Home > मॅक्स रिपोर्ट > उष्ण हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे येथे बहरतेय सफरचंदाची शेती

उष्ण हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे येथे बहरतेय सफरचंदाची शेती

सफरचंद, लाल केळी, इलायची केळी ही पीक महाराष्ट्रात घेतली जात नाहीत. मात्र, योग्य तंत्रज्ञानाचा वापर करत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजाराम पाटील यांनी ही किमया करुन दाखवली आहे. पाहा वाशिंबे गावचे शेतकरी राजाराम पाटील यांच्या शेतशिवारात फुलली ही शेती....

उष्ण हवामान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील वाशिंबे येथे बहरतेय सफरचंदाची शेती
X

सफरचंदाची शेती म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश. थंड हवामानाचे प्रदेश सोडून दुसऱ्या कोणत्याच प्रदेशात सफरचंदाची शेती अशक्य आहे. तेही सोलापूर सारख्या उष्ण हवामान असलेल्या जिल्ह्यात सफरचंदाची शेती कदापि शक्य नाही. अशी अनेक शेतकऱ्यांची धारणा असताना अशक्य ते शक्य करून दाखवण्याची किमया वाशिंबे येथील शेतकरी राजाभाऊ पाटील व त्यांच्या दोन मुलांनी करून दाखवली आहे.

त्यांनी दीड एकर क्षेत्रात हर्मन ९९ या सफरचंदाच्या जातीच्या रोपांची यशस्वी लागवड केली असून झाडे जोमात वाढली आहेत. सध्या त्यांच्या शेतातील सफरचंदाच्या झाडांना उत्तम फळे आली असून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात असलेल्या वाशिंबे गावच्या शिवारात सफरचंदाची शेती बहरात आली आहे. सफरचंदाबरोबरच त्यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुट, लाल केळी / रेड बनाना, इलायची केळी, पेरू, सीताफळ याची लागवड केली आहे.


राजाभाऊ पाटील वाशिंबे ता.करमाळा, जि. सोलापूर येथील रहिवाशी असून त्यांनी व त्यांच्या मुलांनी पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसीत केलेल्या सफरचंदाच्या रोपांची लागवड केली आहे. त्यांनी हर्मन ९९ या जातीच्या ५४४ सफरचंदाच्या रोपांची लागवड दीड एकर क्षेत्रात केली आहे. सफरचंदाच्या रोपांची लागवड करण्यापूर्वी राजाभाऊ पाटील यांनी महाराष्ट्र व कर्नाटक भागात ज्या प्रगतशील शेतकऱ्यांनी सफरचंदाच्या रोपांची लागवड केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या बागांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घेतली. तसेच सफरचंदाच्या शेतीची मोबाईल इंटरनेट याच्या माध्यमातून लागवड, जोपासना कशी करायची याची माहिती घेतली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये जम्मू काश्मीर मधून राष्ट्रपती पदक मिळालेले हरिमत शर्मा यांनी उष्ण कटिबंधीय प्रदेशात जगणारी सफरचंदाची जात विकसित केली होती. त्याला हर्मन ९९ नाव असून या जातीची सफरचंदाची रोपे पाटील यांनी मागवून घेतली. त्यांना सफरचंदाचे एक रोप ७० रुपयाला मिळाले असून त्यांनी सफरचंदाच्या रोपांची लागवड १२ फूट रुंद व १० फूट लांबीवर केली आहे. त्यांना लागवडीसाठी सुमारे ६० ते ७० हजाराच्या आसपास खर्च आला आहे. सध्या झाडाची उंची समाधानकारक असून उत्तम फळे आली आहेत.


सफरचंदाच्या शेतीत आंतरपीक म्हणून पेरूची लागवड केली आहे. पेरूच्या उत्पादनातून ही त्यांना आर्थिक लाभ होत आहे. राजाभाऊ पाटील यांनी सफरचंदाच्या शेती बरोबरच ड्रॅगन फ्रुट,लाल केळी, इलायची केळी, सीताफळ, पेरू, डाळींब, शेवगा याची लागवड केली आहे. लाल केळी व इलायची केळीची शेती मुख्यतः दक्षिण भारतात केली जाते. या केळीच्या लागवडीचा महाराष्ट्रातील पहिला यशस्वी प्रयोग राजाभाऊ पाटील यांनी केला आहे.

