Home > मॅक्स रिपोर्ट > साहेब,'ऑफलाइन' जगणाऱ्यांनी 'ऑनलाइन' शिक्षण कसे घ्यावे?

साहेब,'ऑफलाइन' जगणाऱ्यांनी 'ऑनलाइन' शिक्षण कसे घ्यावे?

चार भिंतींचे घरही नशिबात नसलेल्या भिल्ल, कहार वस्तीवरील मुलांसमोर ऑनलाइन शिक्षण घेण्याकरिता अनंत अडचणी आहेत. संध्याकाळी खायची सोय व्हावी म्हणून, दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या गरिबांनी मुलांसाठी मोबाईल कुठून आणावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ऑनलाइन शिक्षणाची रियालिटी दाखवणारा खास ग्राऊंड रिपोर्ट....

साहेब,ऑफलाइन जगणाऱ्यांनी ऑनलाइन शिक्षण कसे घ्यावे?
X

औरंगाबाद: कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असताना आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बरंच काही अलॉक करताना सरकारने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही शाळांना ऑनलाइन पद्धतीनेच करावी लागली आहे. मात्र अनेक भागात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण घेणे शक्य नसल्याने, त्यांना पुन्हा एकदा ऑनलाइन वर्गापासून पुन्हा एकदा वंचीत राहावे लागणार आहे. गेल्या वर्षभरात ऑनलाईन शिक्षणाचा मर्यादा लक्षात आल्या आहेत, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य झालेले नसल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेल्याचे सांगितले जाते. आता कोरोना संकटामुळे सलग दुसरे वर्षही ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणावर काढावे लागणार हे जवळपास निश्चित आहे. पण गरिब विद्यार्थ्यांसाठी सरकार काही करणार की नाही असा प्रश्न आहे.

आधीच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य आणि हातावर पोट भरणाऱ्या लोकांनी मोबाईल कुठून आणावे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. याचे उदाहरण म्हणजे औरंगाबादपासून 50 किलोमीटर आणि गंगापूर तालुक्यातील गोदावरीच्या काठावर असलेल्या तीन-चारशे लोकांची भिल्ल-कहार वस्तीतील 200 पेक्षा जास्त लोकं हातावर पोट भरणारी आहे.




या लोकांचे जीवनच मुळात कष्टमय आहे. सकाळी पहाटे उठून नदीत लावलेल्या जाळ्यात अडकलेले मासे पकडून आणायचे आणि व्यापाऱ्यांना विकायचे. त्यानंतर आलेल्या तुटपुंज्या पैशातून दोन घास पोटात घातले की,पुन्हा त्याच नदीत जाऊन जाळे लावायचे, हा ह्या लोकांचा रोजचा दिनक्रम आहे. एवढं करून दिवसभरात हातात दोन-तीनशे रुपये सुद्धा पडत नाही.

त्यामुळे एवढ्या पैशात कुटुंब चालवायचं की मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल आणायचा असा प्रश्न या लोकांना पडला आहे. मात्र पोटच्या भुकेपुढं मोबाईल आणायची ताकदच नाही, अशी भयाण परिस्थिती या लोकांची आहे.

या वस्तीवर जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. या वस्ती शाळेत एकूण 40 मुलं शिक्षण घेतात. आतापर्यंत या वस्ती शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत. मात्र कोरोना आल्यापासून शाळा बंद झाल्या आणि मुलांना घरून ऑनलाइन शिक्षण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र जेव्हा शहरी भागातील मुलं हेडफोन लावून घरातून0 ऑनलाइन वर्गांना हजेरी लावत होते, तेव्हा ही मुलं शाळा कधी उघडणार या चिंतेत रोज शाळेच्या गेटवर चकरा मारत होती. कारण घरात ऑनलाइन वर्गाला हजेरी लावण्यासाठी मोबाईलच उपलब्ध नव्हता.

