Home > मॅक्स किसान > पुणतांबा- आंदोलनकर्त्या मुलींना बळजबरीने पोलिसांनी रुग्णालयात केलं दाखल

पुणतांबा- आंदोलनकर्त्या मुलींना बळजबरीने पोलिसांनी रुग्णालयात केलं दाखल

पुणतांब्यातील आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती खालवल्यामुळे शुक्रवार रात्री उशिरा पोलिसांनी तिन्ही मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावरुन पुणतांब्यात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करुन ही कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरु केले असून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होतं नाही तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.

आंदोलनकर्त्या मुलींच्या मागण्या

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं. आज या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मात्र अद्याप तरी याबद्दल कोणताही तोडगा निघालेला नाही. काल पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली.

दरम्यान रात्री उशीरा तिन्ही मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी बळजबरीनं कारवाई केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रात्री दीड वाजता पोलिसांनी आंदोलनकर्त्या मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल केलं. यावेळी काही ग्रामस्थांनादेखील ताब्यात घेण्यात आलं. यामुळे पुणतांब्यात मोठा तणाव निर्माण झाला. त्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Updated : 9 Feb 2019 3:14 AM GMT
Next Story
Share it
Top