Home > मॅक्स रिपोर्ट > रायगड: अतिवृष्टीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत

रायगड: अतिवृष्टीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे वन्यजीवांची देखील वाताहत झाली आहे. काही ठिकाणी मगर, दुर्मिळ पिसोरी हरीण, अजगर यासारखे वन्यजीव मानवी वस्तीत शिरत आहेत. याशिवाय समुद्री पक्षांना देखील अतिवृष्टीचा मोठा धोका झाला आहे.

रायगड: अतिवृष्टीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत
X

पूर व अतिवृष्टीमुळे माणगाव शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या भर वस्तीत अतिशय दुर्मिळ असलेले पिसोरी हरीण आढळले होते. या हरणाला येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्यासह वनविभागाने सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले. मूषक हरीण म्हणजेच पिसोरी हरीण हा अतिशय दुर्मिळ लाजरा व नेहमीच मनुष्यवस्तीपासून दूर जंगलात राहणारा वन्यजीव आहे, वेळप्रसंगी खूप चपळतेने हे हरीण पळते. मात्र अतिवृष्टीमुळे या जीवाची मोठी वाताहत झाली आणि नाईलाजाने त्याला आसऱ्यासाठी मानवी वस्तीत यावे लागले.

मुसळधार पावसामुळे पालीतील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे एका घरात तर साप शिरले होते.

माणगाव कचेरी रोड येथील मंगलमूर्ती कॉम्प्लेक्स समोर गुरुवारी सात फूट लांबीची अजस्त्र मगर रस्त्यावर मुक्त संचार करताना दिसली. माणगाव शहरात अशा प्रकारे पहिल्यांदाच भर वस्तीत रस्त्यावर मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. झुंबड उडाल्याने तणावात येऊन ही मोठ्या आकाराची मगर तेथील समोरीलच ओम अपार्टमेंट येथे आतमध्ये शिरली. वन विभाग, पोलीस व कोलाड रेस्क्यू टीम तर्फे बचावकार्य करून या मगरीला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

गुरुवारी श्रीवर्धन तालुक्यातील कुसुमादेवी मार्गावर राहणारे शशांक केळस्कर यांच्या घराजवळ आठ फुटी अजगर आला होता. त्याने चक्क तीन कोंबड्या व दोन बदके फस्त केली. या अजगराला सर्पमित्र सुशांत भोसले यांनी सुखरूप अधिवासात सोडले.

मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इंदापूर मार्गावर खरवली फाट्याजवळ ३० जून रात्री साडेआठच्या सुमारास रत्स्यावर एक मगर आली होती. या मगरीला वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणात सामाजिक संस्था कोलाड (SVRSS) रेस्क्यू टीमने, वन्यजीव रक्षक सागर दहिंबेकर यांनी सुखरूप अधिवासात सोडले. अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे वन्यजीवांची वाताहत होतांना दिसत आहे.

मानवी वस्तीत प्राणी शिरण्याच्या घटनेबाबत माणगाव येथील वन्यजीव रक्षक शंतनु कुवेसकर सांगतात

“अतिवृष्टीमुळे वन्यजीवांच्या निवाऱ्यात पाणी भरते. मग ते आसरा व सुक्या जागेच्या शोधत मानवी वस्तीमध्ये येतात व तिथे भरकटतात. मात्र मानवी वस्तीत आलेल्या वन्यजीवांना त्रास व इजा होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास लागलीच वनविभागला कळवावे. अतिवृष्टीमुळे काही समुद्री पक्षांना देखील फटका बसला आहे. समुद्र खवळल्याने बुबी सारखे समुद्री पक्षी भरकटुन किनाऱ्यावर आले आहेत.

याबाबत माणगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांनी नागरिकांना पुढील आवाहन केले आहे.

“सद्याच्या पुरपरिस्थितीमुळे वन्यजीवांची देखील वाताहत होत आहे, भर वस्त्यांमधून त्यांचा वावर आढळून येतोय. माणगांव शहरातल्या मोठ्या मगरीच्या बचावानंतर आता लगेचच हे पिसोरी हरीण बाजारपेठेत मिळाले आहे. वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यास स्थानिक नागरिकांनी अश्या प्रकारे सहकार्य करीत वनविभागाला त्वरित संपर्क साधावा.

यादरम्यान मानवी वस्तीमध्ये सापांचा वावर वाढला आहे याबाबत आम्ही सुधागडचे सर्पमित्र दत्तात्रेय सावंत यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली.

“अतिवृष्टीमुळे सापांचा बिळात पाणी जाते. शिवाय पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते वाहून जातात. अशावेळी ते मानवी वस्तीमध्ये शिरतात. काहीवेळाजंगलात भक्ष्य न मिळाल्याने ते भक्ष्याच्या शोधात देखील मानवी वस्तीमध्ये येतात. मागील आठवडा भरात मानवी वस्तीत शिरलेल्या अनेक सापांना पकडून सुखरूप अधिवासात सोडले आहे”.

Updated : 2 Aug 2023 3:40 AM GMT
Next Story
Share it
Top