Home > मॅक्स रिपोर्ट > नागपूरच्या वेश्या वस्तीवर डोळा असणारा तो बिल्डर कोण?

नागपूरच्या वेश्या वस्तीवर डोळा असणारा तो बिल्डर कोण?

नागपूरच्या वेश्या वस्तीवर डोळा असणारा तो बिल्डर कोण?
X

नागपुरातील 200 वर्षांपासूनची वेश्यावस्ती पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण सांगून बंद केली आहे. या वस्तीत अवैध धंदे आणि कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर नागपूरची वेश्या वस्ती असलेला गंगा-जमुना परिसर पोलिसांनी कर्फ्यू लावून सील केला आहे. अचानक हा परिसर सील केल्यानं वेश्या महिला संतप्त झाल्या आहेत. आम्ही काय खायचं आणि कुठं जाऊन राहायचं? आमच्याशी कोण लग्न करणार असा सवाल या महिलांनी केला आहे.

काय आहे नागरिकांचा आरोप?

नागरिकांनी या वस्तीत अवैध धंदे होत असल्याचा आरोप केला आहे. या ठिकाणी कोरोना नियमांचं पालन होत नसल्याची तक्रारसुद्धा नागरिकांनी केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी हा परिसर सील केला आहे.

200 वर्षांपासून या ठिकाणी या महिला राहत आहेत. परंतू अद्यापर्यंत अशी कारवाई पोलिसांनी कधी केली नव्हती. त्यामुळं या महिलांच्या पोटावर पाय देणारा निर्णय पोलिसांनी का घेतला? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या संदर्भात या महिलांचा प्रश्न सातत्याने लावून धरणाऱ्या ज्वाला धोटे यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केला आहे. या सर्व जागेवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. आणि याला भाजपचं समर्थन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ विदर्भवादी नेते जामुंतराव धोटे यांनी गंगाजमूना येथील वारांगणांना बहीण माणलं होतं. ज्वाला धोटे या जामुंतराव धोटे यांच्या कन्या असून त्त्यांच्या पश्चात आता या वेश्या महिलांचा लढा ज्वाला धोटे लढत आहेत.

त्यांनी या संदर्भात माध्यमांशी बातचीत केली. त्या म्हणाल्या

माझा कोणत्याही राजकीय पक्षावर आरोप नाही. परंतु, संपूर्ण नागपूर शहरामध्ये चर्चा सुरु आहे की, कोणत्यातरी बिल्डर लॉबीचा या कोट्यवधींच्या, मोक्याच्या जमिनीवर डोळा आहे. गेल्या ५ - १० वर्षांपासून त्यांचे जागा हडपण्याचे मनसुबे आहेत. मात्र, संपूर्ण नागपूर शहरामध्ये, चर्चा सुरु आहे की, या बिल्डर लॉबीला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष रित्या भाजपचा पाठिंबा आहे.

१५ ऑगस्टला ७५ व्या स्वातंत्र्यदिनी मी वचन दिलं होतं की, मी तिथे येऊन बंदिस्त असलेल्या वारांगना माता भगिनींना त्यांचे बॅरीगेट्स तोडून मुक्त करेल. मी माझा शब्द पाळला. तिथे जाऊन सगळे बॅरीगेट्स हटवले. संविधानिक देशाची संविधानिक नागरिक म्ह्णून मी माझं कर्तव्य बजावलं. परंतू शोकांतिका अशी आहे की, संध्याकाळी परत ते बॅरीगेट्स उभारण्यात आले. समाजाला, संविधानाला, डेमोक्रसीला, न्यायव्यवस्थेला गालबोट लावण्यासारखी ही घटना झालेली आहे.

आम्ही बॅरीगेट्स काढले मात्र, यांनी पुन्हा १५ ऑगस्टच्या रात्री ते उभारले. मात्र, माझ्या वारांगना माता - भगिनींची बाजू ही सत्याची, न्यायाची, अधिकाराची तसेच संविधानाला साजेशी अशी बाजू असणार आहे. मी शासनाच्या दरबारी वारंवार भीक मागायला जाणार नाही. माझ्या माता - भगिनींना भीक नको तर अधिकार हवा आहे.

जर २२ ऑगस्टपर्यंत तिथले बॅरीगेट्स हटवले नाहीत, जर त्यांना मुक्त श्वास घेऊ दिला नाही. तर याचे परिणाम महाभयंकर होतील. काय परिणाम होतील ते मी आता सांगू शकत नाही.

मात्र, २२ ऑगस्टला मीडिया समोर ते सर्व चित्र येईल. आणि या सगळ्या परिस्थितीला जबाबदार, नागपूर पोलीस कमिशनर अमितेश कुमार असतील.

तसेच महाराष्ट्र शासनाला माझी हात जोडून विनंती आहे की, नागपूर शहराला एक परिपक्व, अनुभवी पोलीस आयुक्त द्यावा. कारण हे आयुक्त फार ज्युनिअर आहेत. त्यांना अनुभवाचा अभाव आहे. त्यामुळे नागपूर शहराला एक परिपक्व, अनुभव असलेला, समंजस, सुविचारी, कायद्याच्या बंधनात राहून काम करणारा आयुक्त नागपूरला द्यावा अशी मी विनंती करते.