त्यांच्या या केळीला मार्केटमध्ये मागणी असून लाल केळी व इलायची केळी विकत घेण्यासाठी पाटील यांचा रिलायन्स, महिंद्रा, सहयाद्री या कंपन्याशी करार झाला आहे. त्यानुसार या कंपन्या शेतात येऊन केळी घेऊन जातात. ड्रॅगन फ्रुट, सीताफळ, पेरू, शेवगा यांची लागवड करून आर्थिक आधारावर शेती केली जात आहे.

राजाभाऊ पाटील यांना अतुल व हर्षवर्धन ही दोन मुले असून शेतीच्या कामात त्यांना मदत करत आहेत. अतुल हा मुलगा बी.एससी अग्री असून त्याने कोकण विद्यापीठ दापोली येथून अग्रीची पदवी संपादन केली आहे.

त्याच्या शेतीविषयीच्या ज्ञानाचा फायदा पाटील यांना होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. पाटील यांनी केलेल्या सफरचंद लागवडीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक भागातील शेतकरी सफरचंदाची शेती पाहण्यासाठी भेटी देत आहेत.

राजाभाऊ पाटील यांचा मुलगा अतुल पाटील यांच्याशी आम्ही बातचीत केली असता, त्यांनी सांगितले की, माझे शिक्षण बी.एससी अग्री कोकण विद्यापीठ दापोली येथून झाले आहे. डिग्रीला असताना माझ्या वडिलांनी सफरचंदाच्या हर्मन ९९ या रोपांची बातमी टीव्ही वर पाहिली होती.




त्यावेळी नुकताच या रोपांच्या लागवडीचा प्रयोग बेळगाव येथे यशस्वी झाला होता. या रोपांची लागवड करण्याच्या अनुषंगाने हर्मन ९९ या सफरचंदाच्या जातीच्या रोपांची सर्व माहिती इंटरनेट वर शोधून काढली. या रोपांच्या संबंधीत मार्गदर्शन कोठे उपलब्ध नव्हते. इंटरनेटवर रोपे मिळतात ते ठिकाण शोधून काढले. त्यानुसार रोपे ऑनलाइन बुक केली. रोपे कुरियर ने गावात आली. आम्ही प्रायोगिक तत्वावर सफरचंदाची लागवड केली असून सफरचंदाची झाडे आता दीड वर्षांची झाली आहेत. या झाडांना उत्तमरीत्या फळे लागली असून या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. सफरचंदाच्या झाडांची छाटणी मागच्या दोन महिन्यांपूर्वी केली होती. सध्या प्रत्येक झाडाला २१ ते ३० सफरचंदाची फळे लागली आहेत. अशीच जर भविष्यात चांगली फळे लागली तर सफरचंदाची शेती वाढून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.

राजाभाऊ पाटील यांचा दुसरा मुलगा हर्षवर्धन यांनी सांगितले की, लाल केळी म्हणजे रेड बनाना ही डी. वाय.पाटील यांच्या राजेशाही कंपनीची व्हरायटी आहे. वडिलांनी या केळीची माहिती गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे येथे जाऊन घेतली. वडिलांनी लाल केळीची आपल्याला लागवड करायची आहे असे सांगितले. त्यानुसार लाल केळीची माहिती घेतली असता असे आढळले की, या केळीची लागवड तमिळनाडू व दक्षिण भारतात केली जाते. या केळीच्या लागवडीचा आम्हीच महाराष्ट्रात प्रथम प्रयोग केला आहे.




त्यावेळी आम्ही पुण्याच्या थेऊर येथील राजेशाही कंपनीशी संपर्क साधून रोपे मागवली होती. लाल केळीची लागवड करून केळीचे संगोपन चांगल्या प्रकारे केले आहे. आमची ही केळी रिलायन्स, महिंद्रा, सहयाद्री या कंपन्या विकली जाते. तसेच आम्ही इलायची या जातीच्या केळीची लागवड केली असून ती प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळते. गेल्या ५ वर्षांपासून आमच्याकडे इलायची केळीची बाग असून या केळीची उंची सुमारे १८ ते १९ फूट आहे. या केळीचा घड जास्तीत जास्त १८ ते १९ किलो तर कमीत कमी १२ ते १३ किलो भरतो. इलायची केळी पण रिलायन्स, महिंद्रा, सहयाद्री कंपन्यांना विकली जात आहे.

शेतकऱ्यांना शेतीतून उत्त्पन्न मिळत नाही. अशी परिस्थिती असताना नवनवीन उपक्रम राबवून शेती केली तर ती निश्चित शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देते. हे पाटील यांनी दाखवून दिलं आहे.

Updated : 26 May 2021 10:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top