Home > मॅक्स रिपोर्ट > सोलापूर जिल्ह्यात साकारतायेत मिनी महाबळेश्वर

सोलापूर जिल्ह्यात साकारतायेत मिनी महाबळेश्वर

"कन्हेर" धरणामुळे 1978 मध्ये सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून विस्थापित व स्थलांतरित व्हावं लागलं, ते पण त्यांच्या मूळ गावापासून दुरवर दोनशे किलोमीटर असलेल्या आणि पंढरपूर जवळच संपूर्ण वारकऱ्यांसाठी आदराचं स्थान असलेल्या "टप्पा" जवळच्या दुष्काळी माळावर. पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गाव पूर्वसित असून याठिकाणी येथील नागरिक मिनी महाबळेश्वर सकारतायेत,प्रतिनिधी अशोक कांबळेंचा पुर्नवसीत परिवर्तनाचा रिपोर्ट...

सोलापूर जिल्ह्यात साकारतायेत मिनी महाबळेश्वर
X
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. हा देश आजादी चा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य पणाला लावले, त्यापैकी या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अग्रभागी असणारे महात्मा गांधी म्हणायचे,की हा देश खेड्याने बनलेला आहे. त्यामुळे जोपर्यंत खेड्यांचा, गावांचा विकास होणार नाही, तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही. गांधीजींच्या याच विचाराचा धागा पकडत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावाने स्वयंपूर्ण गाव करण्याचा कृतिशील कार्यक्रम राबविण्यास गेल्या वीस वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत.
ज्यांच्या कित्येक पिढ्या साताऱ्यातील जावळीच्या खोर्‍यात प्रामुख्याने महाबळेश्वर च्या पायथ्याशी गेल्या अशा "चिंचणी" (पूर्वीचा सातारा तालुका) गावच्या लोकांना "कन्हेर" धरणामुळे 1978 मध्ये सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतून विस्थापित व स्थलांतरित व्हावं लागलं, ते पण त्यांच्या मूळ गावापासून दुरवर दोनशे किलोमीटर असलेल्या आणि पंढरपूर जवळच संपूर्ण वारकऱ्यांसाठी आदराचं स्थान असलेल्या "टप्पा" जवळच्या दुष्काळी माळावर.पंढरपूर तालुक्यातील चिंचणी गाव पूर्वसित असून याठिकाणी येथील नागरिक मिनी महाबळेश्वर सकारतायेत. चिंचणी गाव हिरव्यागार झाडांनी नटलेले असून तेथे निरव शांतता जाणवते. हे गाव सध्या ग्रामीण व कृषी पर्यटन म्हणून विकसित होत आहे. गावातील युवकांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून या गावातील मोहन अनपट हे परिश्रम घेत आहेत. याठिकाणी ग्रामीण व कृषी पर्यटनाच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. येणाऱ्या काळात सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी गाव मिनी महाबळेश्वर म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास तेथील नागरिकांनी बोलताना व्यक्त केला.

1978 साली पुनर्वसित चिंचणी गावाला 100 एकर जमीन कसण्यासाठी आणि 15 एकर जमीन गावठाण म्हणून राहयाला देण्यात आले होते

खरं वास्तविक सहयाद्रीच्या हिरव्यागार कुशीतून दुसरीकडे कायमस्वरूपी विस्थापित होत असताना सातारा जिल्ह्यातील चिंचणी गावाला कुठेही जागा मिळालेली असती, पण या गावच्या कित्येक पिढ्या वारकरी परंपरेमध्ये वाढलेल्या असल्याने आणि आपलं उरलंसुरलं आयुष्यही पंढरपूरच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भक्तीत, संतांच्या आठवणीत व पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत घालवता येईल म्हणून त्यांनी वारकऱ्यांसाठी आदराचं स्थान असलेल्या 'टप्पा' जवळच्या माळ रानाची मागणी सरकारकडं केली. अन चिंचणी गावाला 100 एकराची जमीन व 15 एकराचे गावठाण राहयाला आणि कसायला मिळाले