याच वस्तीवर राहणारे, चाळीस वर्षीय नारायण पवार गेली 30 वर्षे कधी मासेमारी तर कधी वीटभट्टीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची 5 वर्षांची मुलगी पूनम ही वस्ती शाळेतील 6 वीच्या वर्गात शिक्षण घेते. मात्र वर्गात हुशार असलेली पूनम गेल्या दीड वर्षांपासून शिक्षणापासून दुरावली आहे.

शाळा बंद असल्याने शिक्षकांनी घरूनच ऑनलाइन वर्गांना हजेरी लावण्याचं सांगितले. मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घरात अँड्रॉइड मोबाइल नाही. त्यामुळे ऑनलाइन वर्गांना कशी हजेरी लावावी असा प्रश्न पूनमला पडला आहे.




अशीच परिस्थिती याच वस्तीवरील लहू बर्डे यांची आहे. त्यांची पत्नी आणि ते दिवसभर मासे पकडून आणतात, त्यात अनकेदा जाळ्यात मासे येत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने राहायला सुद्धा घर नाही. त्यामुळे मोडक्या-तोडक्या झोपडीत राहून ते आयुष्य जगतायत. असे असताना, मुलगी रुपाली बर्डे ही ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल हवा असल्याची मागणी करते. पण इथं दोन वेळच्या खाण्याची सोय होत नाही, मग मोबाईल कुठून आणणार असा प्रश्न लहू बर्डे यांना पडला आहे.

वीज नाही टीव्ही कुठून पाहणार!

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून, शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून दिनांक १४ जून, २०२१ पासून सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये रोज ५ तास इयत्ता निहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार असल्याची घोषणा केली.

तसेच सदरचे प्रक्षेपण सोमवार ते शुक्रवार सकाळी ७:३० ते ३:३० या वेळेमध्ये डी.डी. सह्याद्री वाहिनीच्या काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता प्रक्षेपित केले जाणार असल्याचे आदेश काढले. मात्र ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी वीज 24 तास उपलब्ध होत नाही. तर काही ठिकाणी दोन-दोन दिवस वीज नसते. मग अशा परिस्थितीत मुलांनी टीव्ही कसा पहावा असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.

शिक्षक काय म्हणतात?

वस्ती शाळेवर मुलांना शिकवणारे शिक्षक शिवाजी काळे म्हणतात की, मुलांची परिस्थिती कोऱ्या पाटीसारखी झाली आहे. त्यांना आमच्याकडून जे ज्ञान देण्यात आलं होतं, ते आता पुसलं गेलं आहे. ज्या विध्यार्थ्याला तीस पर्यंत पाढे पाठ होते ते आता दहाचा पाढा म्हणू शकत नाही. अनेक विद्यार्थी ठळकपणे वाचायला सुद्धा विसरली. तसेच या काळात मुलं मागे पडली असल्याचं सुद्धा काळे म्हणाले.

मुलं उचलतायत टोकाचं पाऊल..

घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आणि शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची ऐपत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या नायगाव शहरात राहणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेचं अभ्यास करण्यासाठी मोबाईलची गरज होती. मात्र मोलमजुरी करणाऱ्या वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते मोबाईल घेऊ शकत नव्हते. त्यामुळे हताश झालेल्या या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले.



यासंदर्भात आमचे प्रतिनिघधी मोसीन शेख यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना वारंवार फोन केला पण त्यांना फोन रिसीव्ह केला नाही. पण कोरोनाचे दुसरे वर्ष सुरू झाले आहे तसेच ऑनलाईन शिक्षणाचेही...त्यामुळे या गरिब मुलांसाठी सरकारने काही योजना आखली नाही तर आपल्या आई-वडिलांप्रमाणे या मुलांच्या आयुष्यही काबाड कष्ट करुन केवळ खाण्याची सोय करण्यातच जाऊ शकते. त्यामुळे सरकारचे याची दखल घेण्याची गरज आहे.

Updated : 26 Jun 2021 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top