Home > मॅक्स रिपोर्ट > राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना झोडपलं...

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना झोडपलं...

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना झोडपलं...
X

नेहमीच उत्तर भारतीयांविरोधात टीका करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उत्तर भारतीयांच्या मंचावर बोलताना उत्तर भारतीयांना चांगलेच झोडपले. पंडित नेहरू ते थेट नरेंद्र मोदी पर्यंत अनेक पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातून निवडून आलेत. पण तरीही उत्तर प्रदेशाचा विकास का नाही झाला? हा प्रश्न तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेशातल्या नेत्यांना का नाही विचारत? असा सवाल करत राज यांनी उत्तर भारतीयांना चांगलंच झोडपलं...

राज यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

  • आयोजकांच म्हणणं आहे आहे की आजचा हा संवाद कार्यक्रम उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या लोकांपर्यंत आम्ही पोहचवणार आहोत. म्हणून मी हिंदीत बोलत आहेत.
  • ज्या प्रदेशात उद्योगधंदे असतील तिथल्या लोकांना त्या उद्योगधंद्यांमध्ये प्राधान्य मिळायला हवं ही अपेक्षा काय चुकीची आहे? उद्या उत्तर प्रदेशात किंवा बिहारमध्ये जर उद्योगधंदे आले तर तिथे तिथल्या स्थानिकांनाच प्राधान्य मिळायला हवा
  • महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध होत असेल तर इथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळायला हवं, उत्तरप्रदेश-बिहारमध्ये रोजगार उपलब्ध होणार असेल तर तिथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळायला हवं, ह्यात चूक काय?
  • ज्या राज्यात जाल, तिथलं होऊन राहिलं पाहिजे. तिथली भाषा अंगिकारली पाहिजे. परदेशात जाता तेव्हा आपण हिंदीतून बोलता का?