हळूहळू एक एक कुटुंब पंढरपूरच्या टप्प्या जवळ माळरानावर कायमचंच रहायला आले

पुनर्वसनाच्या निर्णयानंतर 1978 पासून हळूहळू एक एक कुटुंब पंढरपूरच्या टप्प्या जवळच्या माळावर कायमचंच राहायला यायला लागलं. आज अखेर या ठिकाणी जवळपास 60 ते 65 च्या आसपास कुटुंब आहेत. जावळीच्या खोऱ्यात राहत असताना ज्या गावाला क्रांतिसिंह नाना पाटील असो की कर्मवीर भाऊराव पाटील असो यांच मार्गदर्शन - सहवास लाभला आणि इतिहासात ज्यांच्या पिढ्यान पिढ्या छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती संभाजी राजे व स्वराज्यासाठी जिवाची पर्वा न करता सन्मानाने उभ्या राहिल्या त्या चिंचणी गावाला विस्थापित झाल्यावर पहिल्या दोन पिढीत सन्मानच जगणं जाऊन अपमानाचं जगणं वाटयाला आलं त्यावेळच्या विस्थापित पिढीच्या आयुष्याची परवड सुरू झाली अन प्रचंड हतबलता व निराशा त्यांच्या वाट्याला आली. त्या काळात सुरुवातीच्या दोन पिढीने परकेपणाची अवहेलना सोसली. अन क्षणातच सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीतलं बाणेदार व टुमदार अस गाव पंढरपूरच्या उजाड व दुष्काळी माळावर आपली वाट आणि जगणं कायमचच हरवून बसल.

नव्या पिढीचा पंढरपूरच्या मातीशी नाळ जोडण्याचा व विठ्ठलाच्या भक्तीत रमणाण होण्याचा प्रयत्न

जसा जसा काळ पुढे सरकत होता तसं तसं या गावची नव्यानं जन्माला आलेली नवी पिढी पंढरपूरच्या मातीशी आपली नाळ जोडण्याचा व विठ्ठलाच्या भक्तीत रमणाण होण्याचा प्रयत्न करीत होती. या बदलत्या प्रयत्नातुनच 2005-06 साल उजडता उजडता नव्या तरुण पिढीच्या धाडसी निर्णयामुळे चिंचणी गावांन आपला चेहरामोहराच बदलून टाकण्याचा ठाम निश्चिय केला. अन चिंचणी गावाचं, पंढरपूरचं आणि सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर नेण्याचा चंगच त्यांनी बांधला. काय होता तो धाडसी निर्णय? तो धाडसी निर्णय असा होता की, "आपण या टप्प्या जवळच्या उजाड व दुष्काळी माळावर आपल्या पूर्वीच्या अनेक पिढीनं अनभुवलेलं सह्याद्रीच्या कुशीतलं हिरवाईन नटलेलं प्रतिमहाबळेश्वर निर्माण करायच."व स्वयंपूर्ण गाव.

