News Update
Home > Election 2020 > व्हिलचेअरवरील साध्वीचा डान्स ?

व्हिलचेअरवरील साध्वीचा डान्स ?

व्हिलचेअरवरील साध्वीचा डान्स ?
X

काही माणसं आव आणतात कधी तो भल्यासाठी असतो तर कित्येकदा आपली कातडी वाचवण्यासाठी, खोटारडेपणा लपवण्यासाठी असतो. काही लोक देशासमोर आव आणतात खूप काही केल्याचा, आपल्या कर्तृत्वामुळेच देश आज प्रगतीपथावर असल्याचा आव छाती काढून आणला जातो. पोलिसांकडून अटक करण्याची शक्यता निर्माण झाली की संशयित अथवा आरोपीच्या छातीत नेमकं दुखू लागतं, तर कधी अचानक तब्येत ढासळते नव्हे जागच्या जागी कोसळतात बिच्चारे...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप ठेवण्यात आलेली साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिची तब्येतही अशीच बिघडली. कोणत्याही आजाराचे निदान न होता ती इतकी बिघड़ली की तिला धड चालताही येईना. मग तिला मुंबईतील जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासण्यांचे रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतरही तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी मात्र ती चालू शकत नसल्याचे मान्य केले आणि तिच्या (नसलेल्या )आजारावर उपचार करत राहिले. बिच्चारी तेव्हापासून व्हिलचेअरला खिळलीय. त्यानंतर यथावकाश सरकार बदलले तपास यंत्रणांचा नवा अहवाल समोर आला, साध्वीवरील मोक्का कायदा हटवण्यात आला, तिला जामिनावर सोडण्यात आले. त्यानंतरही तिच्यावर लखनौ येथे एक शस्त्रक्रिया झाल्याचा दावा तिने केला आहे. मात्र, तिची व्हिलचेअर सुटली नाही.

दरम्यान, तिच्या कार्याची पावती म्हणून भाजपाने तिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली. उमेदवारी मिळताच तीने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याने देशभरातून टीकेची झोड उठली. याबाबत माफी मागतानाही तिचा आव काही कमी झाला नव्हता गिरे तो भी टांग उपर असाच तो होता.

गेल्या सोमवारी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून साध्वीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करायला येताना साध्वी व्हीलचेअरवर आल्या होत्या. मात्र, त्यावेळी देखील प्रज्ञासिंह प्रचारफेरीतही त्या सहभागी झाल्या नाहीत. तब्बेत ठीक नसल्याने प्रज्ञासिंह बऱ्याचदा व्हील चेअरवरच असतात. क्वचितच त्या चालताना दिसतात. तसेच चालताना त्यांना जिना चढण्यासाठी इतरांची मदत लागते. मात्र, त्यांच्या या खोटारडेपणाचे बिंग नुकतेच फुटले आहे.

भोपळच्या एका सिंधीबहूल भागात गेल्या असता त्यांनी अजाणतेपणी प्रचारादरम्यान एका गाण्यावर तेथील महिलांसोबत चांगलेच पदलालित्य दाखवले. त्यांच्या या दमदार नृत्यामुळे त्यांच्या व्हिलचेअरवरील बसण्याचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांच्या या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या खरच आजारी आहेत का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. एखाद्या मृत व्यक्तीने तिरडीवर उठून बसावे तसा धक्का पाहणा-यांना बसला आहे. विशेष म्हणजे याच आजाराच्या बळावर त्यांनी तुरूंगवास टाळून स्वतःला रूग्णालयात दाखल करून घेतले होते. गेले दहा वर्षे आपण व्हिलचेअरवर असल्याचे त्या भासवत आहेत. त्यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रकृतीच्या कारणामुळेच जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या नृत्यामुळे त्यांनी रूग्णालय आणि तपास यंत्रणांना कशाच्या जोरावर नाचवले असावे, याची चर्चा सुरू झाली असून त्यांच्या आजाराची सत्यता आणि व्हिलचेअरचे रहस्य तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://youtu.be/o2Bpa0_Q_rs?t=21

Updated : 27 April 2019 10:22 AM GMT
Next Story
Share it
Top