Home > मॅक्स रिपोर्ट > राज ठाकरेंचा फडणवीस यांना माघारीचा सल्ला; उध्दव ठाकरे यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर की आणखी काही?

राज ठाकरेंचा फडणवीस यांना माघारीचा सल्ला; उध्दव ठाकरे यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर की आणखी काही?

सध्या मुंबई महापालिका ठाकरे विरूध्द शिंदे गटातील राजकीय युध्दाची अंतिम फेरी असेल तर अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणुक ही उपांत्य फेरी म्हणावी लागेल. या पोटनिवडणुकीचा संग्राम सुरू असताना राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना घ्य़ायला सांगितलेल्या माघारीचा काय अन्वयार्थ निघतो? जाणून घ्या या विशेष रिपोर्टमधून...

राज ठाकरेंचा फडणवीस यांना माघारीचा सल्ला; उध्दव ठाकरे यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर की आणखी काही?
X

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे विरूध्द भाजप व्हाया बाळासाहेबांची शिवसेना असा वेगळाच राजकीय प्रवास आपण सगळेच अनुभवत आहोत. आणि हे सारं राजकीय नाट्य ज्या पोट निवडणुकीमुळे रंगलं ती पोटनिवडणुकच लढवू नका असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

अंधेरी पुर्व विधानसभेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचे अकाली निधन झाले आणि त्यानंतर या मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आणि रंगला शिवसेना नावावरून उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा थेट सामना... मुळ चिन्ह आणि नाव गोठवल्यानंतर दोन्हा गटांना नवे चिन्ह आणि नाव निवडणुक आयोगाने दिली. मात्र या नव्या चिन्हाची आणि नावाची गरज उध्दव ठाकरे य़ांना होती कारण ही पोटनिवडणुक त्यांना लढवायची होती. शिंदे गटाने मात्र ही निवडणुक न लढवता भाजपसाठी रस्ता मोकळा केला. शिवाय ऋतूजा लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण रंगलं ते वेगळंच!

आता या सगळ्या राजकीय गोंधळात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही पोटनिवडणुक लढवू नका असा सल्लाच दिला आहे. नेमकं राज ठाकरे काय म्हणाले आहेत पाहुयात.

"प्रिय मित्र देवेंद्र, सस्नेह जय महाराष्ट्र!

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे.

आमदार कै. रमेश लटके ह्यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं के. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल.

माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेंव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेंव्हा शक्यतो निवडणूक लढवण्याचं धोरण स्वीकारतो. तसं करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो अशी माझी भावना आहे. आपणही तसं करावं असं मला माझं मन सांगतं.

असं करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्विकार कराल.

आपला मित्र,

राज ठाकरे"

आता या पत्रानंतर भुतकाळाप्रमाणे राज यांच्या मनात उध्दव ठाकरेंसाठी सॉफ्ट क़ॉर्नर तयार तर झाला नाही ना असा प्रश्न उपस्थित राहणं साहजिक आहे. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विनय काटे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, " मला असं वाटत नाही. कारण अंधेरी हा मराठी बहुल भाग आहे. जिथे भाजप ने मुरजी पटेल या अमराठी उमेद्वाराला संधी दिली तर उध्दव ठाकरेंनी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली.

त्यात आपण जर दसरा मेळावा पाहिला तर जमिनीवर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अधिक बळकट उध्दव ठाकरे यांचाच पक्ष वाटतो. त्यामुळे भाजप उमेद्वाराचा पराभव होणार हे जवळपास सगळ्यांनाच ठाऊक आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस यांना देखील.. त्यामुळे भाजपला या निवडणूकीतून स्वतःहुन माघार घेता येणार नाही म्हणुन मग दुसऱ्या कुणाला आवाहन करण्यास सांगून त्याच्या नावे माघार घेणे कधीही चांगले... म्हणुन मग राज यांनी आवाहन केलं असल्याचा दाट संशय येतो. शिवाय शनिवारी १५ ऑक्टोबर २०२२ ला राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे य़ांची घेतलेली भेट त्याच संदर्भात असण्याची शक्यता नाकारता येत नाही." असं डॉ. विनय काटे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

