यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणाचा यशस्वी निकाल....
X
मूलं जन्माला येणं हे खरतर अनेकींसाठी नैसर्गिक प्रक्रिया असते, ज्या महिलांसाठी ही नैसर्गिक प्रक्रिया सहजतेने होत नाही त्यांच्यासाठी पुण्यामधील डॉक्टरांच्या टीमनं एक विलक्षण कामगिरी पार पाडली आहे. बडोद्यातील ज्या महिलेवर ही शस्त्रक्रिया झाली होती ती महिला आता गरोदर राहिली आहे.
गर्भाशय प्रत्यारोपण प्रक्रियेचा आढावा...
पुण्यातील गॅलेक्सी केअर लेप्रोस्कोपी इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये देशातली पहिली गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पुण्यात यशस्वीरीत्या पार पडली होती. वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ही शस्त्रक्रिया दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरू झाली. रात्री सव्वानऊच्या सुमारास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. यामध्ये बारा तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता, असेही यावेळी सांगण्यात आले होते.
आईने दान केलेल्या गर्भाशयामुळे मुलीला स्वतःचे बाळ जन्माला घालता येणार होते. त्यानंतर तीन आठवडे त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार होते. तीन आठवड्यानंतर खरे पाहता त्यांचे यश अवलंबून होते.
हे प्रत्यारोपण गर्भाशयाचे देशातील पहिलेच प्रत्यारोपण असल्याने त्याकडे वैद्यकीय जगतासह सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. या प्रत्यारोपणामुळे महिलेला स्वतःचे बाळ जन्माला घालणे शक्य होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये तीन महिलांमध्ये गर्भाशयाचे प्रत्यारोपण करण्यात येणार होते. त्यापैकी पहिली शस्त्रक्रिया १८ मे २०१७ साली पार पडली होती.
गर्भाशयाचे प्रत्यारोपण करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकातील डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. पंकज कुलकर्णी आणि डॉ. मिलिंद तेलंग यांनी स्वीडनला जाऊन गर्भाशयाच्या प्रत्यारोपणाची माहिती घेतली होती. तसेच, डॉ. पुणतांबेकर यांनी जर्मनीत जाऊन प्रत्यारोपणाचे प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणात प्रत्यारोपणाच्या नियमांची (प्रोटोकॉल) माहिती, पेशंटची निवड व प्रत्यक्ष प्रक्रिया आदींचा समावेश होता. स्वीडनमध्ये ओपन सर्जरी करण्यात आली होती. पुण्यात दात्याचे गर्भाशय हे दुर्बिणीद्वारे काढण्यात येणार होते, असे डॉ. पुणतांबेकर यांनी स्पष्ट केले.