Home > मॅक्स रिपोर्ट > ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा फटका मागासवर्गीयांना, निधी रखडला

ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा फटका मागासवर्गीयांना, निधी रखडला

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाची चर्चा कायम होते. पण एखाद्या ग्रामपंचायतीमधील राजकाऱणाचा काय परिणाम होतो, याची चर्चा कधी होत नाही. गावातील गटातटाच्या राजकारणामुळे गावाचे कसे नुकसान होते हे दाखवणारा शशिकांत सूर्यवंशी याचा ग्राऊंड रिपोर्ट....

ग्रामपंचायतीच्या राजकारणाचा फटका मागासवर्गीयांना, निधी रखडला
X

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळे करुन टाकले आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. राज्यातही व्यवहार आता सुरू झाले आहेत. पण लॉकडाऊनमुळे उध्वस्त झालेली ग्रामीण अर्थव्यवस्था कधी पूर्वपदावर येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षात ग्रामपंचायतींचे उत्पन्न घटले आहे. याचा सर्वाधिक फटका मागासवर्गाला बसला आहे. ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नामधून काही टक्के निधी मागासवर्गासाठीच्या विकासाकामांकरीता देण्यात येतो. पण काही ग्रामपंचायतींमध्ये कोरोनामुळे उत्पन्नच नसल्याने असा निधी मिळालेला नाही.



सातारा जिल्ह्यातील निवकणे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या ३ वर्षांपासून मागासवर्गीयांसाठीचा निधी देण्यात आलेला नाही. त्यातच आता ग्रामपंचायतीची विकासकामे आणि मागासवर्गासाठीच्या कामांवरुन गावात राजकारण पेटले आहे. इथल्या गटातटाच्या राजकारणाचा फटका या गावातील मागासवर्गालाही बसतो आहे. यासंदर्भात धम्मदीप बौद्धजन मंडळाचे अध्यक्ष आणि गावातील नागरिक संजय जाधव यांनी सांगितले की, ५ फेब्रुवारी २०१९ पासून मागासवर्गासाठीचे अनुदान देण्यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीला अनेक अर्ज दिले, विनंत्या केल्या, पण निधी मिळालेला नाही, अशी तक्रार त्यांनी केली.

दुसरीकडे जाधव यांनी गंभीर आरोपही केला आहे. या गावाते रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे सदस्य बापूराव जाधव यांनी आपल्या निधीचा वापर गावात मनमानी पद्धतीने केल्याचा आरोप संजय जाधव करत आहेत. मागासवर्गासाठी स्वतंत्र अशी स्मशानभूमी सध्या बापूराव जाधव यांच्या निधीमधून तयार केली जाते आहे. पण याआधीही बापूराव जाधव यांनी मनमानी कारभार करत गावापासून लांब स्मशानभूमी बांधली होती. पण इथे जाणे सोयीचे नसल्याने लोकांनी त्या स्मशानभूमीकडे पाठ फिरवली आणि अखेर तिथे आता काहीही उरलेले नाही, सर्व पडझड झाली आहे. त्यानंतर आता डोंगराच्या पायथ्याशी नवीन स्मशानभूमीचे काम सुरू करण्यात आले आहे. पण ही स्मशानभूमी देखील गावापासून लांब असल्याचा आरोप करत निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार संजय जाधव यांनी केली आहे.


एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळणारा निधी चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बापूराव जाधव सरपंच असताना अंगणवाडी उभारण्यात आली. पण गावापासून दूर असलेल्या जागेवर ही इमारत बांधली आहे, तिथे पाणी, वीजेची सोय नसल्याची आरोपही संजय जाधव यांनी केला आहे. त्यामुळे या गावात करण्यात आलेल्या निकृष्ट कामांची चौकशी करुन कारवाई होण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले. पवनचक्क्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशेब ग्रामपंचायतीकडे नाही. गावात लाखो रुपये खर्चून सिमेंटचा रस्ता केल्याचा दावा केला गेला आहे. पण तोही रस्ता निकृष्ट असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्या निधीचा वापर चुकीच्या पद्धतीने करणाऱ्यांवर गुन्है दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या गावातील काही नागरिकांनी जि.प, सदस्य आणि या गावाचे रहिवासी बापू जाधव यांच्याविरोधात तक्रार केली आहे. बापू जाधव यांनी या अगोदर जिल्हा परिषद फंडातून स्मशानभूनी बांधली होती. अयोग्य जागी ती बांधल्यामुळे तिचा वापर एकदाही झालेला नाही आणि ती तशीच पडून आहे. तसेच बापू जाधव सरपंच पदावर असताना अंगणवाडी शाळा बांधण्यात आली. आबाजी राणू जाधव यांच्या जमिनीत अंगणवाडी शाळा बांधली. परंतु त्यांची सहमती न घेता दुसऱ्याची सहमती घेऊन शाळा बांधण्यात आली. जमीन मालकाला याबाबत काहीही माहीत नाही. त्यांनी माहितीच्या आधाराखाली मागणी केलेली असून त्यांना अजूनही माहिती मिळाली नाही. व शाळेला पाणी व लाई यांची अजूनही सोय नाही. मागासवर्गीयांसाठीचे 15% अनुदान गेले 5 ते 6 वर्ष मागणी करुनही ग्रामपंचायतीने दिलेले नाही. ग्रामपंचायत ऑफिस बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून कर्ज घेण्यासाठी स्टॅम्प पेपरवर ग्रामपंचायत सदस्यांच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत, अशी हेरा-फेरी ग्रामपंचायतमध्ये चालली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीमधील सर्व कामांची चौकशी व्हायला पाहिजे. कोणालाही विचारात न घेता व कोणत्याही कामाची माहिती ग्रामस्थांना न देता जिल्हा परिषद फंडातून ही कामे करण्यात येत आहेत. ती कामे, टिकाऊ नाहीत. जिल्हा परिषदेतून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.



यासंदर्भात आम्ही जेव्हा बापूराव जाधव यांना संपर्क साधला तेव्हा, त्यांनी सांगितले की, स्मशानभूमीची जागा ग्रामसभेत चर्चा होऊ निश्चित झाली आहे. त्यामुळे मनमानी कारभाराचा प्रश्न नाही. आपण त्या मागासवर्गीय वस्तीमधलेच आहोत, गावाच्या सोयीसाठी आपण आपला निधी वापरत असल्याचा दावा केला. तसेच संजय जाधव यांच्याकडे मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीसाठी जागा मागितली पण त्यांनी दिली आहे, असा उलट आरोप त्यांनी केला. संजय जाधव हे केवळ राजकीय हेतून आरोप करत असल्याचा दावा बापू जाधव यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायतीचे १५ टक्के अनुदान देण्यात आलेले नाही याबद्दल विचारले असता अनुदाना संदर्भात सर्व मागासवर्गीय समाजाने एकत्रित अर्ज करण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत आम्ही गावाच्या विद्यमान सरपंच अर्चना पाटणकर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "२०१८मध्ये आपण गावाच्या सरपंच झालो. त्यानंतर मागासवर्गाला २०१८-१९ वर्षाचे अनुदान घ्या असे सांगूनही त्या लोकांची वैयक्तिक मागणी असल्याने, तसेच त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे अनुदान देता आले नाही. तसेत २०१९-२० आणि २०-२१ या काळात कोरोनामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नच आलेले नाही. त्यातही ओबीसी समाजाने १५ टक्के अनुदानाची मागणी केल्याने हे अनुदान स्थगित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आता बीडीओ मॅडमकडे हा विषय नेऊन सोडवायचा आहे. अनुदान वैयक्तिक स्वरुपात मागण्यात येते आहे, त्यामुळे मागासवर्गीयांचे ५-५चे गट करुन आता अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या जि.प. सदस्य असलेले बापू जाधव हे मागासवर्गीय समाजाचे आहेत. त्यांनी याआधीच गावाचे सरपंचपद भुषवले आहे. पण तेच आता मागासवर्गीयांच्या नावाने निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला जातो आहे. पण गावातील इतर काही नागरिकांनी सांगितले की ग्रामसभेत सर्व निर्णय होत असल्याने मनमानी करण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे गावाचे प्रश्न या आरोप-प्रत्यारोपांमध्ये मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated : 21 Aug 2021 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top