरण्याचं काम करत आहेत. मात्र अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा पिंड आक्रमक नसला तरी नाना पटोले आक्रमकपणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काँग्रेससाठीही ही वज्रमूठ सभा महत्वाची ठरणार आहे.

या सभेचा इम्पॅक्ट लगेच दिसेल का? हे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणूकांमध्ये स्पष्ट होईल. त्यातूनच महाविकास आघाडीच्या वज्रमूठेचा दणका की फ्लॉप शो यापैकी काय ते स्पष्ट होईल. त्यानंतरच 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठीचा विचार करता येईल, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केले.


Updated : 16 May 2023 5:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top