Home > मॅक्स रिपोर्ट > राजीव गांधी हत्याकांड : राज्यपालांवर नाराज आरोपींना मुख्यमंत्र्यांकडून सुटकेची अपेक्षा

राजीव गांधी हत्याकांड : राज्यपालांवर नाराज आरोपींना मुख्यमंत्र्यांकडून सुटकेची अपेक्षा

राजीव गांधी हत्याकांड : राज्यपालांवर नाराज आरोपींना मुख्यमंत्र्यांकडून सुटकेची अपेक्षा
X

माजी पंतप्रधान राजीव गांधीं यांच्या हत्येप्रकरणी सध्या तामिळनाडूच्या वेल्लोर इथं सातजण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. या सात आरोपींपैकी एकमेव महिला असलेल्या नलिनी श्रीहरन हिने मुक्ततेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांना पत्र लिहिलंय. तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळानं आमच्या मुक्ततेसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी कऱण्याची मागणी तिनं या पत्रात केलीय. मंत्रिमंडळानं सुटकेच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी हे विद्यमान मुख्यमंत्री पलानीस्वामीच करू शकतील, असा विश्वास नलिनीनं पत्रात व्यक्त केलाय. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडून सुटकेसंदर्भात कुठलाच निर्णय़ होत ऩसल्याच्या निषेधार्थ या आरोपींनी अन्नत्याग आंदोलनही केलं होतं.

काय होता तामिळनाडू राज्य सरकारचा निर्णय ?

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी पलानीस्वामी विराजमान झाल्यानंतर ९ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांच्या मंत्रिमंडळानं एक निर्णय घेतला. राजीव गांधी हत्याकांडातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ७ आरोपींची सुटका करण्याचा तो निर्णय होता. मात्र, हा निर्णय़ होऊनही पाच महिने झाले तरी त्यावर कारवाई होत नसल्याचं आरोपी नलिनीनं पत्रात म्हटलंय. राज्यघटनेच्या कलम १६१ नुसार अशा कैद्यांची मुक्तता करण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. मात्र, राज्य मंत्रिमंडळानं एकदा निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी करणं हे राज्यपालांना बंधनकारक आहे, तरीही त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याचं नलिनीचं म्हणणं आहे. भारतातील कारागृहात सर्वाधिक म्हणजे तब्बल २७ वर्षांपासून शिक्षा भोगणारी मी एकमेव कैदी असल्याचं नलिनीनं सांगितलं. दररोज आम्हांला वाटतं की आज आमची सुटका होईल, पण रोज आमच्या पदरी निराशाच पडतेय. कारण राज्यपाल हे मंत्रिमंडळाच्या निर्णयावर निर्णयच घेत नाहीत.

मुख्यमंत्री पलानीस्वामींवर विश्वास

जयललिता यांच्या मृत्युनंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र, सध्या राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळं आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी हे त्यांच्याच मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयाबाबत राज्यपालांची समजूत काढतील, असा विश्वास नलिनीनं व्यक्त केलाय. मुख्यमंत्री पलानीस्वामी हेच आमची शेवटची आशा असल्याचंही नलिनीनं पत्रात नमूद केलंय.

राजीव गांधी हत्याकांड

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतल्या श्रीपेरूंबदुर इथं २१ मे १९९१ मध्ये एका आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. एलटीटीईच्या गायत्री नावाच्या आत्मघातकी सदस्यानं आरडीएक्सनं घडविलेल्या स्फोटात राजीव गांधी यांचा मृत्यु झाला होता. भारतीय सैन्याला श्रीलंकेत सैन्य पाठवून तामिळी भाषिकांच्या जखमांवर मीठ चोळल्याच्या भावनेतून बदला घेण्यासाठीच राजीव गांधींची हत्या झाल्याचं तपासाअंती निष्पन्न झालं होतं.

१९९८ मध्ये राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार असलेल्या २६ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी नलिनी तिचा नवरा मुरूगन, संथन आणि पेरारीवलन यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना जन्मठेप सुनावली. तर इतर तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर पुराव्याअभावी १९ जणांची सुटका करण्यात आली.

Updated : 23 Feb 2019 3:41 PM GMT
Next Story
Share it
Top