राहिला प्रश्न, न्याय आणि हक्काचा तर इथे कोणी आंधळं नाही. सगळ्यांना सगळं दिसत आहे. त्यामुळे मी शासन दरबारी भीक मागणार नाही. कारण जो खरंच झोपला आहे त्याला आपण जागं करू शकतो, परंतु ज्याने झोपायचं सोंग केलं असेल त्याला आपण जागं करू शकत नाही. शासनाला, लोकनेत्यांना सगळं दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला न्यायासाठी आणि हक्कासाठी लढण्याची मुभा दिली आहे. मी माझ्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढेल. आणि या दरम्यान, सुव्यवस्था मोडली गेली तर त्याला पूर्णतः पोलीस प्रशासन जबाबदार राहील.

या सर्व प्रकाराबाबत मॅक्समहाराष्ट्रने या वेश्या महिलांची व्यथा जाणून घेतली....

पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधलेली राधीका (नाव बदलंले आहे) सांगते, "आम्ही हे काम करतो, आम्ही कुठे जाणार? आमचं आयुष्य ज्यात गेलं तेच काम आम्ही करणार. आम्हाला इथून जा-जा म्हणतात, आम्ही कुठे जाणार? आमचं घरदार घेऊन आम्ही आता रस्त्यावर झोपायचं का? ते डीसीपी साहेब, वस्तीतली मानसं सगळे आम्हाला असंच बोलतात.

या अगोदर, इथे सगळं ठीक होतं. सगळ्या माता - भगिनी कमवून खात होत्या. आपल्या मुलाबाळांना शाळेत पाठवत होत्या. २ वर्षांपासून लॉकडाऊन असल्यामुळे मुलं आता घरातूनच शिकत आहेत.

मात्र, या तुम्हाला इथून जायचं झालंच तर? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली...

आम्ही कुठं जाणार? आमचं आयुष्य बिघडलं आहे. म्हातारपणात कुठे जाणार? डीसीपी साहेब किंवा सरकार राहू देणार आहेत का? आम्हeला त्यांच्या घरात. ५० - ६० वर्ष झाली मी इथे राहत आहे.

असं राधीका सांगते.

35 वर्षाची प्रमिला सांगते... (नाव बदललं आहे)

आमचं म्हणणं एवढंच आहे की, आमचं बालपण इथे गेलं आहे. आम्ही कुठे जाणार. आम्हाला कोणताच समाज समजू शकत नाही. ३० - ३५ वर्ष झाली. आम्ही हेच काम करतो आहे. आमच्या तीन पिढ्या होऊन गेल्या, आता आमच्याकडे आमच्या मुलांच्या गोळ्या - औषधांसाठी आणि शाळेच्या फीजसाठी सुद्धा पैसे नाहीत. आम्ही काय खाणार, कसं जगणार? आमची वस्ती सुरूच राहावी एवढंच आमचं म्हणणं आहे.

असं प्रमिला सांगते.

वेश्या वस्तीत राहणारी शर्मिला सांगते (नाव बदलंले आहे)

आमची वस्ती अचानक बंद करण्यात आली. याअगोदर लॉकडाऊन लागलं होतं. तेव्हा सगळे आम्हाला खायला - प्यायला देत होते. संस्थेची लोकं सुद्धा यायची. मात्र, आता आमची परिस्तिथी अशी आहे की, आमच्या मुलांना खिचडी भात खाऊ घालून आम्हाला दिवस काढावे लागत आहेत.

आमच्याकडे पैसे नाहीत, दवाखान्यांसाठी सुद्धा पैसे नाहीत. असंच सुरु राहील तर आम्ही कुठे जायचं. आमचं आयुष्य या कामात गेलं आहे. आता या वयात आम्ही कुठं जायचं. आमची मागणी हीच आहे की, आमची वस्ती पुन्हा चालू करावी.

मुलांच्या शाळेची फीज वैगेरे या सगळ्या गोष्टी आहेत. आता १० - १५ हजारात काय होणार आहे. एका एका घरात साधारण १५ लोक राहतात. एवढ्या मोठ्या परिवाराचं १५ हजारात काय होणार, त्यामुळे आमची वस्ती पुन्हा चालू करा.

अशी मागणी शर्मिला करते

या भागात लावण्यात आलेले बॅरिकेट्स हटवण्यात आल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले...

४ - ५ बॅरीगेट्स त्यांनी हलवले आहेत. त्यांच्या अधिकारानुसार, त्यांनी आंदोलन केलं आहे. मात्र, चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. ज्या काही कायदेशीर कारवाईची गरज असेल ती कारवाई पोलिस करतील असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी हा परिसर बंद केला असला तरी या महिलांच्या पोटा पाण्याचा निर्माण झालेल्या प्रश्नाकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येतं.

Updated : 22 Aug 2021 8:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top