चिंचणी गाव मिनी महाबळेश्वर बनविण्यामागचा धाडशी निर्णयाचा इतिहास

त्या धाडसी निर्णया मागचा इतिहास ही खूप रंजक आहे, जरी चिंचणी गाव 'टप्पा' जवळच्या माळावर स्थलांतरित झालं असलं तरी या गावच्या लोकांचे पै पाहुणे, रोजच्या व्यवहारातील लागेबांधे जावळीच्या खोर्‍यात होते व आजही आहेत. अन याच संबंधातुन पै पाहुणेच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत नव्या ठिकाणी जन्माला आलेल्या आणि शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुणांना वारंवार जाण्याचा योग यायचा. अन तिकडं गेल्यानंतर महाबळेश्वर आणि जावळीच्या खोऱ्यातील हिरवीगार झाडी आणि निसर्गाचं सदाबहार रूप बघून आनंद व अप्रूप वाटायचं. अन या हिरव्यागार नटलेल्या झाडीमुळचं व निसर्गाच्या बेफाम सौंदर्याच्या उधळणीमुळेचं देशभरातली वेगवेगळ्या ठिकाणची माणसं हिकड फिरायला येतात असं त्यांना राहून-राहून वाटायचं. त्या तीव्र अश्या इच्छेतुनच तरुणांनी आप आपसातले मतभेद बाजूला सारून सगळ चिंचणी गाव झाडून एकत्र आणलं आणि सर्वांच्या चर्चेतून असं ठरलं की, आपल्या यापूर्वीच्या पिढीन जसं आपलं सगळं आयुष्य दाट हिरव्यागार झाडीत, निसर्गाच्या सानिध्यात घालवल त्या पद्धतीने आपण या दुष्काळी माळावर प्रति महाबळेश्वर उभा करायचं आणि आपल्या गावलाच महाराष्ट्रामधलं पहिले " ग्रामीण व कृषी पर्यटन गाव" म्हणून विकसित करायचं. आज या गावाला ग्रामीण व कृषी पर्यटनाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'क 'वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे.

चिंचणी गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळ आणि झाडांचं गाव म्हणून नावारूपाला येत आहे

हे गाव पर्यटन स्थळ म्हणून आणि झाडांचं गाव म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये नावारूपाला येत आहे. गाव स्वच्छ करायचं सुंदर करायचं आणि पुन्हा पुणे किंवा मुंबईला नोकरीसाठी जायचं यापेक्षा याच गावात या गावातील तरुणांना स्त्रियांना पुरुषांना रोजगार मिळाला पाहिजे गावातील लोकांचं नोकरीसाठी होणारं स्थलांतर थांबलं पाहिजे या भावनेतून या गावातील तरुणांनी गावाच्या सार्वजनिक मालकीचे व संपूर्ण गावाला रोजगार, उत्पन्न देणारे " चिंचणी ग्रामीण व कृषी पर्यटन केंद्र " सुरू केलेले आहे. शहरी भागातील लोकांना ग्रामीण खाद्य, कला-संस्कृती समजावी शहरी लोकांना ग्रामीण जीवनशैली समजवी आणि शहरी लोकांनी गावांमध्ये येऊन गावांचा खेड्यांचा तिथल्या लोकसंस्कृतीचा खेळांचा आनंद घ्यावा ही मध्यवर्ती कल्पना ठेवून हे पर्यटन केंद्र सुरू केलेले आहे.

गावात सुसज्ज शाळा,अभ्यासिका,रेस्ट हाऊस, जिम याची निर्मिती

या गावाने यापूर्वी गावामध्ये मुला मुलींसाठी सुसज्ज्य अशी अभ्यासिका वाचनालय उभा केलेला आहे .याच्या आधारावरच भिलार सारखं "पुस्तकांचे गाव " निर्माण करण्याचा चिंचणीकर यांचा संकल्प आहे .या गावातील तरुणांना व्यायामासाठी ओपन जिम उभी केलेली आहे. गावातील संपूर्ण घराच्या छतावरील पाणी गोळा करून ते पाणी जमिनीत जिरवून रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेले आहे. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या वरच्या बाजूला समतल चर तयार करून गावातून वाहून जाणारे पाणी यामध्ये जिरवून पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

गावचा पाणीपुरवठा सोलर सिस्टीमवर

गावाची संपुर्ण पाणी पुरवठा योजना सोलर सिस्टम वर सुरू आहे. यासाठी जवळजवळ 17 एचपी एवढ्या हॉर्स पावर च्या चालणाऱ्या सोलरचे पंप बसवण्यात आले आहेत. याच बरोबर गावातील 40 सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर सोलर पथदिवे उभे करण्यात आलेले आहेत.

