Home > News Update > साथीच्या रोगामुळं की अंधश्रद्धेमुळं रायगडमधल्या बलाप गावाचं स्थलांतर ?

साथीच्या रोगामुळं की अंधश्रद्धेमुळं रायगडमधल्या बलाप गावाचं स्थलांतर ?

साथीच्या रोगामुळं की अंधश्रद्धेमुळं रायगडमधल्या बलाप गावाचं स्थलांतर ?
X

छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं रायगड जिल्हा पावन झालेला आहे. याच रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील बलाप गावातील ग्रामस्थ गेल्या ८० वर्षांमध्ये दर नऊ वर्षांनी गावसोडून शेजारीच तीन दिवसांसाठी स्थलांतरित होतात. काहींना ही अंधश्रद्धा तर काहींना हे एकत्र येण्याचं माध्यम वाटतंय.

काय आहे परंपरा

दर नऊ वर्षांनी मे महिन्यातील पहिल्या अमावस्य़ेला संपूर्ण ग्रामस्थ गाव सोडून शेजारील परिसरात कुटुंबासहित तीन दिवसांसाठी स्थलांतरित होतात. या तीन दिवसांमध्ये गावात भूत येणं, आत्म्यांचा मुक्त वावर असतो, त्यामुळं ग्रामस्थ गावाच्या वेशीवर तात्पुरत्या झोपड्या बांधून त्यात राहतात. याला रीघवनी परंपरा असंही म्हटलं जातं.

यावर्षी ग्रामस्थ शुक्रवारी (ता.3) सकाळी 7 वाजता गावातील घराबाहेर पडले आहेत. त्यांनी गावाच्या वेशीजवळ साधारण 35 झोपड्या बांधल्या आहेत. गावातील अंदाजे 300 अबाल-वृद्ध व तरुण तेथे राहत आहेत. शनिवारी (ता.4) रात्री गावात सर्व लोक जाऊन बोकड कापणार आणि पारंपरिक विधी करणार आहेत. त्यांनतर रविवारी (ता.5) सर्व गावकरी पुन्हा आपापल्या घरी जाणार आहेत. या तात्पुरत्या मुक्कामात ग्रामस्थांचं खाणंपिणं इथेच असतं. अशी ही जुनी प्रथा जोपासली जात आहे. मुंबईला राहणारे ग्रामस्थही आता या प्रथा-परंपरेसाठी इथं आले आहेत. सर्वजण एकत्र येऊन मजा व मनोरंजन करणे असे सध्या या प्रथेचे स्वरूप आहे. एक प्रकारे या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात, असं राजेंद्र खरीवले या ग्रामस्थांनं सांगितलं.

पूर्वी गावात साथीचे रोग आल्यावर त्या रोगांच्या विषाणू-जिवाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व लोक गावाबाहेर यायचे. मात्र त्यांनतर याला भुतप्रेत ही अंधश्रद्धा जोडली गेली. मात्र, आम्ही तरुणांनी या परंपरेचे कारण पूर्वीचे साथीचे रोग असल्याचे शोधले आहे. या पाठीमागे कोणती भीती किंवा अंधश्रध्दा किंवा अघोरी प्रथा नाही. किशोर खरीवले, उपसरपंच, बलाप

संसर्गजन्य रोगाची साथ एखाद्या गावात आल्यावर गाव रिकामं करून गावाबाहेर राहिल्यानंतर साथ आटोक्यात येते, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गाव टाकणी करून असे आजार नियंत्रणात येणे शक्य नाही. गाव टाकणी सारख्या रूढी-परंपरांची चिकित्सा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत या गावातल्या नागरिकांशी संवाद साधून याबाबत प्रबोधन केले जाईल.

Updated : 4 May 2019 2:05 AM GMT
Next Story
Share it
Top