  • पंडित नेहरू ते थेट नरेंद्र मोदी पर्यंत अनेक पंतप्रधान हे उत्तर प्रदेशातून निवडून आलेत. पण तरीही उत्तर प्रदेशाचा विकास का नाही झाला? हा प्रश्न तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेशातल्या नेत्यांना का नाही विचारत? तिथे त्यांना उद्योगधंदे का नाही आणता आले?
  • महाराष्ट्रात आमची आंदोलनं झाली तेव्हा त्याचा देशभर आकांडतांडव करण्यात आला, पण आसाममध्ये झालं, गोव्यात झालं, गुजरातमध्ये झालं तेव्हा हिंदी माध्यमं गप्प का होती? तेव्हा नरेंद्र मोदींना, का नाही प्रश्न विचारण्यात आले
  • महाराष्ट्रात उत्तर भारतीयांच्या विरोधात जे घडलं त्याविरोधात हिंदी माध्यमांनी गरळ ओकली पण आसाममध्ये बिहारींना जी मारहाण झाली, गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारहाण केली, अशा वेळेस तुम्ही ह्या राज्यांच्या नेत्यांना नरेंद्र मोदींना का नाही प्रश्न विचारत? प्रश्न मलाच का?
  • २००८ चं रेल्वेचं आंदोलन का झालं? कारण त्याची जाहिरात फक्त उत्तरप्रदेश-बिहारमध्ये देण्यात आली होती त्यामुळे तिथून लोंढे महाराष्ट्रात आले आणि त्यामुळे महाराष्ट्रात तणाव वाढला. कारण स्थानिकांना प्रथम प्राधान्य असायला हवं
  • महाराष्ट्रातल्या रेल्वेभरतीच्या जाहिराती महाराष्ट्रात न छापल्या जाता जर उत्तरप्रदेशातल्या वर्तमानपत्रांमध्ये येणार असतील आणि इथल्या मुलांना जर मुद्दामून अंधारात ठेवलं जात असेल आणि ह्याचा जाब विचारायला गेल्यावर जर उर्मट उत्तरं दिली जाणार असतील तर आम्ही गप्प बसू असं वाटतं तुम्हाला
  • उत्तरप्रदेश-बिहारच्या लोकांनो तुमचा स्वाभिमान कुठे गेला? का नाही तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना प्रश्न विचारत? त्यांच्या नाकर्तेपणामुळे तुम्हाला स्थलांतर करावं लागतंय. इतर राज्यांमध्ये संघर्ष करावा लागतोय. हे युपी-बिहारच्या राज्यकर्त्यांना समजत नाही का?
  • तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेश बिहारच्या नेत्यांना जाऊन का नाही सांगत की आम्ही जिथे जिथे जातो तिथे आम्हाला मारहाण केली जाते, आमचा अपमान केला जातो. तुम्ही त्यांना का नाही विचारत की आपल्या राज्यांचा विकास का नाही होत? तुम्हाला काहीच वाटत नाही की आपण किती काळ अपमान सहन करायचा?
  • प्रत्येक शहराची, राज्याची लोकांना सामावून घेण्याची एक क्षमता असते. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड राज्यातून ट्रेन भरभरून माणसं येणार असतील तर किती काळ ह्या लोंढ्यांचा ताण हे राज्य, हे शहर सहन करू शकणार आहेत ह्याचा विचार करा.
  • १९९५ ला राज्य सरकारने एक योजना आणली, त्यानुसार झोपडपट्टीवासियांना मोफत घरं दिली जाणार होती. त्यानंतर मुंबईत फुकट घरं मिळतील ह्या आशेने लोंढे येऊ लागले. हे लोंढे सुशिक्षित लोकांचे नव्हते, मला सुशिक्षित लोकांबद्दल आक्षेप नाही पण इथे येऊन गुंडगिरी करणार असतील तर आम्ही सहन करू?
  • फक्त संघर्ष करत राहणं हे माझं राजकरण नाही. माझे अनेक मित्र, स्नेही, सहकारी हे उत्तर भारतीय आहेत. जर माझ्या मनात उत्तर भारतीयांबद्दल राग असता तर ही लोकं माझे मित्र, स्नेही, सहकारी झाले असते?
  • मध्यंतरी आझाद मैदानावर रझाकारांनी मोर्चा काढला होता, त्यावेळी त्या मुसलमानांनी दंगल घडवली होती, मीडियाच्या वाहनांची तोडफोड केली होती, महिला पोलिसांची छेड काढली होती. हे सगळे मुसलमान उत्तरप्रदेशातून आले होते.तुमच्या राज्यात असे प्रकार घडले तर तुम्ही सहन कराल का?
  • डोमिसाईलचा कायदा सगळ्या राज्यांमध्ये लागू झाला पाहिजे.
  • महाराष्ट्रात १९६० च्या दशकात दाक्षिणात्यांच्या लोंढ्यांविरुद्ध आंदोलनं झाली होती.संघर्ष झाला. त्यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडू. केरळ आणि आंध्रप्रदेशसारख्या राज्यांनी उद्योगक्षेत्रात प्रगती केली आणि लोंढे थांबले. हेच उत्तरप्रदेश-बिहार आणि झारखंड मध्ये व्हायला हवं.
  • महाराष्ट्र जेंव्हा केंद्राच्या तिजोरीत १०० रूपये टाकतो तेंव्हा महाराष्ट्राला स्वत:चा विकास करण्यासाठी फक्त १३ रूपये २० पैसे मिळतात. हे सर्व राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. बिहारला १०० रुपये दिल्याच्या बदल्यात २१९ तर उत्तरप्रदेशला १४९.२ रुपये परत मिळतात. हे योग्य आहे का?
  • संघर्ष करायची मला इच्छा नाही. पण जर परिस्थिती बदलली नाही तर राज्याराज्यांत संघर्ष होईल. म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा.त्यांना उत्तर प्रदेश बिहारची स्थिती सुधारायला सांगा. माझी इच्छा आहे की देशातल्या राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असायला हवी.
  • अमिताभ बच्चन हे महान कलाकार आहेत, पण ते निवडणूक लढवायला अलाहाबादची निवड करतात, ते भोजपुरी सिनेमात काम करतात. जर बच्चन साहेबांना जर उत्तर प्रदेशाचं प्रेम असेल तर राज ठाकरेंना महाराष्ट्राचं प्रेम असेल तर काय चुकलं ?

Updated : 2 Dec 2018 3:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top