कोणत्याही सण ऊत्सव यात्रा वाढदिवस या कार्यक्रमासाठी फटाके वाजवले जात नाहीत

या गावांमध्ये झाडांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे पक्ष्यांचा वावर वाढलेला आहे त्याचबरोबर हे गाव पर्यावरणपूरक कोणत्याही आवाजाचे प्रदूषण न करणारे असल्यामुळे गावामध्ये गेले पाच वर्षापासून कोणत्याही सण ,ऊत्सव, यात्रा वाढदिवस असेल अन्य कार्यक्रमासाठी फटाके वाजवले जात नाहीत. या गावातील लहान मुलं सुद्धा स्वयंशिस्तीने दिवाळीच्या सणामध्ये टिकली सुद्धा वाजवत नाहीत. गावच्या सार्वजनिक मालकीचे पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. गावातील सर्व कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी मोफत दिली जाते. गावामध्ये प्रत्येक सीझनला येणारी फळांची झाड असून मुलांसह सर्वांना मनसोक्तपणे ही फळे खाता येतात.

गावची स्मशानभूमी स्वच्छ आणि सुंदर

गावची स्मशानभूमी स्वच्छ सुंदर व बगीच्या सारखी असल्यामुळे या ठिकाणी गावातील मुलं अभ्यास करणे वाढदिवस साजरा करणे आणि महिला उन्हाळ्याची त्यांची कामे पापड, भातवड्या ,वाकळ, यासारखे सर्व व्यवहार याच स्मशानभूमीमध्ये करतात. याच स्मशान भूमी मधून बोरवेल वर सौर पंप बसवून हे पाणी गावात पिण्यासाठी व झाडांसाठी वापरून अंधश्रद्धेला फाटा देण्याचे काम गावकऱ्यांनी केलेलं आहे. गावामध्ये ग्रामदैवत वरदायिनी मातीच सुंदर मंदिर असून या ठिकाणी रोज गावातील एका कुटुंबाचा नंबर असतो यामध्ये त्याची स्वच्छता ठेवली जाते.

चिंचणी जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक आला

यावर्षी जिल्हा परिषदेने" स्वच्छ शाळा सुंदर शाळा " हे अभियान राबवले होते. या अभियानामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 हजार 7 शे 64 शाळांमध्ये द्विशिक्षकी शाळेमध्ये चिंचणी या जिल्हा परिषद शाळेचा प्रथम क्रमांक आला. याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये शाळेला गौरवण्यात आले. गावची स्वतंत्र ग्रामपंचायत नाही,परंतु गावामध्ये आमच्या गावात आम्हीच सरकार या पद्धतीने कामकाज चालते गावातील सर्वांना रस्ते,विज,पाणी,स्वच्छता या भौतिक सुविधा दिल्या जातात. गावाचं गावठाण पंधरा एकरामध्ये विस्तारलेलं आहे.

यामध्ये एक फूट ही अतिक्रमण दिसून येत नाही जगण्याची लढाई लढत असताना हे जगणं सुंदर व्हावं कोणाचं तरी प्रेरणास्थान व्हावे म्हणून या गावातल्या तरुणांनी वि स्थापना नंतर रडत न बसता डॉ.भारत पाटणकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबन दादा शिंदे, कल्याणराव काळे, ग्रामपंचायत पिराची कुरोली, यांना सोबत घेत पर्यावरण पूरक विकेंद्रित उद्योगासह शोषणमुक्त नवा समाज घडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या देशाला काय मिळालं त्याची उपलब्धी काय असेल याच बरोबरीने या गावानं आतापर्यंतचे मिळवलेलौ आहे .सर्वाना सोबत घेऊन एक समृद्ध, आदर्श,स्वयंपूर्ण गाव करण्याच्या पद्धतीने प्रयत्न सुरू आहे .आणि तीच खऱ्या अर्थाने देशासाठी स्वातंत्र्य मिळवणार्‍या आपले प्राण अर्पण करणाऱ्या लाट्या काट्या आणि गोळ्या खालेल्या बलिदान दिलेल्या हुत्मांमा साठी हेच खरे क्रांतिकारक अभिवादन आहे.

Updated : 24 May 2022 2:27 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top