शऱद पवारांना का वाटतेय मोदींची काळजी ?
Max Maharashtra | 20 April 2019 4:38 PM IST
X
X
बारामतीत येवून शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात परंतु मला भयंकर काळजी वाटू लागली आहे की, हा माणुस काहीही बोलू शकतो, काहीही फेकू शकतो, त्यामुळे काय करेल माहित नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथील सभेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून गेले, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस येवून गेले आणि त्या स्मृती इराणी सुद्धा येणार आहेत. काय कौतुक आहे यांना सगळे बारामतीत येत आहेत. आम्ही साधेसुधे आहोत का संपुर्ण देश बारामतीत येतोय अशी मिश्किल टिप्पणी करतानाच देशाचं अख्ख मंत्रीमंडळ बारामतीत येतंय हे चांगलंच आहे असा टोलाही पवारांनी यावेळी लगावला.
बारामतीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आले होते. त्यांनी शरद पवार यांनी काय केले म्हणे, असे डुलत डुलत आले असं वाक्य पवारांनी उच्चारताच जनतेतून 'अफझलखान' अशी जोरदार आरोळी उठली. त्यावर मी तसं म्हणणार नाही ते शिवसेनेवाले त्यांना बोलतात असा टोलाही पवारांनी लगावला. अरे अमित शहा तुझ्या राज्यातील ऊस कारखानदारांचे प्रश्न घेवून तिथले लोक तुझ्याकडे येत नाहीत तर माझ्याकडे दिल्लीत ते प्रश्न घेवून येतात. राष्ट्रीय शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष आपले दिलीप वळसे पाटील आहेत तर खासगी ऊस कारखानदार संघटनेचे देशाचे अध्यक्ष रोहित पवार आहेत यांची आठवणही शरद पवार यांनी करुन देताना त्यांच्या पाठीशी कुणीतरी उभा आहे ना म्हणून हे घडतेय आणि हा अमित शहा म्हणतोय क्या किया है अशी टिकाही पवारांनी अमित शहा यांच्यावर केली.
आम्ही ७० वर्षात काय केले असे मोदी विचारत आहेत परंतु त्यातील दहा वर्षे तुम्ही काय केले हे सांगा. मोदींनी राज्यात ७ सभा घेतल्या. त्या सभांमध्ये एकच विषय फक्त शरद पवार होता. मी शेतीच्या प्रश्नात राजकारण करत नाही असे सांगतानाच आज देशात व राज्यात असलेल्या सरकारने चांगली कारखानदारी करणारी शक्ती उभी केली नाही असा आरोपही शरद पवार यांनी केला. या जाहीर सभेत दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या डबघाईला आलेल्या कारखान्याबाबत आणि त्यांनी मजुरांचे व स्थानिक ऊस उत्पादकांच्या थकवलेली कर्जाबाबत बोलताना ऊस उत्पादकांचे वाटोळे करु नको असा सल्लाही पवारांनी दिला.
Updated : 20 April 2019 4:38 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire