Home > मॅक्स रिपोर्ट > राज्याच्या राजकीय भूकंपाचे रायगडात उमटतायेत अभूतपूर्व पडसाद,आदिती तटकरेंनी मारली बाजी, भरत गोगावले यांची निराशा

राज्याच्या राजकीय भूकंपाचे रायगडात उमटतायेत अभूतपूर्व पडसाद,आदिती तटकरेंनी मारली बाजी, भरत गोगावले यांची निराशा

आमदार धैर्यशील पाटिल यांना खासदारकी च्या तिकीटाची चिंता रायगडात आदिती तटकरे यांच्या शुभेच्छा बॅनर वरुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवारच गायब..

राज्याच्या राजकीय भूकंपाचे रायगडात उमटतायेत अभूतपूर्व पडसाद,आदिती तटकरेंनी मारली बाजी, भरत गोगावले यांची निराशा
X

महाराष्ट्रात मागील दोन वर्षात अनपेक्षित अशा राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकसंघ असलेली शिवसेना फुटून शिवसेनेची अक्षरशः शकलं उडाली, आणि आता त्याच फुटीची पुनरावृत्ती होत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अजित पवारांनी धक्का देत भाजप शिंदे गटात सामील होऊन दुसरा राजकीय भूकंप घडवून आणला. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा झालेल्या या भूकंपाने रायगडला चांगलेच हादरे बसलेत. अजित पवारांनी वरिष्ठ नेत्यांसह भाजप शिवसेनेच्या महायुतीत आपली जागा फिक्स केली. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना सोबत घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली.

सकाळच्या शपथविधीनंतर आता झालेल्या दुपारच्या शपथ विधीवेळी राष्ट्रवादीच्या ९ महत्वाच्या व बड्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यात रायगडच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांची वर्णी लागली. अदिती तटकरेंच्या शपथविधीने या सरकारमध्ये प्रथम महिला मंत्री महाराष्ट्राला मिळाली. मात्र या राजकीय हालचालींचे अभूतपूर्व पडसाद रायगड जिल्ह्यात उमटत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्यावर नाराजी दर्शवित रायगडातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी राज्यात सर्वप्रथम बंडाचा नारा दिला. पालकमंत्री हटाव अशी घोषणा देत आ.भरत गोगावले,आ.महेंद्र दळवी, आ.महेंद्र थोरवे, यांनी आदिती तटकरे व थेट सुनिल तटकरे यांना आव्हान दिले होते. त्याहीपुढे जाऊन अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचे कारण या बंडा मागे पुढे आणले होते, मात्र काही काळ जातो न जातो तोच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारच्या गोटात सामील झाले.

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीची सर्व सूत्रे खासदार सुनील तटकरे यांच्या हातात एकवटलेली आहेत. ताज्या घडामोडीमध्ये सुनील तटकरे आणि त्यांचे बहुतांश पदाधिकारी अजित पवार यांच्याबरोबर भाजपच्या गटात दाखल होत असल्याने रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या राजकीय सत्तांतरानंतर विरोधकांची ताकद पूर्णपणे क्षीण झाली आहे. रसातळाला जात असलेला काँग्रेस, शिवसेनेचा ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाची एकत्रित ताकद सध्या तरी कुठेच दिसत नाही, तर भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची एक मार्गी सत्ता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे मंत्री झाल्यानंतर ठिकठिकाणी झळकणाऱ्या बॅनरवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवारच गायब झाल्याचे दिसत आहेत.




आता रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी विकासकामांच्या दृष्टीने मिळणाऱ्या निधीचा विचार करून तटकरे कुटुंबियांसोबत राहणेच पसंत करीत आहे. या राजकीय भूकंपाने ग्रामपंचायत, पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या सर्व निवडणुकांवर याचे थेट परिणाम दिसणार आहेत. याबरोबरच शिवसेना ठाकरे गटात सामिल होऊंन महाविकास आघाडीच्या जोरावर आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या स्नेहल जगताप यांचे काय होणार, हे देखील पाहणे गरजेचे आहे.

रायगड जिल्ह्यात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील सोडल्यास सर्वच आमदार सत्ताधारी पक्षाचे झाले आहेत, मात्र , त्याच वेळेला कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्री पद असताना आमची अडवणूक केली जात असल्याचे कारण देत आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi), महेंद्र थोरवे (Mahendra Thorave), भरत गोगावले (Bharat Gogavale )यांनी अनेक वेळा बंड केले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या तिघांनी शिंदेंच्या बंडखोरीत पुढाकार घेतला होता. आता पुन्हा अदिती तटकरे (Aditi tatkare)यांच्या हाताखाली या तिघांना काम करावे लागणार का ?अशाही चर्चा होत आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नेत्यांवर नामुष्की येऊ शकते, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. रायगड जिल्ह्यात एकेकाळी राजकिय दृष्ट्या बलाढ्य असलेल्या शेकापची संघटनात्मक ताकत कमी झाली आहे, याउलट जिल्ह्यात अत्यल्प असलेली भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे संघटनात्मक दृष्ट्या बलाढ्य व मजबूत होताना दिसतेय. तर या सर्व घडामोडीत काँग्रेस एका बाजूला पडल्याचे दिसून येतंय. देशातील बहुतांश राज्य भाजपच्या हातातून निसटत आहेत, अशावेळी देशातील जास्तीत जास्त खासदार निवडून आणून केंद्रात एकहाती सत्ता ठेवण्यासाठी भाजपची एकूणच धडपड सुरू आहे.

रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत, सत्ताधारी व विरोधी एक झाले आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीमुळे भाजपची ताकद वाढलेली दिसत आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची ताकद वाढलेली असताना महाडचे भरत गोगावले, कर्जतचे महेंद्र थोरवे यांना सध्याच्या राजकीय हालचालीने विचार करण्यास भाग पाडले आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मात्र शेकापविरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीचे पाठबळ मिळत असल्याचे चित्र आहे.

महेंद्र दळवी व सुनिल तटकरे यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत, त्यामुळे पुढील काळात हे संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, सद्यस्थितीत जयंत पाटील व सुनिल तटकरे यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे, त्यामुळे सुनिल तटकरे यांचे भाजप शिंदे गटाला साथ देणे तटकरे यांच्या हिताचे ठरेल, मात्र शेकाप ची चहूबाजुनी कोंडी होईल असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला पेण सुधागड रोहा मतदार संघाचे आमदार रवींद्र पाटील व खासदार सुनिल तटकरे यांचेही बिनसले आहे, एकमेकांवर टोकाची टीका देखील आजवर केली जात होती, मात्र आता दोघेही सत्तेच्या गटात असल्याने जुळवून घेणे हाच एकमेव पर्याय उरला आहे. मागील कित्येक वर्षे आमदार रवींद्र पाटील व स्वर्गीय मोहन पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यात राजकीय संघर्ष होता मात्र खासदारकीचे तिकीट मिळणार या महत्त्वाकांक्षेपोटी धैर्यशील पाटील भाजपात सामील झाले, आणि बघता बघता कट्टर विरोधी असलेले रवींद्र पाटील व धैर्यशील पाटील कधी एकमेकांत मिसळून गेले कळले देखील नाही, तसेंच आता सुनिल तटकरे यांच्याशीही जुळवून घ्यावे लागणार आहे. यामध्ये भाजपच्या तिकिटावर आमदारकी लढविण्यासाठी सज्ज झालेले धैर्यशील पाटील खासदारकीवर डोळा ठेवून असले तरी धैर्यशील पाटील यांना भाजपकडून खासदारकी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे.कारण अजून खूप राजकीय फेरबदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकत्र आल्याने राजकारणातील ती चुरस आता पहावयास मिळणे कठीण आहे. या सर्व घडामोडीत पूर्वी शिंदे गटाचे असलेले राजकीय वजन व महत्व कमी होऊन अजित पवार यांच्या गटाचे महत्व अधिक वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेय.

Updated : 4 July 2023 1:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top