याशिवाय ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना देखील आम्ही या प्रश्नाचं उत्तर विचारलं त्यावेळी ते म्हणाले, " राज ठाकरेंना उध्दव ठाकरे यांच्याबाबत काही सॉफ्ट कॉर्नर आहे असं मला वाटत नाही उलट उध्दव ठाकरे यांना पुन्हा उभारी घेऊ न देण्यासाठी हे आवाहन केलं गेल्याचं मला वाटतं. जर निवडणुक झाली आणि ऋतुजा लटके ती निवडणुक जिंकल्या तर उर्वरीत शिवसैनिकांना एक नवं स्फुरण चढेल आणि उध्दव यांना येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा होऊ शकतो.

शिवाय भाजप, आणि शिंदे गटाची नाचक्की होईल ती वेगळीच. तसेच तीन महिन्यांपुर्वा जो घाट भाजपने घातला होता त्यावर पाणी सोडल्यासारखं होईल. असं होऊ न देणे हा त्या पत्रा मागचा एकमेव उद्देश आहे मग या नंतर ही चर्चा अशीच चालू राहिल आणि मग हळू हळू भाजप या निवडणूकीतून माघार घेईल असं माझं वैयक्तिक मत आहे. याशिवाय राज य़ांनी त्यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे त्यांना रमेश लटके आणि ऋतूजा लटके यांच्याबद्दल आत्मियता आहे असं काही नाही कारण ती असती तर त्यांनी ऋतूजा लटके यांना राजीनामा मंजुरीसाठी जो त्रास झाला त्यावेळी त्यांच्या बाजूने वक्तव्य केलं असतं.

त्यामुळे उध्दव यांना फायदा होऊ न देणे, भाजप आणि शिंदे गटाची नाचक्की रोखणे शिवाय स्वतःसाठीची उपलब्ध असलेली राजकीय स्पेस कायम ठेवणे या साठी राज ठाकरेंचा हा पत्राचा घाट असू शकतो." असं मत विजय चोरमारे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

तर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी देखील या प्रश्नावर बोलताना सांगितलं की, "राज ठाकरेंनी केलेला प्रयत्न जर एकनाथ शि्ंदेंनी केला असता तर त्यांना शिवसेैनिक आपल्या बाजूने वळवण्याची संधी होती पण त्यांनी ती सोडली. राहता राहिला प्रश्न राज ठाकरे यांच्या पत्राचा आणि त्यांच्या भुमिकेचा तर मराठी माणसाला आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. " असं त्यांनी सांगितलं.

या व्यतिरीक्त ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी देखील राज ठाकरे य़ांच्या पत्रावर आपलं मत सोशल मिडीयावर नोंदवत प्रश्न उपस्थित केला आहे. " अंधेरीत पऱाभव होणार ही खात्री झाल्याने भाजप(फडणवीस) सुटकेसाठी राज ठाकरेंची मदत घेतोय काय?" असा प्रश्नच उपस्थित केला आहे.

एकंदरीत काय तर राज ठाकरे यांचं हे पत्र राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना निमित्त ठरणार हे नक्की! शिवाय या डॉ. विनय काटे, विजय़ चोरमारे यांच्या विश्लेषणावरून आणि निखिल वागळे यांच्या प्रश्नावरून राज य़ांना आपल्या मोठ्या भावा विषयी कोणताही सॉफ्ट कॉर्नर नाही असला तर तो केवळ राजकीय स्वार्थ आहे असंच दिसून येतं. शिवाय अप्रत्यक्षपणे भाजप तथा देवेंद्र फ़डणवीस हे राज ठाकरे यांची मदत घेऊ पाहतायत असं मत राजकीय विश्लेषकांचं असल्याचं दिसून येतं.

Updated : 16 Oct 2022 11:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top