News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > रमाई आवास घरकुल योजनेला निधीअभावी ब्रेक

रमाई आवास घरकुल योजनेला निधीअभावी ब्रेक

समाजातील वंचित घटकांना हक्काचा निवार देणारी रमाई आवास घरकुल योजना निधीअभावी ठप्प पडली असून पावसाळ्यात वंचिताचे निवाऱ्याअभावी हाल होत आहे. निधी अभावी रखडलेल्या चार हजार घरकुलांचा प्रतिनिधी अशोक कांबळेंनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट...

रमाई आवास घरकुल योजनेला निधीअभावी ब्रेक
X

मानवाच्या मूलभूत गरजा अन्न,वस्त्र,निवारा आहेत,असे सांगितले जाते. आजही भारत देशात अनेक लोक या मूलभूत गरजा पासून वंचित आहेत. त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना योग्य प्रकारे पोहचल्या का नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या देशात अनेक जाती-जमाती या मूलभूत गरजापासून वंचित असल्याच्या दिसतात. त्यांना शासनाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना राबविल्या,परंतु त्या काहीशा प्रमाणात यशस्वी झाल्या असल्याच्या दिसतात तर अनेक योजना अपयशी होताना दिसत आहेत. शासनाने अनुसूचित जातीच्या लोकांना चांगली घरे मिळावीत यासाठी रमाई आवास घरकुल योजना आणली. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या लोकांना घरकुले देण्यात आली. सुरुवातीला सुरळीतपणे चालणारी ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीतून जात आहे. सोलापूर शहरातील सुमारे चार हजार घरकुले निधी अभावी रखडली असून शासनाने घरकुलांच्या बांधणीसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा करावेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक लाभार्थ्यांची घरे ढासळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाने निधी लवकर उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सोलापूर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक, तथा माजी गटनेता आनंद दादा चंदनशिवे यांनी केली.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेनंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता प्रदान केली होती.मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांपैकी अनेक घरकुलांचे काम अजूनही अपूर्ण आहे. शिवाय अनेक लाभार्थ्यांना अद्यापही पूर्ण अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यास आर्थिक अडचणी येत आहेत. कोरोना आजारामुळे प्रत्येक विभागाचे अर्थचक्र थांबल्याने विभागांना निधी कमी वितरीत केला जात आहे.

गेल्या तीन वर्षापासून रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी घरकुलाच्या प्रतिक्षेत

सोलापूर शहरात रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी गेल्या तीन वर्षापासून घरकुलाच्या प्रतिक्षेत आहे. सध्या घरकुल लाभार्थी आज ना उद्या घर मिळेल या आशेवर मोडक्या तोडक्या घरात दिवस काढत आहेत. त्यांच्या जगण्याा मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात त्यांची घरे कधी पडतील हे सांगता येत नसल्याचे घरकुल लाभार्थ्यांनी बोलताना सांगतले. यावेळी रमाई आवास घरकुल योजनेचे लाभार्थी यांनी बोलताना सांगितले,की दोन वर्षापूर्वी घरकुलासाठी अर्ज दिला होता. अधिकाऱ्यांनी घरकुल यादीत नाव आल्याचे सांगितले होते. परंतु आणखीनही घरकुल मिळाले नाही. आम्ही भविष्यात घर मिळेल या आशेवर दिवस काढत आहोत. सध्या पाऊस सुरू असल्याने आमच्या घराची पडझड झाली आहे. त्यामुळे राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मला लहान मुले असून पावसात दिवस काढत आहोत. अधिकारी सांगत आहेत,की घरकुलाच्या यादीत नाव आले असून महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर घरकुले मिळतील. घरकुलासाठी लागणारी राहिलेली कागदपतत्रे ही दिली आहेत. पण प्रशासनाकडून मंजूर घरकुलाना निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. आमची घरकुले मंजूर झाली असून शासनाने यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. या विभागाचे नगरसेवक येवून पाहणी करून जातात. असे ही नागरिकांनी बोलताना सांगतले.

सोलापूर शहरातील चार हजार घरकुलाना निधीच नाही

सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले,की सोलापूर शहरात समाज कल्याण विभागाकडून गेल्या तीन वर्षात रमाई आवास घरकुल योजनेचा एकही रुपया निधी खर्च केला गेलेला नाही. सातत्याने आम्ही समाज कल्याण विभागाकडे पाठपुरावा करत असून सोलापूर शहरामध्ये सन 2018-2019,2019-2020,2020-2021,2021-2022 या चार वर्षात सोलापूर समाज कल्याण विभागाला जे घरकुलाचे टार्गेट प्राप्त झाले होते. त्यानुसार या विभागाला पैसे मिळाले नाहीत. शहरामध्ये जवळ-जवळ चार हजारा पेक्षा जास्त APL आणि Bpl लाभार्थ्यांनी घरकुलासाठी महानगर पालिकेकडे अर्ज केले होते. तसेच शहरातील काही लाभार्थ्यांना घरकुलांचे हप्ते मिळाले नसल्याने काही घरकुले अपूर्ण अवस्थेत आहेत. यासाठी सातत्याने पालकमंत्री आणि समाज कल्याण मंत्री यांच्याकडे निधीची मागणी करत आहोत. रमाई आवास घरकुल योजना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आणि सोलापूर महानगरपालिकेने ही योजना शेडूल्ड वस्त्यांमध्ये प्रभावीपणे राबविणे आवश्यक होते. परंतु शासन,प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे. शासनाने लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात-लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा घरकुलापासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांना घेवून सोलापूर महानगरपालिकेवर विराट मोर्चा काढू असा इशारा आनंद चंदनशिवे यांनी बोलताना दिला.

रमाई आवास योजनेसाठी निधीची चणचण असल्याने अडचण येत आहे. शिवाय चालू आर्थिक वर्षात तर अजूनही घरकुलांना मंजुरी दिलेली नाही.प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. परंतु गरीब, गरजू लाभार्थ्यांना योजनेंतर्गत हक्काचा निवारा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी या योजनेमुळे लाभार्थी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.

रखडलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या डोळ्यात आले अश्रू

रमाई आवास घरकुल योजनेत नाव असूनही घरकुल मिळत नसल्याने घरा संबंधी व्यथा सांगताना एका महिलेचे अश्रू अनावर झाले होते. त्या महिलेने बोलताना सांगितले,की माझे घर मोडकळीस आले आहे. त्याची पडझड झाली आहे. त्यामुळे शासनाने लवकर घरकुल द्यावे. माझी लहान नातवंडे असून गेल्या तीन वर्षापासून आम्ही घरकुलाच्या प्रतिक्षेत आहोत. अधिकाऱ्याकडून घरकुलाला निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. शासनाला विनंती आहे की, आम्हाला लवकर घरकुल देण्यात यावे.

विभागनिहाय मान्यता मिळालेली आकडेवारी

  • मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीणच्या 30116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी
  • लातूर विभागात ग्रामीणच्या 24274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांना मंजुरी
  • नागपूर विभागात ग्रामीणच्या 11677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी
  • अमरावती विभागात ग्रामीणच्या 21978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी
  • पुणे विभागात ग्रामीणच्या 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी
  • नाशिक विभागात ग्रामीणच्या 14864 तर शहरी भागातील 346 घरकुलांना मंजुरी
  • मुंबई विभागात ग्रामीणच्या 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी

Updated : 2022-07-15T18:08:22+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top